'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Sunday, 28 February 2016

बिजोत्सव २०१६: शुद्ध बीजापोटी . . .

मागील तीन वर्षांपासून सीमोल्लंघनमधून म्हणा, व प्रत्यक्ष भेटीतून म्हणा, ‘बिजोत्सव काय आहे?’ हे तुम्ही बऱ्यापैकी जाणताच.
            एकीकडे मोन्सेटो सारखी राक्षसी कंपनी संकरित बियाणे तयार करणारा जगातील सर्वात मोठ्ठा ‘Production Plant’ विदर्भात उभारण्याच्या तयारीत असताना पारंपारिक बियाणे जतन करून शाश्वत शेतीचा प्रसार करण्याचा तसेच जास्तीत जास्त लोकांना रासायनिक शेतीचे दुष्परिणाम समजावून सांगत, विषमुक्त, शुद्ध अन्न मिळविण्यासाठीचा एक लहानगा पण महत्वपूर्ण प्रयत्न म्हणजेबिजोत्सव
            १९ - २१ फेब्रुवारीदरम्यान नागपुरात पार पडलेल्याबिजोत्सव २०१६तील महत्वपूर्ण घडामोडींचा हा संक्षेप
            ‘Know your farmers – Connect with producers’ अशी थीम असलेल्या या वर्षीच्या बिजोत्सवात २०० लोकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. विशेष म्हणजे ‘Interactive Sessions’ मुळे जास्तीतजास्त सेंद्रिय शेतकऱ्यांना आपले अनुभव कथन करता आले.
जनसंवाद मोहीम: एका हाताने टाळी वाजत नाही!
            ‘सेंद्रीय शेतीया विषयाची जाण नेमकी किती लोकांना आहे हे जाणून घेण्यासाठी बिजोत्सवातील सहभागींनी गटागटांमध्ये नागपुरातील वेगवेगळ्या परिसरात जावून लोकांशी प्रत्यक्ष संवाद साधला.
            तुमच्या मते कोणता व्यवसाय सर्वात महत्वाचा? आपण कोणते तेल खातो? आपला भाजीपाला, अन्नधान्य कोठून येते? यासारख्या अनेक साध्या सोप्या प्रश्नांमधून आपली जनता स्वतःच्या अन्नाबाबत खरच किती जागरूक आहे यासाठीचा हा दुहेरी संवाद साधण्यात आला. त्यामुळे या कृतीला जन जागृती न म्हणता जनसंवाद मोहीम म्हणूया.
शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी:
            शेतकऱ्यांसाठी पारंपारिक व शुद्ध बियाणे तयार करणाऱ्या व बीज संवर्धनासाठी झटणाऱ्या डोरली या गावच्या ‘Seed Production’ कंपनीने ३५ गावांत स्वयंपूर्णता आणायला कशी सुरवात केली आहे, हे सांगणारे चंद्रशेखर डोर्लीकर; सगळीकडे BT कापूस थैमान घालून शेतकऱ्यांच्या जमिनी उध्वस्त करत असताना, अजूनही देशी कापूस उगवत असलेल्या अकोल्यातील काही प्रगतीशील शेतकरी; रासायनिक शेतीचे दुष्परिणाम तसेच सेंद्रिय शेती समजून घेऊन शेतकरी व ग्राहक यांचा प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित करून शेतमालाचा हमीभाव ठरवणे साध्य होऊ शकते असे सांगणाऱ्या करुणाताई फुटाणे; व्यवसाय सोडून किंवा वेळ काढून आवडीपुरती शेती करणाऱ्या अश्विनी औरंगाबादकर; सेंद्रिय शेती करतानाचे फायदे व त्यातील अडचणींचे कथन करणारे हेमंत मोहरीर यांसारखे आधुनिक शेतकरी; अशा एकापेक्षा एक वक्त्यांनी महत्तवपूर्ण व गमतीदार सत्रे घेतली.
झाडू आणि फळे:
            वलनी गावाच्या दोन झाडू बनवणाऱ्या कारागिरांनी येऊन सर्वांना सिंदीच्या झाडाच्या पानांचे झाडू कसे बनवावे याचे प्रशिक्षण दिले आणि आपल्या व्यवसायातील अडचणी संगीतल्या.
तेल इकॉनॉमिक्स:
            डोक्यावरील केस अकाली पांढरे होण्याचे एक कारण भेसळयुक्त तेल! नागपूरचे शुद्ध तेल पुरवणारे श्री. हर्षल अवचट यांनी तेलातील भेसळ, तेल उत्पादनातील आर्थिक गणित, लहान व्यावसायिकांसमोरील आव्हाने, लोकांची हतबलता तसेच शुद्ध तेल ओळखून ते पुरवण्याविषयी आपले अनुभव सांगितले.
            याशिवाय 'जनमंच' या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर व त्यांच्या एकजुटीसाठी काम करणाऱ्या NGO चे एक प्रगतीशील शेतकरी श्री. अमिताभ पावडे यांनी जनमंचच्या कार्याबद्दल मांडणी केली. शिवाय बीज स्वतंत्रता, स्वामिनाथन आयोग, सिंचन शोध यात्रा, याबाबत सांगताना शेतकरी व ग्राहक यांच्यातील दरी कमी करण्यासाठी ‘Know your farmer’ असा आग्रह केला. महाबीज चे प्रमुख श्री. एल. एच. मेश्राम व NSC चे डॉक्टर चौहान यांनी आपापल्या सत्रांमध्येबीजसंवर्धन व सुधारित वाणया बाबींमधील सरकार हतबल असून सेंद्रीय शेतीप्रसारासाठीची ही चळवळ अधिक आक्रमक करणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. कृषी विभागीय अधिकारी श्री. हेमंत चौहान यांनी सेंद्रिय शेती या विषयावरील सरकारची बाजू मांडली. प्रश्नोत्तरीच्या सत्रात त्यांनी राज्य व केंद्र शासनाचे सेंद्रीय शेतीविषयक धोरण व योजना काय आहेत, या योजनांचा लाभ घेताना काय अडचणी येतात, त्याच्या अधिक प्रभावी अंमलबजावणीसाठी आपल्याला कसा आग्रह धरता येईल याविषयी माहिती दिली.
आधुनिक पाउल पडते पुढे:
            या बिजोत्सवातील सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग! नागपुरातील निर्माणी, Feeding Indi मधून सहभागी झालेल्या तरुणांनी बिजोत्सव मध्ये महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पडल्या. गर्दीच्या जागी पथनाट्ये, जनजागृतीसाठी सोशल मिडीयाचा वापर, कार्यक्रमासाठीचे माहितीदर्शक पोस्टर्सबॅनर्स, चार्टस बनविणे, एवढेच नव्हे तर, शेतमाल खरेदी-विक्री साठी लावलेल्या स्टॉल्स ची व्यवस्था बघणे, शेतकऱ्यांचा राहण्या खाण्याची व्यवस्था लावणे, सत्रांमध्ये सहभागी होणे यांसारख्या जबाबदाऱ्या सुरळीतपणे पार पाडून आपला खारीचा वाटा उचलला
स्रोत: आशंका मामीडवार, ashanka.mamidwar@gmail.com


No comments:

Post a Comment