'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Monday, 29 February 2016

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

गेल्या दोन महिन्यांत घडलेल्या निर्माणसंबंधी घडामोडींचा हा धावता आढावा. तुमच्या प्रतिक्रिया, सुझाव, प्रश्न नक्की कळवा...

अस्पष्टतेकडून स्पष्टतेकडे, स्पष्टतेकडून निर्णयाकडे 
आणि निर्णयापासून परिणामकारकतेकडे

            २८ जानेवारी - फेब्रुवारी, २०१६ दरम्यान निर्माणचे वैद्यकीय व अवैद्यकीय युवांचे . शिबिर पार पडले. निर्माण ६ च्या अशा मित्रमैत्रिणींच्या गरजा किंवा प्रश्न यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न या शिबिरात केला गेला, जे -
·       सामाजिक समस्यांवर पूर्ण वेळ काम करण्याचा निर्णय घेण्याच्या जवळ आले आहेत असे
·       सामाजिक समस्यांवर पूर्ण वेळ काम करण्याचा निर्णय ज्यांनी नुकताच घेतला आहे असे

            शिबिराची आखणी करताना या मित्रमैत्रिणींचे प्रश्न आणि सुझाव मागवण्यात आले त्यानुसार शिबिराची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे ठरवण्यात आली-
·       सामाजिक समस्यांवर काम का करायचे याबद्दल शिबिरार्थ्यांना वैचारिक स्पष्टता यावी
·       अस्पष्टतेकडून स्पष्टतेकडे, स्पष्टतेकडून निर्णयाकडे आणि निर्णयापासून परिणामकारकतेकडे शिबिरार्थ्यांचा प्रवास व्हावा
·       करीअर, जोडीदार, पालक, आर्थिक नियोजन, काम सुरू केल्यानंतर येणाऱ्या अडचणी यासंबंधी शिबिरार्थ्यांच्या शंकांचे निरसन व्हावे
           
हे शिबिर अनेक बाबतीत प्रायोगिक ठरले. या शिबिरात प्रथमच डायरी लिहीणे, Goal Analysis, आर्थिक नियोजन यासारख्या कौशल्यांवर भर देण्यात आला. तसेच insecurities चा सामना करून निर्णयापर्यंत पोचण्यासाठी योगेश दादाने decision tree या साधनाची ओळख करून दिली. अतुल गायकवाड, मुक्ता नावरेकर आणि स्वाती देशमुख या निर्माणींनी त्यांची निर्णयप्रक्रिया व प्रवास शेअर केला. प्रगती अभियानच्या अश्विनीताई कुलकर्णी, निर्माणची स्वाती देशमुख, अमृत बंग आणि प्रा. अॅंडी लमास यांनी भौगोलिक बंधने ओलांडत अनुक्रमे नाशिक, हैदराबाद आणि अमेरिकेतून शिबिरार्थ्यांशी संवाद साधला. धार्मिक असहिष्णुतेचा सध्या मुद्दा वारंवार चर्चेत वाचनात येत असतो. याच मुद्दयाला हात घालत नायनांनी कुराण मधील प्रमुख संदेश व मुस्लिम धर्माविषयी तसेच गीतेतील प्रमुख संदेशांविषयी सत्रे घेतली व मुस्लिम मित्रमैत्रिणी वाढवण्याचे आवाहन केले.
            . शिबिरात शिबिरार्थ्यांनी सादर केलेल्या नियोजनाचा शिबिरार्थ्यांची निवड करण्यासाठी आधार घेण्यात आला. तसेच वरील निकषांत बसत असल्यास इतरांनाही या शिबिरात सहभागी होण्यासाठी मेल पाठवण्याचे आवाहन करण्यात आले. ज्या मित्र-मैत्रिणींची असा निर्णय घेण्याची वेळ आली नाही, त्यांना तशी वेळ आल्यावर भविष्यात . शिबिरात सहभागी होता येईल.
  
