'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Saturday, 31 October 2015

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो...

मागील दोन महिन्यात घडलेल्या निर्माणच्या काही घडामोडींचा हा आढावा...

गांधी जयंती... सेवाग्राम आश्रम... निर्माणची पाचवी ऑक्टोबर कार्यशाळा !
             पूर्ण वेळ सामाजिक काम करणारी निर्माणची मित्रमंडळी दर ऑक्टोबरला एकत्र जमतात. सर्व बॅचच्या मित्र मैत्रिणींना भेटणे हा आनंददायी अनुभव असतो. कुणाच्या मनात खूप प्रश्न असतात, तर कुणासाठी सफरचंद पडलेले असते. कुणी नवखा असतो, तर कुणी - वर्षे अनुभवी असतो. एकमेकांच्या प्रवासातून खूप काही शिकता येते. या वर्षी पाचवी ऑक्टोबर कार्यशाळा ते ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात आली होती.
            कार्यकर्त्यांच्या शेअरिंगदरम्यान त्यांना प्रश्न विचारणे, तसेच त्यांच्या मनातील प्रश्नांना उत्तरे देणे यासाठी नायना, विवेक सावंत, डॉ. आनंद करंदीकर आणि सारिता आवाड ही ज्येष्ठ मंडळी कार्यशाळेत उपस्थित होती. काही काळासाठी नंदा काकांनीही येऊन सर्वांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या.
            डॉ. आनंद करंदीकर यांनी राजकीय आणि धार्मिक नेत्यांकडून brain washing साठी वापरल्या जाणा-या तंत्रांवर सत्र घेतले. विवेक सावंत यांनी तंत्रज्ञानाचा विकास कोणत्या दिशेने होत आहे व त्याचा परिवर्तनासाठी कसा वापर करता येईल याविषयी संवाद साधला.
            ऑक्टोबर कार्यशाळा प्रथमच शोधग्रामच्या बाहेर वर्ध्यालासेवाग्रामआश्रमात आयोजित करण्यात आली होती. याचा निमित्ताने गांधींच्या आत्मकथा, हिंद स्वराज्य, मंगल प्रभात या पुस्तकांचा कार्यकर्त्यांनीच करून दिला. सेवाग्राम या जागेच्या सोयीमुळे कार्यशाळेत आतापर्यंत सर्वाधिक ६५ कार्यकर्ते आले होते. अमृतच्या अनुपस्थितीत ही पहिलीच ऑक्टोबर कार्यशाळा होती. तिच्या आयोजनात निर्माणच्या खूप युवांची मदत झाली.

निर्माणच्या समन्वयक समितीची पुनः बांधणी

            गेली आठ वर्षे सातत्याने विस्तारत असलेली आपली निर्माण प्रक्रिया अधिक परिणामकारक, व्यापक, आणि नाविन्यपूर्ण बनवण्यात सर्वच निर्माणींचा महत्वपूर्ण सहभाग आहे.
            निर्माण मधील काही निवडक मित्र-मैत्रिणींचा सहभाग असलेली निर्माण समन्वयक समिती (NCT) गेली जवळपास चार वर्षे या कामात सक्रीय होती. ते राहात असलेल्या गावा-शहरांमध्ये निर्माणची व्याप्ती वाढवणे, तिथल्या स्थानिक निर्माणीशी संपर्कात राहणे, निर्माण च्या निवड प्रक्रियेत मदत करणे, शोधग्राम मधील शिबिरांचे नियोजन-आयोजन, अशा विविध जवाबदाऱ्या ही तब्बल १६ जणांची ही NCT पार पाडत होती. यातील काही मित्र गेल्या काही वर्षात कामाच्या, शिक्षणाच्या जबाबदाऱ्यांमुळे व्यस्त होत गेले; स्थलांतरित झाले.
            त्यामुळे गेले काही महिने निवांत असलेल्या या टीमची पुनर्बांधणी करण्याची गरज होती. या वर्षीच्या ऑक्टोबर कार्यशाळेचे निमित्त साधून यासाठीची मिटिंग ५ ऑक्टोबर २०१५ ला सेवाग्राम आश्रमाच्या यात्री निवासात मोठ्या उत्साहात पार पडली. एकूण १४ जणांचा समावेश असलेल्या या NCT मध्ये निर्माणच्या पहिल्या शिबिरापासून ते निर्माणच्या सहाव्या शिबिरापर्यंतच्या मित्र-मैत्रिणींचा समावेश आहे. यात औरंगाबादची दिशा चिमणे, अकोल्याचा प्रतिक उंबरकर, जळगावचा अद्वैत दंडवते, साताऱ्याचा अमोल शैलेश, मुंबईचा मयूर सरोदे, नगर जिल्ह्यातील कर्जतचा निरंजन तोरडमल, वर्ध्याचा मंदार देशपांडे, नागपूरचा आकाश नवघरे, गडचिरोलीत सर्च सोबत काम करणारे ऋतगंधा देशमुख, हृषीकेश मुन्शी, अशा १० नव्या तर धुळ्याचा संदीप देवरे, नागपूरचा रंजन पांढरे, औरंगाबादचा त्रिशूल कुलकर्णी आणि पुण्याची चारुता गोखले अशा ४ पूर्वीच्या NCT मेम्बर्सचा समावेश आहे.
            मिटिंग दरम्यान NCT च्या कामाबद्दल घमासान चर्चा झाली आणि अनेक नवे-जुने मुद्दे विचारात घेऊन NCT च्या कामाची सुधारित रूपरेषा आणि इतर महत्वाच्या कल्पना मांडल्या गेल्या. या टीमच्या कामाच्या जबाबदाऱ्या -
*          आपापल्या परिसरातील संवेदनशील तरुणांना सामाजिक कृतींमधून एकत्र आणणे, त्यांच्या कृतीला वैचारिक स्पष्टतेची जोड देणे
*          आपापल्या परिसरातील नामांकित शिक्षणसंस्थांच्या संपर्कात राहणे, तेथील तरुणांपर्यंत निर्माणची माहिती पोहचवणे
*          परिसरातील सामाजिक क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या NGOज ना भेटी देणे, त्यांच्या कामात शक्यतो हातभार लावणे, त्यांना निर्माण उपक्रमाबद्दल सांगणे
*          आपापल्या परिसरातील निर्माणच्या शिबिरार्थींशी संपर्कात राहणे
*          शोधग्राम मधील निर्माणच्या शिबिरांच्या आयोजन-नियोजनात मदत करणे, शिबिरांत सहभागी होणे
*          निर्माणची शैक्षणिक प्रक्रिया अधिक मजबूत करण्यासाठी वेळोवेळी नव्या कल्पना मांडणे, सूचना, प्रतिक्रिया देणे


या नव्या दमाच्या निर्माण समन्वयक समितीच्या चमूला पुढील कामासाठी शुभेच्छा!

No comments:

Post a Comment