'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 31 December 2015

Hello from Odisha !

प्रियदर्श तुरे व कल्याणी राउत संवाद साधत आहेत थेट ओडिशामधून


 प्रियदर्श तुरेचा Primary care to tertiary care प्रवास
सामाजिक आरोग्याचीही जोड

मेळघाट मधील प्राथमिक आरोग्य केंद्रात तब्बल ६ वर्षं वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा दिल्यानंतर प्रियदर्श तुरे हा तरूण डॉक्टर ओडीशातील बिसामकटक येथील christian hospital येथे रुजू झाला आहे. साधारण २०० किमी परिसरातील २५० बेडचे हे एकमेव हॉस्पिटल. इथे आदिवासींना सेवा देता देता त्याला स्वतःची वैद्यकीय कौशल्ये वाढवण्याची संधी मिळेल. तसेच लोकसहभागातून सामाजिक आरोग्याचे काम कसे करता येईल याचे धडेही मिळतील. प्रियदर्श सांगतोय christian hospital ची गोष्ट...

"ही गोष्ट १९४० ची आहे.
            'भारत नेमका कसा आहे?' या उत्कंठेतून डॉ. लीस माड्सेन वाचनालयातील पुस्तके चाळू लागल्या. डेन्मार्क वरून भारतात आलेले ख्रिचन मिशनरी यांनी भारताची बरीच माहिती पुस्तक स्वरूपात डेन्मार्क मध्ये प्रकाशित केली होती. परंतु माहिती शोधता शोधता त्यांना येथील दैनावस्था, गरिबी, आजार, बालमृत्यू, मलेरिया, मातांचे हाल, कुपोषण अश्या अनेक गोष्टी अस्वस्थ करुन गेल्या. त्याच वेळेस त्यांनी भारतात येण्याचा निश्चय केला. परंतु तेव्हा द्वितीय महायुद्ध सुरु असल्यामुळे कुणीच त्यांना भारतात नेण्यास तयार नव्हते. त्यांनी चर्चच्या मध्यमातून सुद्धा विचारणा करून बघितली, परंतु तेथेही नकार मिळाला. शेवटी त्यांनी कुणाचा आधार न घेता एकट्यानेच येथे येण्याचे ठरविले.
            त्या भारतातील अतिशय मागास अशा ओडीशातील कोरापुट जिल्ह्यात (आजचा रायगडा जिल्हा) आल्या व तेथील भीष्म-कट्टक या भागात आरोग्य सेवा पुरवू लागल्या. फक्त एवढंच करून थांबल्या नाहीत, तर गावागावात जाऊन रूग्ण तपासणी आणि आरोग्य शिक्षण त्या देऊ लागल्या.
            परंतु तेथील समाजाच्या समस्या अधिक मोठ्या होत्या. मलेरिया, कुपोषण, मृत्यू या तर रोजच्या गोष्टी होत्या. या समाजाला शिक्षणाचा गंध नसल्यामुळे त्यांना आरोग्याबद्दल काही नवीन समजावणं कठीण जात होतं. यावर मात करण्यासाठी डॉ. मा (माडीसोन) गावागावात जाऊन रोज संध्याकाळी शिकवू लागल्या. गावात एखाद्या मोठ्या झाडाखाली त्या लोकांना शिकवत असत. आजार कसे पसरतात, मानवीय शरीर रचना कशी असते, कोणत्या आजारात कुठले अवयव बिघडतात आदी माहिती लोकांना देण्यासाठी त्यांनी एक नवी पद्धत काढली. एक मोठे बोकड त्या गावात घेऊन जात असत. आजाराबद्दल माहिती सांगत व मग बोकडाला व्यवस्थित कापून त्याच्या शरीर-रचनेद्वारे लोकांना आजाराबद्दल आणि मानवीय शरीराबद्दल शिक्षण देत असत. मग ते कापलेले बोकड शिजवून संपूर्ण गावाला मेजवानी दिली जात असे. असे प्रत्येक गावात त्या २-३ दिवस वास्तव्यास असत.
            त्यांनी सुरु केलेल्या छोट्या दवाखान्याच्या रूपात असलेले हे काम नंतर १०० च्या वर गावांत लोकांना आरोग्यसेवा पुरवू लागले. जवळपास २००-३०० किमीच्या परिसरात एकही इस्पितळ नव्हते. आरोग्य सेवा देताना त्यांनी मलेरिया, कुपोषण, डायरिया, न्यूमोनिया, लहान बालके व गरोदर मातांची देखरेख या सर्व गोष्टींवर भर दिला. त्याचे परिणाम दिसू लागले. मलेरिया, डायरिया या कारणांमुळे होणारे मृत्यू कमी होण्यास सुरुवात झाली.

