'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Friday, 30 October 2015

आणि हत्ती धावू लागला

माविम (महिला आर्थिक विकास महामंडळ) मधील टाटा ट्रस्ट फेलोशिप संपून बाहेर पडताना आठवणी, अनुभव आणि झालेले शिक्षण सागर पाटील (निर्माण ५) च्या स्वतःच्या शब्दांत...

            माविम मधील अनुभवाने मला अनेक बाजूंनी व जास्त खोलवर विचार करण्यास शिकवले. निर्माणच्या शेवटच्या शिबिरात काहीतरी काम करण्यास सुरूवात आपण करावी असे वाटले होते. मग त्यावेळेस गोटूल फेलोशिपचा प्रस्ताव झाला होता, पण अनेक कारणांमुळे तो बारगळला.
            त्यानंतर एके दिवशी अचानक अमृतचा फोन आला की माविम बद्दल माहिती घे, विचार कर आणि जर काही संधी वाटली तर गडचिरोलीला ये. मी माविम बद्दल माहिती वाचली. आणि लगेचच मी गडचिरोलीत पोहोचलो. माविमच्या श्रीमती कांता मिश्रा यांच्यासोबत बैठक होऊन फेलोशिप ठरली. आता मुख्य प्रश्न उरला होता निधीचा. त्य्यावेळेस मी रेल्वे सोबत काम करत होतो. फेलोशिप ठरली मी राजीनामाही दिला, पण निधी आलेला नव्हता. ते तीन महिने माझ्यासाठी खूप त्रासदायक होते. आणि सगळ्यांच्या प्रयत्नाने टाटा ट्रस्टने होकार दिला आणि माझा गडचिरोली येण्याचा दिवस निश्चित झाला.
            फेलोशिपसाठी सुरवातीला आराखडा बनवून मुंबईमधे सादर केला, तो मंजूरही झाला. मुंबईच्या बैठीकीनंतर थोड्या दिवसांनी मी रुजू झालो. पण माझ्यासोबत सगळ्यांची वागणूक बदलेली जाणवली. मला विचारात न घेता फेलोशिपचे निर्णय होऊ लागले, आमचे मानधन कारण नसताना लांबवले जाऊ लागले. स्टाफ मिटींग पासून मला दुर ठेवणे, कुठलेही काम न देणे, फक्त नियम समजविणे इतकेच होऊ लागले. एक दिवस माझी सहनशक्ती संपली. मी संवाद केला आणि अचानक मला काम सांगितले जाऊ लागले. सरकारी कार्यालयात कुणी काम सांगत नाही, ते खेचून घ्यावे लागते. त्या दिवशी एक धडा घेतला की संवाद करा म्हणजे समस्या सुटतील.
          
