'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Friday, 30 October 2015

कॉर्पोरेटपासून कच-याकडे . . .

रिलायन्स मध्ये काम करणारा विवेक पाटील (निर्माण ६), मे २०१५ पासून टाटा ट्रस्ट आणि आय आय टी पवई यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू झालेल्या कचऱ्यापासून इंधन निर्मिती या प्रकल्पात सहाय्यक संशोधक म्हणून रुजू झाला. केमिकल इंजिनिअर असलेल्या विवेकचा हा प्रवास त्याच्याच शब्दा...
 “निर्माण मधून जो जीवनाबद्दलचा नवा दृष्टीकोन मिळाला, तो पाहता अचल राहणे तर अशक्य होते. समाजातल्या समस्या रोज रोज पाहून मनात साठलेली अस्वस्थता व्यक्त करण्यासाठी काहीतरी करायचे ठरवले. मी शहरात राहत असल्यामुळे कचऱ्याची समस्या ठळकपणे माझ्या डोळ्यासमोर आली. कचरा गोळा करणाऱ्या, त्याची विल्हेवाट लावणाऱ्या सफाई कामगारांच्या आरोग्यासाठी, त्यांच्या सुरक्षिततेसाठी काम करणाऱ्या काही संस्था देशात कार्यरत आहेत. पण मुळात इतका कचरा नेऊन टाकणार तरी कुठे हा प्रश्न राहतच होता. मग या कचऱ्याचा काही उपयोग करण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेता येईल का हे पाहू लागलो. याच वेळेस पालघर जिल्ह्यातीलपाचघरया गावी दिलेल्या भेटीतून कळले, की आजही देशात वीज नसलेली गावं आहेत. जव्हार तालुक्यातीलबायफया संस्थेचे काम पाहिल्यावर शेतीबद्दल थोडीफार माहिती मिळाली. या भेटीदरम्यान शेतमालाच्या उत्पादनानंतर उरणारा कचरा आणि त्याचे अवाढव्य प्रमाण समोर आले.
या तीनही गोष्टींचा विचार एकत्रित रीतीने केल्यावर मला या तिघांमध्ये काही साम्य दिसू लागले. कचऱ्याला फेकून न देता त्याचा योग्य वापर करून त्यापासून ऊर्जानिर्मिती करता येईल का यावर माझे विचारचक्र सुरु झाले. पण यासाठी लागणारे तंत्रज्ञान पुरेशा सोयीस्कर स्वरुपात उपलब्ध नाही असे जाणवले. याच दरम्यान माझी भेट भारतीय प्रौद्योगिकी संस्थान मुंबई येथील प्राध्यापक संजय महाजनी यांच्याबरोबर झाली. टाटा ट्रस्ट आणि आय आय टी यांच्या संयुक्त माध्यमाने त्यांनी कचऱ्यापासून इंधन निर्मिती, तसेच स्थानिक पातळीवर त्याची अंमलबजावणी याबद्दल एक कार्यक्रम आखला होता. मला या विषयात रस असल्याने मी लगेच तेथे रुजू होण्याचा निर्णय घेतला.
सध्या आमचे काम म्हणजे, शहरात तयार होणाऱ्या कचऱ्याचे योग्य असे वर्गीकरण करून त्यात कोणत्या भागाचे रूपांतरण वायू स्वरूपातील इंधनात करता येईल, ग्रामीण भागातील शेतमालाचा वापर झाल्यानंतर उरणारा कचरा जाळून न टाकता त्यापासून ऊर्जा निर्मिती करून विजेची गरज कशी भागवता येईल याचा शोध घेणे, तसेच कचऱ्यापासून बनणारे इंधन वापरून धूर न येणारी चूल तयार करण्याचा प्रयत्न करत आहे.
            सध्याच्या माझ्या कामातून मी समाजातील मला जाणवणाऱ्या प्रश्नांवर उत्तर तर शोधतो आहेच, पण त्याच बरोबर या कामातून माझे सुद्धा शिक्षण सुरूच आहे. मानवी कृत्यांमुळे होणारी पर्यावरणाची हानी आणि त्याचे मानवी जीवनावरच होणारे परिणाम हे लोकांना सांगताना त्यांचा रोषही कधीकधी ओढवून घ्यावा लागतो. तेव्हा आपले विचार त्यांच्यावर लादण्याचा प्रयत्न न करता एका सेवेच्या माध्यमातून नकळत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे भान मला इथे आले. कोणतीही कल्पना नागरिकांच्या माथी मारता येत नाही, पण ती एका वस्तूच्या स्वरूपात मात्र सहज विकता येते, ही एक जाणीव मला विचार करायला लावून गेली. समाजात होणारा बदल हा हळूहळू होणार, सवयींमध्ये सुधारणा सुद्धा धीम्या गतीनेच होणार आणि या सर्वाची सुरुवात करायची असेल, तर ती तुमच्यापासूनच होणार, ही एक आयुष्यभर टिकेल अशी शिकवण मला येथे मिळाली.”
विवेकला त्याच्या पुढील कामासाठी खूप शुभेच्छा...!!

विवेक पाटील, vivek28patil@gmail.com

No comments:

Post a Comment