            आधी फक्त बाह्य-रूग्ण विभाग होता. रूग्णांना भरती करून औषधोपचाराची सोय नव्हती. एकदा एक स्त्री भाजून आली. ती बरेच लांबून आल्याने तिला परत पाठविणे शक्य नव्हते. मग डॉ. मा ने निर्णय घेतला की अंतरभरती रूग्ण विभाग सुद्धा सुरू करायचा. एका छोट्याश्या खोलीत असलेला हा दवाखाना हळूहळू मोठा होऊ लागला. डॉ. मा ने स्थानिक लोकांनाच प्रशिक्षण देऊन दवाखान्यात काम करणारे उपयुक्त मनुष्यबळ तयार केले.
            या सर्व कामाची आर्थिक बाजूसुद्धा होती. सुरूवातीला या कामास डॉ. मा यांना त्यांच्या डॅनिश मित्रांकडून आर्थिक मदत मिळत होती. दवाखाना, तेथील कर्मचारी वृंद, रूग्णांसाठीचा स्वस्तातला औषधोपचार
. अनेक गोष्टींसाठी पैसा लागत होता. परंतु जसं काम वाढत होते तसं ही मदत कमी पडत होती. सोबतच डॉ. मा एकट्याने हे सर्व सांभाळत असताना एकापेक्षा जास्त डॉक्टरांची गरज भासू लागली. आर्थिक अस्थैर्य आणि डॉक्टरांची कमतरता यामुळे दवाखाना बंद करायचा की काय अशी परिस्थिती आली होती.
            मग डॉ. मा ने छत्तीसगड वरून डॉ. हेनरी आणि त्यांची पत्नी श्रीमती हेनरी यांना मदतीसाठी बोलाविले. त्यांनी अतिशय प्रयत्नपूर्वक दवाखान्याची विस्कटलेली घडी परत बसवायला सुरुवात केली. दवाखान्याचा कायापालट करून ५० खाटावरुन ८० खाटांवर नेले. दवखान्यात प्रसूती, शस्त्रक्रिया सुरू केल्या. परंतु अतिशय माफक दारात ही सुविधा त्यांनी द्यायला सुरु केली. यामधून पेशंट जो मोबदला देत असत त्यामुळे दवाखाना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण झाला.
            डॉ. हेनरी यांनी पुढे नर्सिंग स्कूल उघडले. त्यावेळेस माध्यमिक शिक्षणानंतर व्यावसायिक अभ्यासक्रमाची सोय, ती पण मुलींसाठी जवळपास कुठेच उपलब्ध नव्हती. सोबतच याद्वारे दवाखान्यात काम करायला लागणारे कुशल मनुष्यबळ सुद्धा उपलब्ध होणार होते. हळूहळू दवाखान्याचे प्रस्थ वाढत होते. त्यात खऱ्या अर्थाने रुग्णांची काळजी घेतली जात असल्याने दूरवरून सुद्धा लोक तेथे उपचार करून घेण्यास येत. दवाखान्यात रक्त तपासण्या, एक्स-रे, सोनोग्राफी, ऑपरेशन इ. आधुनिक सुविधा डॉ. हेनरी यांनी सुरु केल्या. याच कालावधीत स्थानिक आणि कर्मचारी वर्गाच्या मुलांसाठी दवाखान्याच्या आवारातच एक शाळा सुरू झाली. यामुळे अनेक मुलांना गावातच चांगल्या दर्जाचे शिक्षण उपलब्ध होऊ लागले. नर्सिंग स्कूल मध्ये एएनएम सोबतच जीएनएम चे प्रशिक्षण सुद्धा सुरू झाले.
            गावपातळीवर सुद्धा अनेक आरोग्याची कामे सुरु झाली. गावपातळीवर आरोग्याकर्मी महिन्यातून एकदा गावाची संपूर्ण तपासणी करू लागले. गावाजवळच आरोग्य सेवा देता याव्या यासाठी ३ cluster बनवून प्रत्येक cluster ला एक उपकेंद्र उपलब्ध करून दिले गेले. त्यात जवळच्या गावातून येणाऱ्या रूग्णावर प्राथमिक उपचार, काही रक्त तपासण्या, प्रसूती हे सर्व पुरविणे सुरु झाले. आरोग्य कर्मचाऱ्यांना वेगवेगळे प्रशिक्षण दिले केले. त्यामुळे गावपातळीवरच उच्च रक्तदाब, thyroid ग्रंथीचे आजार, मलेरिया वर उपचार, दमा-आकडी येणे यासारखे कायम औषधीवर असणाऱ्या रुग्णांना या सर्व सोयी त्यांच्या गावात मिळू लागल्या.