  कामास सुरवात केल्यानंतर लक्षात आले की, आपले काम टेबलावर होत नसून गावामध्ये होईल. म्हणून गावागावांत जाऊन लोकांशी संवाद साधणे, त्यांच्या समस्या जाणून घेणे योग्य वाटले. पण सुरूवातीला गावात लोकच मिळेनात. मग काही दिवसांनी लक्षात आले की लोकांना भेटायचे तर संध्याकाळी, सकाळी लवकर, बाजाराच्या दिवशी किंवा पोलोच्या दिवशी (पोलो म्हणजे गडचिरोलीतील सुट्टीचा दिवस). गावागावांत बैठका घेताना गडचिरोली जिल्ह्याचे वास्तव समोर येत होते. सुरूवातीला एका गावात रात्री १०:३० ला एका दारूड्याने आमची बैठक उधळून लावली, पण महिलांनी त्या दारूड्याला दुसऱ्या बैठकीपूर्वी सज्जड दम दिला होता. निसर्गाने समृद्ध असला, तरी गावामध्ये मोबाईल, टीव्ही, ट्रॅक्टर, दुचाकी, चारचाकी आणि दारूचे अनेक प्रकार गावात पोहोचले होते. पण प्राथमिक आरोग्य, रस्ते, बँकिंग सेवा, शैक्षणिक सुविधा, विजेचा लपंडाव आणि रोजगाराच्या कमी संधी अश्या अनेक समस्या समोर दिसत होत्या. म्हणून मग त्यांच्या गरजेनुसार आपण आपला आराखडा बनवावा असे ठरवले आणि तो बनवला. पण सरकारी नियमात तो आराखडा बसत नाही, बसला तरी चार ठिकाणी मंजुरी घ्यावी लागते. काम कमी कागद जास्त अशी अवस्था बऱ्याचदा व्हायची, पण सरकारी योजनेत काम करायचे तर हे करावेच लागेल हे सुद्धा लक्षात आले. सरकारी योजना व लोंकाचे प्रत्यक्ष प्रश्न यामधील दरी खूपच जाणवू लागली आणि त्याचा त्रास होऊ लागला. त्यात मुंबई वरून येणारे वेगळे आदेश व लोकांची गरज याना जोडणारी साखळी म्हणजे प्रशासकीय अधिकारी. प्रशासकीय अधिकारी कितीही चांगले असला तरी त्याला वर पुरवावी लागणारी माहिती व काम झाले ह्या दाखवण्याचा मायाजालात तो पण अडकतो. नंतर ती सवय होऊन जाते. लोकांशी त्याचं देणघेण राहत नाही. ज्याचा इमान राहतो तो फाईल्स व वरिष्ठ एवढ्या पुरता मर्यादित. मग ती व्यवस्था एखाद्या हत्ती सारखी ढिम्म चालू लागते. योजनेचा नसलेला संबंध व अधिकाऱ्यांची वागणूक यामुळे खूपच वैतागलो होतो. कमी अनुत्पादक कामे करून कागदच भरत होतो. त्यात अजून भर म्हणजे मी शोधग्राम वरून गडचिरोलीला बस्तान बसविले. ऑफिसमध्ये वैताग आणि नंतर एकटेपण यामुळे मी परत जाण्याचा निर्णय घेतला. तो माझा निर्णय मी सुनील काका व अमृतला सांगितला. त्यावेळेस सुनील काकांनी सांगितले अधिकारी सोड आणि कामावरच लक्ष केंद्रित कर.” अमृत मला म्हणालासागर, सोडायचं असेल तर नक्की सोड, पण एकदा माविम काय व कसं काम करत ते तरी समजून घे
            हे सगळं घडत असताना मी काम करत असलेल्या चामोर्शी तालुक्यातील भिवापूर गावातील एका महिलेने मी सांगितल्यामुळे पोल्ट्री फार्मच्या ऐवजी चिकन दुकान उघडले आणि एका महिन्यानंतर मला फोन करुन धन्यवाद म्हटले. मला खूपच आश्चर्य वाटले की कुठलीही सरकारी योजना नाही, अधिकाऱ्याची गरज नाही, आणि काम झाले. त्यादिवशी मला विश्वास आला की आपण काही तरी करू शकतो. हा दिवस माझ्यासाठी फेलोशिप मधला टर्निंग पॉईंट होता.

            त्यादिवशी मी स्वतःसाठी काही नियम बनविले
1)      फेलोशिप पूर्ण करायचीच
2)      अडचणी आल्यातरी कामावर लक्ष केंद्रित करायचे
3)      लोकांमधील वाईट गुण पाहण्यापेक्षा चांगल्या गुणावर लक्ष केंद्रित करायचे
4)     कितीही जरी वाईट वाटलं, राग आला, तरी सरकार, काम व सहकारी यांच्याविषयी नकारार्थी बोलायचे नाही

