'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Monday, 27 June 2016

गोटूल (गो टू लोकल) – एक नवी सुरुवात

सागर पाटील गेले काही महिने गडचिरोलीत बांबू आधारित रोजगार निर्मिती कशी करता येईल याच्या प्रयत्नात आहे. त्याचा या प्रयत्नांतील एक टप्पा असलेले बांबू हस्तकला केंद्र १६ जून २०१६ सुरु झाले. त्याच्या या कामाविषयी, त्याच्याच शब्दात -

मी सप्टेंबरमध्ये माविमची फेलोशिप पूर्ण केली. आता पुढे काय असा प्रश्न होता. तेव्हा मी साधारण महिनाभर गडचिरोलीत हिरामणजी वरखेडे (आदिवासी नेते) यांच्यासोबत इथली आदिवासी गावे समजावून घेण्याचा प्रयत्न केला. यासाठी गावात जाऊन लोकांना भेटलो, चर्चा केल्या, त्यांच्या रोजगाराच्या वेगवेगळ्या पर्यायांची चाचपणी केली. ‘गावात असलेल्या संसाधन व कौशल्य या माध्यमातूनच रोजगार निर्मिती करणे आवश्यक आहे; तरच गावातील विकासाला चालना मिळेलहा विचार या दरम्यान पक्का होत गेला.
आणि मग मोर्चा बांबू कडे वळला. कारण,
बांबू हे गडचिरोलीतील एक मुख्य संसाधन आहे. गडचिरोलीत ७० टक्के जंगल आहे. त्यामध्ये २.८ दशलक्ष टन बांबूचे उत्पादन होते. पण यातील ९५ टक्के बांबू हा पेपर मिल साठी जातो. पण गडचिरोलीतील बांबूवर फार कमी प्रमाणात मूल्यवर्धन होते. सरकारी विभाग प्रयत्नशील आहे पण ते फक्त प्रशिक्षणापुरते मर्यादित आहेत.
अशा वेळी मी केरळ बांबू फेस्टिवलला जाऊन आलो. तेथे बांबू उद्योगाचा भारतातील आवाका लक्ष्यात आला. चीन हा बांबूमध्ये अग्रेसर देश आहे. तर भारतात केरळ व ईशान्य-पूर्वेकडील सात राज्ये (नॉर्थ इस्ट स्टेट) पुढे आहेत. ‘आमच्याकडे बांबू नाहीअसं महाराष्ट्र सरकारने राष्ट्रीय बांबू मिशनला लिहून कळवले. यावरून महाराष्ट्र सरकार हे बांबू बद्दल किती उत्साही आहे, हे कळून येते...
गडचिरोलीत चांगल्या प्रतीचा बांबू आणि त्यावर कौशल्यपूर्ण काम करणारे लोक (बुरुड ही बांबू वर काम करणारी जमात) दोन्ही आहेत. बाजारपेठेत सध्या बांबूच्या वस्तूंची गरज जागतिक पातळीवर ३६ बिलियन डॉलर तर भारतात ४.५ बिलियन डॉलर आहे. भारतात बांबूखालील जंगल जवळपास १० मिलियन हेक्टर आहे. ही आकडेवारी आणि गडचिरोली जिल्ह्यात कमी असलेली रोजगाराची उपलब्धता पाहता आम्ही बांबू पासून रोजगार निर्माण करता येतील या निष्कर्षाप्रत आलो.

गोटूल - बांबू हस्तकला केंद्र
या कामासाठी एक असे सहायता केंद्र उभारावे; ज्याद्वारे आपण गावातील इच्छुक लोकांना डिझाईन, प्रशिक्षण, मार्केटिंग व इतर गरजेच्या सेवा पुरवू शकू. याविषयी नायना व सुनीलकाकांशी झालेल्या चर्चेअंती गावातील लोंकाना गरजेनुसार उत्पादनाचे प्रशिक्षण देऊन, बांबूच्या विविध वस्तूंचे उत्पादन आणि विक्री करावी असे ठरले.
या दरम्यान, एप्रिलमध्ये अमोल वाघमारे, राज्य साधन केंद्र, पुणे यांच्याशी ओळख झाली. त्यांनी येवली या गडचिरोलीतील गावात ३० महिलांना बांबू हस्तकला प्रशिक्षण दिले होते. आम्ही हा कार्यक्रम पुढच्या टप्प्यावर घेऊन जायचे ठरवले... म्हणजे प्रशिक्षणानंतर आता प्रत्यक्ष व्यवसाय सुरु करायचा होता... गावात महिलांसोबत झालेल्या बैठकीत आपण हस्तकलेचा प्रकल्प सुरु करावा असे ठरले. महिला तयार, आम्ही तयार व बाजारात मागणी पण आहे. पण आता मुख्य अडचण होती ती पैश्यांची,
आम्ही प्रकल्पाविषयी काही गोष्टी स्पष्ट ठरवलं होत्या 
1)      हा प्रकल्प व्यवसाय म्हणून उभा करायचा.
2)      फुकट किंवा फक्त योजना आहे म्हणून काम करायचे नाही.
3)      यात महिला किंवा कारागीर यांचा पूर्ण सहभाग हवा. (आर्थिक सुद्धा)
पैश्यांची अडचण आल्यानंतर आम्ही गणित मांडले. प्रती महिला बांबू अवजारे खरेदीसाठी २०००/- रु.अशी १०,०००/- रु. ची गरज होती. एक महिना ह्यात गेल्यानंतर आम्ही गरजेनुसार हत्यारे घेण्याचे ठरवले. पण सगळ्यांनी ३०० रु प्रमाणे ३०००/- रु जमा केले. आणि दोनजणी मध्ये एक हत्यारांचा सेट. (सध्या गरजेपुरता घेतले आहे) त्यातून २७००/- चे अवजारे व ३००/-रु.चा बांबू व इतर सामान खरेदी केले. आता पुढची अडचण होती जागेची, महिलांनी गावात ग्रामपंचायतीला राजीव गांधी सेवा भवन वापरू देण्याची मागणी केली. ग्रामपंचायतीने तो प्रस्ताव मान्य केला. आता सगळ जुळून आले होते. मग १६ जून २०१६ ला औपचारिकरीत्या गोटूलच्या पहिल्या हस्तकला बांबू केंद्राचे उद्घाटन झाले.
आम्हाला सध्या बांबूच्या कि-चेन्स, घड्याळे अशा काही वस्तूंची मागणी मिळाली आहे. यापुढे आता या केंद्रामार्फत बांबू राखी, बांबू पेनबॉक्स, बांबूचे आकाशकंदील व इतर वस्तू बनवून पुढील महिन्यात बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येतील. ही फक्त सुरवात आहे. उद्घाटन म्हणजे भविष्यातील पेलावयच्या आव्हानाचा सोहळा. तो आज आम्ही पार पडला आहे. भविष्यात सगळ्याच्या सोबतीने व आशीर्वादाने आम्ही तो पूर्ण करू अशी खात्री वाटते...
बांबूच्या ह्या वस्तू तुम्हीसुद्धा पाहू (फेसबुक पेज ची लिंक - https://www.facebook.com/GOTULCentre2015/) आणि आवडल्यास मागवू शकता . . .
सागर पाटील, (निर्माण ५)

No comments:

Post a Comment