            डॉ. हेनरी नंतर पुढे डॉ. साहूंनी दवाखान्याची सूत्रे हाती घेतली. दवाखाना आता १५० खाटांचा झाला होता. आदिवासी मुलांच्या विकासाकरिता दवाखान्यातील प्रशासन व १६ गावातील लोकांनी मिळून अतिशय दुर्गम अशा काचापाजू परिसरात दुसरी शाळा सुरु केली. या शाळेचे बहुतांश बांधकाम गावातील लोकांनी करून दिले. तेथील शिक्षक वृंद सुद्धा कोंद आदिवासी समुदायातूनच घेतले गेले. डॉ. साहू या स्त्री-रोग तज्ञा असल्यामुळे गरोदर माता, लहान बालके यांच्यावर या कालावधीत बरेच लक्ष्य दिले गेले. एक नवीन अशी maternity इमारत फक्त माता आणि त्यांच्या बालाकांकारिता उभारली गेली. स्त्रीरुगानांवर अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया केल्या गेल्या. ऑपरेशन साठी नेहमी रक्त पुरवठा लागतो. या रक्तपेढीचे बांधकाम व त्याची सुरुवात सुद्धा याच कालावधीत झाली.
            आता २०१२ पासून डॉ. हेमा यांनी दवाखान्याचा कार्यभार सांभाळला आहे. त्या डोळ्याच्या आजारावरच्या तज्ञा आहेत. डॉ. जोंनी ओमेन यांनी अनेक वर्षांपासून गावपातळीवर चालणाऱ्या आरोग्याकामाचे नेतृत्व केले आहे. डॉ. हेनरी च्या कालावधीत इथे इंटर्नशिप पूर्ण करण्यासाठी आलेले डॉ. जोंनी इथलेच होऊन गेले. मलेरिया वर त्यांचा सखोल अभ्यास आहे. मलेरिया मुळे कुपोषण कसे वाढते याचे सखोल अध्ययन त्यांनी केले आहे. गावपातळीवर अनेक बचत गट, आरोग्य विमा, फिरते रुग्णालय, आदी संकल्पना त्यांनी येथे सुरु केल्या. सोबतच राज्य आणि देशपातळीवर आरोग्यावरील अनेक समित्यांचे ते सदस्य आहेत व आजही त्याच जोमाने कार्यरत आहेत.
            आता दवाखाना २५० खाटांचा आहे. ५ वेगवेगळे ऑपरेशन रूम, आणि अनेक आधुनिक सुविधांनी युक्त आहे. आजही जवळपासच्या २०० किमी परिसरात असे रुग्णालय नाही. आजही संपूर्ण रायगडा जिल्ह्यात १० लाख पेक्षा जास्त लोकसंख्येसाठी केवळ ३ सोनोग्राफी मशीन आहेत; त्यातल्या दोन येथे आहेत.शासनाच्या जिल्हा रुग्णालयातून सुद्धा रुग्णांना येथे पाठविले जाते. एके काळी तेथील जिल्हा कलेक्टारच्या पत्नीचे दोन्ही बाळंतपण येथेच झाले होते. अश्या या दवाखान्याला, तेथील शाळेला, गावपातळीवर घेतल्या आरोग्य व शैक्षणिक कार्यक्रमाला भेट नक्की द्यायला हवी. " आरोग्य सर्वांसाठी " म्हणजे नेमके कसे असू शकेल याची सुद्धा काही उत्तरे इथे नक्की सापडतील.
            डॉ. मा यांनी बघितलेले स्वप्न हे एका व्यक्तीचे स्वप्न होते. आज त्या इवल्याश्या रोपाचे रुपांतर एका
वट-वृक्षात झाले आहे.”
Christian Hospital, Bissamcuttak बद्दल अधिक माहितीसाठी - http://chbmck.org/
प्रियदर्श तुरे, priyadarshture@gmail.com