दुष्काळाशी दुसरी झुंज
करके देखो’ च्या ब्रीदवाक्याने सुरु झालेला ‘निर्माण’चा ‘Action Learning Module’ हा उपक्रम दुसऱ्या वर्षात पदार्पण करत आहे. ‘निर्माण’ शिबिरांच्या पुढे जाऊन, वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांशी प्रत्यक्ष सामना करत ‘निर्माण’च्या शैक्षणिक प्रक्रियेला अजून प्रभावी करण्यासाठी मागील वर्षी ‘झुंज दुष्काळाशी’ आपण तरुणांपर्यंत घेऊन गेलो.
या वर्षी ‘झुंज दुष्काळाशी’ची तयारी आणि सुरुवात सध्या नाशिकमध्ये आपण करत आहोत. १९ फेब्रुवारीला ‘प्रगती अभियान’ सोबत नाशिकच्या युवा स्वयंसेवकांसाठी परिचय बैठक आणि प्रशिक्षण घेण्यात आले. त्यात नाशिकच्या जवळपासचे ३७ तरूण स्वयंसेवक उपस्थित होते, ज्यात अभियांत्रिकी आणि शेतकी महाविद्यालयातील विद्यार्थी जास्त संख्येने होते.
तू जिंदा है’ ने कार्यक्रमाची सुरुवात झाली. अश्विनी कुलकर्णींनी दुष्काळ कशाला म्हणायचं? पाऊस किती कमी झाला म्हणजे दुष्काळ पडला असं म्हणायचं? दुष्काळ मोजता येतो का? दुष्काळ कधी येतो आणि कधी जातो? शेतकऱ्यावर जनावरे विकण्याची वेळ का येते? त्याच्यावर सक्तीचं स्थलांतर का लादलं जातं? त्यांची क्रयशक्ती, घर, आरोग्य, मुलांचं शिक्षण, जेवण यांच्यावर काय परिणाम होतो? त्यांचे परिणाम कमी करण्यात ‘रोहयो’ काही भूमिका बजावू शकेल का? पाण्याच्या न्याय्य वाटपाचा विचार कधी व कसा करणार? असे अनेक प्रश्न अश्विनी ताईंनी उपस्थित केले.
प्रताप मारोडेने (निर्माण ४, प्रगती अभियान) दुष्काळासाठी सरकारी उपाययोजनांची माहिती दिली. प्रगती अभियानच्याच संगीता ताईंनी रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत येणारी कामे, ती राबवण्याची प्रक्रिया, जबाबदार अधिकारी, मिळणारे वेतन या विषयांना स्पर्श करत मनरेगाचं मोठं चित्र सर्वांसमोर ठेवलं.
शेवटच्या सत्रात प्रत्येक स्वयंसेवकाने एका-एका गावाची जबाबदारी स्वीकारली. या गावांत स्वयंसेवक मनरेगाबद्दल जनजागृती करतील, तसेच त्याअंतर्गत काम सुरू करण्यासाठी प्रयत्न करतील. नाशिकमधील सिन्नर, सटाणा आणि येवला या तीन तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांचा यात समावेश करण्यात आला आहे. सर्व स्वयंसेवक येत्या काही दिवसात आपापल्या गावांना एक भेट देऊन येणार आहेत. आणि ७ मार्चला सर्व जण पुन्हा भेटणार आहोत, आपापल्या गावातील अनुभव शेअर करायला.

सामाजिक कामाच्या नव्या संधी शोधण्यासाठी प्रथमेश निर्माण टीममध्ये दाखल !
            दर बॅचसोबत निर्माणमध्ये दाखल होणा-या युवांची व त्याचसोबत सामाजिक प्रश्नांवर काम करू इच्छिणा-या युवांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सामाजिक प्रश्नांवर काम करण्यासाठी नव्या संधी शोधण्याची गरज निर्माण झाली आहे. निर्माणींच्या गरजांनुसार स्वयंसेवी, सरकारी, CSR या क्षेत्रातल्या नव्या संधी, तसेच फेलोशिप्स शोधण्यासाठी प्रथमेश मुरकुटे निर्माण टीममध्ये दाखल झाला आहे. पुढील ६ महिन्यांत प्रथमेश पर्यावरण, जैवविविधता, ऊर्जा, पाणी, शेती, कचरा व्यवस्थापन, ग्रामविकास, आरोग्य, स्त्री सशक्तीकरण, शिक्षण, दुर्बल घटकांचे सशक्तीकरण इ. क्षेत्रातील नव्या संधी शोधणार आहे. प्रथमेशला त्याच्या शोधमोहीमेसाठी खूप शुभेच्छा!

IITB प्राध्यापकांची कार्यशाळा संपन्न
            डिसेंबर मध्ये IITB च्या विद्यार्थ्यांची कार्यशाळा शोधग्राम येथे झाली होती. हाच धागा पुढे नेण्यासाठी IITB च्या सात प्राध्यापकांनी फेब्रुवारी महिन्यात सर्चला भेट दिली. या भेटीची पुढील उद्दिष्टे होती -
·       IITB च्या प्राध्यापकांना गडचिरोलीची ग्रामीण व आदिवासी खेडी, तसेच सर्चचे काम याबद्दल अनुभवातून समजणे
·       भविष्यात निर्माण, सर्च व IITB यांना एकत्र येऊन काय करता येईल याबद्दल विचारमंथन करणे

            यानुसार सर्च आणि IITB चे प्राध्यापक व विद्यार्थी यांना एकत्रितपणे तंत्रविज्ञानाचा उपयोग करून कोणते समाजोपयोगी प्रोजेक्ट्स करता येतील याची यादी बनली. IITB च्या विद्यार्थ्यांना निर्माण प्रक्रियेत कसे सहभागी होता येईल, तसेच निर्माणच्या युवांना IITची काय मदत होऊ शकेल याविषयीही चांगली चर्चा झाली.

No comments:

Post a Comment