            त्यानंतर मी माविमची रचना समजून घेण्याचा प्रयत्न करू लागलो. थोड्याच दिवसांत माझ्या असे लक्षात आले की माविम हा अगदीच टिपिकल सरकारी विभाग नाही. लोकसंचालित साधन केंद्र हे माविमचे एकक आहे. लोकसंचालित साधन केंद्राची मूळ संकल्पना गांधी विनोबांच्या ग्रामस्वराज्य संकल्पनेसारखीच आहे. लोंकानी लोकांसाठी चालविलेले केंद्र म्हणजे लोकसंचालित साधन केंद्र. एका केंद्राशी २०० बचतगट सलग्न असतात. प्रत्येक गटातील महिला ही केंद्राची सदस्य असते. त्या सदस्यांमधून ११ महिलांची कार्यकारिणी कारभार नियंत्रित करते. सर्व अधिकार कार्यकारिणी कडे असते. सर्व कर्मचाऱ्यांचा पगार सुद्धा कार्यकारिणीच्या मंजुरीशिवाय निघत नाही.
            सहयोगिनी ही माविमचा आधारस्तंभ आहे. ती जणू माविमची barefoot manager च आहे. पण तिला आर्थिक मानधन व सन्मान फार कमी मिळतो. पण महिलांकडून मिळणारे प्रेम व जिव्हाळा हे तिचे भांडवल आहे. त्या भांडवलाचा काही हिस्सा मला पण मिळाला म्हणून मी स्वत: लं नशीबवान समजतो. सहयोगिनीकडून मला बचतगट संकल्पना व महिलांचा विकास समजून घेता आला.
मला माविम समजल्यानंतर माझा कामाचा दृष्टीकोनच बदलला. मी काम अतिशय मन लावून परफेक्टच झाले पाहिजे असं ध्यास घेतला. दृष्टीकोन बदलानंतर मला १५ दिवसातच फरक जाणवू लागल. आपण जर आपले काम व्यवस्थित केले तर आपले सहकारी सुद्धा काम व्यवस्थीत करू लागतात. ह्या काळात मी जो धडा शिकलो तो हा होतं की कुठलीही व्यवस्था साखळी प्रमाणे असते. त्यामध्ये आपण आपली भूमिका समजून योग्य काम केले तर साखळीतील इतर व्यक्ती पण काम करू लागतात.
            मी माझ्या सहकारी व इतर विभागांच्या चांगल्या अधिकाऱ्यांच्या मदतीने अनेक प्रकल्प हातात घेऊन महिलांसाठी रोजगार निर्मिती कशी करता येईल याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न सरकारी भाषेत म्हणजे आकड्यात बोलायचं झाल तर १२ तालुक्यातील साधारण ५०० महिलांना प्रत्यक्ष स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यात आम्ही यशस्वी झालो. उदा. दुग्ध व्यवसाय, हायड्रोफोनिक चारा लागवड, गोधडी प्रकल्प, वैरण कापणी, कॅन्टीन, मत्स्यपालन, खत खरेदी विक्री, सॅनिटरी नॅपकीन विक्री, किराणा वस्तूंची विक्री आणि भाताची सुधारित तंत्रांनी लागवड
            मी फेलोशिप दरम्यान लोकांच्या गरजांना सरकारी योजनेच्या भाषेत बसविण्यास शिकलो आणि न चालणारा हत्ती धावू लागला. ही गोष्ट माझ्या साठी खूप आश्वासक होती. फेलोशिपच्या शेवटच्या दिवसात एकदा मी गडचिरोली तालुक्यातील कोटगल गावात गेलो होतो. तिथे बरोबर तीन महिन्यापूर्वी मला कुणीही ओळखत नव्हतं. पण आम्ही मोठ्या प्रयत्नांनी त्या गावातील १० महिलांना बहादरपूर (ता.पारोळा. जि जळगाव) येथे गोधडी प्रशिक्षणाला घेऊन गेलो होतो. आता त्या महिला स्वत: गोधडी शिवून विकत आहेत. मी तिथे आता जेव्हा गेलो तेव्हा मला गावातले लोकगोधडी वाले सरम्हणून आवाज देतात ही माझ्यासाठी मिळालेली कौतुकाची पावतीच होती.

स्रोत: सागर पाटील, sgpatil4587@gmail.com

No comments:

Post a comment