कल्याणी राउत स्वास्थ्य स्वराज मध्ये कार्यरत

 "गेल्या ४ महिन्यांपासून 'स्वास्थ्य स्वराज' या संस्थेसोबत कलाहांडीतील (ओडिशा) आदिवासी लोकांच्या आरोग्य आणि शिक्षणावर काम करण्याची संधी मिळाली. निर्माणचेच डॉक्टर जोडपे सचिन बारब्दे आणि धनश्री बागल येथे आधीच रुजू होते. सध्या ते दोघे आरोग्यावर, तर मी शिक्षणावर काम करत आहे. कलाहांडी बद्दल पी साईनाथ यांच्या Everybody Loves a Good Drought या पुस्तकात वाचलेच होते. तिथे जाण्याची तळमळ होतीच, ती संधी सचिन व धनश्रीसोबत मिळाली.
स्वास्थ्य स्वराज चे काम २०१३ साली कलाहांडीतील शोमल रामपूर ब्लॉक मधील दोन ग्रामपंचायती - केरपाई आणि कनीगुमा येथे सुरू झाले. या भागात ९०% आदिवासी (ST) व इतर SC आहेत. लोकांच्या आरोग्याच्या कामानेच सुरूवात झाली. पण इथली भीषण परिस्थिती बघता शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे लक्षात आले.
गेले चार महिने मी इथे शिक्षणावर काम करत आहे. ठोस काम झालं नाही आहे. पण गावांची स्थिती, मुलांच्या शिक्षणातले अडथळे, शिक्षणाचा दर्जा, त्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन समजून घ्यायचा प्रयत्न करत होते. केरपाई येथे एक बेसलाईन सर्वे करण्यात आला. त्यात असे लक्षात आले की ६६.% आदिवासी मुलांची शाळेत नोंदणी झाली आहे. पण तिसरीपर्यंत शिक्षण घेणारे १७.% च आहेत, पाचवीपर्यंत १३., तर माध्यमिक शिक्षणापर्यंत १.% मुलांचीच नोंद आहे. यात मुलींचा नगण्य समावेश आहे.
गावात गेलो की मुले दरवाजाआड लपायची, जवळ गेलो तर रडायची. एका कुटुंबात ५-६ मुले असत. प्रत्येक गावात मुलांची ऐवढी सेना बघून ती दुर्लक्षित होण्यासारखी मुळीच नव्हती. इथे मुले जगली काय मेली काय कुणालाच फिकीर नाही. एवढे मोठे potential, एवढा मोठा resource दुर्लक्षित होत आहे याची आम्हाला क्षणोक्षणी खंत वाटायची.
केरपाई पंचायतीचे प्रत्येक मूल शाळेत enrolled आहे. पण शाळा? शाळेला इथे इमारत नाही, असेल तर मास्तर नाही. अधूनमधून मास्तर आले तरी चार भिंतीतले शिक्षण मुलांना रूचत नाही.जबरदस्तीने त्यांनी शाळेत बसावं असा आदिवासी लोकांचा अट्टाहासही नाही. प्रत्येक शिक्षकाने गावातील तिसरी, पाचवी किंवा आठवी पास मुलाला सहाय्यक म्हणून नेमलं आहे. आपल्या ३५,००० पगारामधले १,५०० रूपये त्यांना मानधन देऊन आपली जबाबदारी त्यांच्यावर टाकून नामानिराळे राहतात. Mid day meal चा प्रोग्राम इथे एकदम फ्लॉप आहे.
