'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Saturday, 30 April 2016

आणि गोष्ट ‘कुलर त्यागाची’

सालईबन शिबिरात आलेल्या भन्नाट अनुभवाबद्दल बोलतोय आकाश पांडव...
            मी जळगावला (जि. बुलढाणा) शिकायला असल्याने सालईबन बद्दल ऐकलं होतं, तिथून पहाड दिसतात, छान निसर्ग आहे. मग शिबिराबद्दल जेव्हा कळलं, तेव्हा ठरवलं की काही दिवस छान पैकी मजा करून येऊ. तिथे पोहचलो तर पाहिलं, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून तरुण-तरुणी आल्या होत्या. अमोल शैलेशने घेतलेल्या खेळामुळे लवकरच सर्वांशी ओळख झाली. पुढे आतुरता होतीच की शिबिरात काय असणार, काय करावं लागणार, कोण मार्गदर्शन करणार, इ.
            त्यारात्री थोडीफार मस्ती करून आम्ही झोपी गेलो. शिबिराचा पहिला दिवस पहाटे लवकरच उजाडला, तो ही एका टेकडीवर सलग समतल चर खोदण्यापासून. इतकं मेहनतीचं काम पहिल्यांदाच करत होतो. जसं जसं ऊन तापत होतं, तशी ती जमीन माझा आणखी घाम काढत होती. दुपारी भर उन्हात, एक सावलीचा आडोसा धरून अजय होलेचं सेशन ऐकलं. सायंकाळी टेकडी चढून वडपाणी गाव फिरून आलो. पाय खूपच दुखत होते. जेवण करून पडलो एकदाचा जमिनीवर. पूर्ण दिवस आठवत होता. ती उन्हाची दुपार, आणखी किती दिवस याचा सामना करायला लागणारे, कोण जाणे? (निद्रस्त)
            दुसऱ्या दिवशीही चर खोदण्याचं काम. आज तितकं काम होत नव्हतं. सर्व अंग दुखत होतं. दुपारी अमोलच्या सेशनच्या अगोदर थोडा आराम केला, तेव्हाही भयंकर ऊन जाणवलं. मी घरून ज्या विचाराने आलो होतो, इथे भलतंच काही होत होतं. मनात विचार येत होता, इथे कसे राहणार आपण? घराची सारखी आठवण येत होती. घरचा तो थंड हवेच कूलर, त्याची ती थंड हवा सारखी मनात रेंगाळत होती. आज पर्यंत मी असा उन्हाळा अनुभवला नव्हता. कूलरच्या थंड हवेची आणि इथल्या उष्ण हवेची मनात कुस्ती चालू होती. हाही दिवस कसा तरी काढला. (निद्रस्त)
            तिसऱ्या दिवशी मातीच्या बंधाऱ्याचे काम होते. पण माझं कामात लक्षच नव्हतं. डोळ्यासमोर फक्त घरचा कूलर दिसत होता. शेवटी व्हायचं ते झालंच. कूलरच्या थंड हवेने इथल्या दुपारच्या ऊन्हाला चीतपट केले. सर्वजण जंगल सफारीला जात असताना मी वेळ साधली आणि सरळ गाडीवर बसून घर गाठलं. खूप खुश होतो तेव्हा, त्या खुशीत गादीवर पडल्या पडल्या झोप पण लागली थोडा वेळ. पण रात्री, मला काही झोप लागेना. दिवसभर त्या भर दुपारी काम करून रात्री जी झोप लागायची, ती आज कूलरच्या थंड हवेत देखील लागेना. रात्रभर विचार करत होतो. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर एवढंच नाही तर सौदी अरेबियातून सुट्टीवर आलेले मित्र तिथे एका उद्देशाने काम करत लढत होते. ते तर शहरातले, त्यांना किती त्रास होत असेल उन्हाचा? अन एक मी, पळून आलो? बस्स, ही गोष्ट मनाला जी झोंबली, तसा कूलरचा त्याग करत सकाळी पुन्हा सालईबनला हजर !
            आज तसा शिबिराचा चौथा दिवस, पण माझा खऱ्या अर्थाने पहिलाच! आज ना ऊन जाणवत होतं ना त्या थंड हवेची आठवण येत होती. मी घरून एक दृढनिश्चय करूनच आलो होतो, शिबिराच्या शेवटच्या क्षणापर्यंत थांबेल. या उन्हाशी झुंज देईन, खरी तर ती माझी माझ्याशीच झुंज होती. पाचव्या दिवशी तर उत्साह द्विगुणीत झालेला होता. बंधारा मूर्त स्वरूप घेताना दिसत होता. आज ना मी थकत होतो, ना थांबत होतो, फक्त चालत होतो.
ना थकना है, ना रुकना है
बस चलना है और चलना है

1 comment: