'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Saturday, 30 April 2016

रवाळा गावची फिजिओ

               क्रिकेटच्या मॅचमध्ये एखाद्या खेळाडूचा पाय लचकला, स्नायू दुखावला तर पळत पळत फिजिओ येतो. स्प्रे मारतो, खेळाडूकडून व्यायाम करवून घेतो. जणू काही झालेच नाही अशा अविर्भावात खेळाडू पुन्हा खेळू लागतो. मात्र खेड्यांत राहणारी ७०% जनता शरीरश्रमावर आधारित काम करते, त्यांची पाठकंबरदुखी कशी कमी करता येईल? या उत्तराच्या शोधात गौरी चौधरीने (निर्माण ४) तिच्या रवाळा गावात (जि. अमरावती, ता. वरूड) फिजिओथेरपीचा दवाखाना सुरू केला आहे. यासाठी तिला जनार्थ फेलोशिप मिळाली आहे.
            सर्चमध्ये गावपातळीवर काम करताना लोकांच्या पाठकंबरदुखीचा त्रास गौरीने खूप जवळून पाहिला. त्यानंतर वरूडच्या ग्रामीण रूग्णालयात गावोगावी लकव्याचे रूग्ण शोधणे ही तिची जबाबदारी होती. तिला ३० गावात तब्बल ५० रूग्ण मिळाले. लकव्याच्या रूग्णांना फिजिओथेरपी देऊन त्यांचे अपंगत्व कसे कमी करता येईल याचा तिला अनुभव मिळाला. आपला अनुभव आणि कौशल्य गावातल्या गरजूंपर्यंत पोचवण्यासाठी गौरीने रवाळ्यात दवाखाना सुरू केला आहे.
            रवाळा वरूडपासून १२ किमी दूर असून तिथली ६०% लोकसंख्या आदिवासी आहे. आपल्या तीन महिन्यांच्या अनुभवावर बोलताना गौरी म्हणते, "गावात फिजिओथेरपी ही उपचारपद्धतीच लोकांसाठी नवीन आहे. याबद्दल जागृती वाढवायची तर गावातल्या गरजू रूग्णांना सेवा देऊन तिचे परिणाम लोकांना दिसणे आवश्यक आहे. मात्र शहरातल्या हायफाय मशीन्सना गावातले रूग्ण बिचकतात, त्यामुळे खर्चही वाढतो. म्हणून मशीनवर कमीतकमी अवलंबन, व्यायाम व जीवनशैलीतील छोटे बदल आणि घरच्याघरी शेक यावर माझा भर असेल. गावात थोडे बरे वाटले की उपचार अर्धवट सोडले जातात. त्यामुळे दवाखान्याच्या भेटी कमी करण्यासाठी घरी सहज करण्यासारखे उपचार कसे शिकवता येतील यावर काम करणे मला आवश्यक वाटते.
            गौरीला तिच्या वाटचालीसाठी शुभेच्छा!

स्त्रोत- गौरी चौधरी, gauriec@gmail.com

No comments:

Post a Comment