मुलांना नवीन नवीन गोष्टी शिकण्याचे कुतूहल आहे हे लक्षात येत होते. त्यांना कसं आणि काय शिकवणार? आम्ही त्यांच्याजवळ असलेल्या निसर्गातूनच त्यांच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करत आहोत. निसर्गासंबंधीत गीते, खेळ, चित्र व कृतीतून आरोग्यासंबंधी गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवणे सुरू केले. या सगळ्या गोष्टी मुलांपर्यंत पोहोचवण्याचे माध्यम म्हणजे शिक्षा साथी. शिक्षा साथींचे प्रशिक्षण करणे हे माझे महत्तवाचे काम होते. यादरम्यान आम्ही किशोरवयीन मुलींचे गटदेखील बनवले. त्यांच्यासोबत ब-याच विषयांवर चर्चा व्हायची. आरोग्य व शरीरासंबंधी गोष्टी जाणून घेण्याचं त्यांना कुतूहल होतं. म्हणून विविध चित्रे, चित्रफिती, चर्चा या माध्यमातून त्यांना ब-याच गोष्टी माहित झाल्या. -याच समस्यांवर त्या मोकळेपणे बोलू लागल्या. त्यांचा अधिक रोख होता तो त्यांच्या बालविवाहावर. त्या मुलींची मदत आम्हाला गावात काम करायला झाली. त्या जबाबदारीने मुलांच्या व स्त्रियांच्या आरोग्याकडे लक्ष द्यायच्या. कोणी आजारी असेल तर त्याने दवाखन्यात जावे, खरजेच्या रूग्णांना औषधे लावावीत, हातांची नखे स्वच्छ राखावी याकडे आवर्जून लक्ष देत.
पण या दरम्यान माझ्या मनात काही प्रश्नांनी घोळ केला. सरकारची आदिवासींप्रती इतकी उदासीनता का? Mining ला clearance मिळत असल्यामुळे धोक्यात आलेल्या आदिवासींच्या जीवनाचं आणि संस्कृतीचं पुढं काय? आदिवासींच्या शिक्षण व आरोग्यासारख्या प्राथमिक गरजा कशा पूर्ण व्हाव्यात? L&T ने आपले शिक्षक आणि डॉक्टर्स तेथे नेमले आहेत. Charity work किंवा giver ही भूमिका NGOs ची असेल तर आपण प्रश्नाच्या मूळापर्यंत जातोय का वरवरची मलमपट्टी करतोय?”
स्वास्थ्य स्वराज बद्दल अधिक माहितीसाठी - http://www.swasthyaswaraj.org/
कल्याणी राउत, kalyaniraut28888@gmail.com

No comments:

Post a Comment