'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday, 31 August 2016

पुस्तक परिचय - जातीप्रथेचे विध्वंसन - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

            आपण सगळेच निर्माणचे लोक भारतीय समाजव्यवस्था कशी असावी याचा विचार करत राहतो आणि हिंदस्वराज्यच्या जवळपास कुठतरी जाऊन थांबतो. मी ही तसाच जाऊन थांबलो. एवढ्या मोठ्या लोकसंख्येचं शहरीकरण करायला गेलो तर बकाल झोपडपट्ट्या अटळ आहेत हे पटत होतं, पण मगखेड्यात राहताना अन्यायकारक जातीव्यवस्था अटळ आहे का?’ याचं उत्तर शोधत होतो. त्यातून मगजातीप्रथेचे विध्वंसनहे पुस्तक दुसऱ्यांदा वाचायच ठरवल.
            हे पुस्तक म्हणजे १९३६ साली लाहोरच्या जात-पात तोडक मंडळाच्या वार्षिक परिषदेसाठी आंबेडकरांनी तयार केलेलं भाषण आहे. मंडळाला आंबेडकरांची मतं अस्वीकारार्ह वाटल्यामुळ त्यांनी परिषदच रद्द केली. त्यामुळे आंबेडकरांनी तयार केलेलं भाषण पुस्तक रूपात छापलं.
            भाषणाच्या सुरुवातीलाच आंबेडकर सामाजिक सुधारणांची प्राथमिकता पटवून देताना म्हणतात, ‘सामाजिक सुधारणांच्या आधी राजकीय किंवा आर्थिक सुधारणा केल्यास त्या सुधारणांचा फायदा समाजातील पुढारलेला वर्गच फक्त मिळवू शकतो. तसेच सामाजिक प्रश्न कायम असतील तर राजकीय आणि आर्थिक समस्या अधिक जटील बनतात.’ स्वातंत्र्यानंतर सरंजामशाहीनं मतपेटीतून मिळवलेली कायदेशीर मान्यता, उदारीकरणानंतर वाढलेली आर्थिक विषमता, आजचं जातीवर आधारित लोकशाहीतलं राजकारण आणि बेरोजगारीसारख्या आर्थिक प्रश्नाला सोप्पं उत्तर म्हणून केली जाणारी जातीय आरक्षणासाठीची आंदोलनं पाहून ते म्हणणं नक्कीच पटलं.
            त्यानंतर आर्थिक समानतेवर आधारित युरोपीय शैलीचा साम्यवाद आणू पाहणाऱ्या भारतीय साम्यवाद्यांना आंबेडकर सावध करतात की, ‘जातीभेद कायम असताना भविष्यात येणाऱ्या आर्थिक समानतेच्या स्वप्नांवर विश्वास ठेऊन भारतीय कामगार एकत्र येणार नाहीत.’ मागच्या ८० वर्षात ही सूचना खरी ठरलेली दिसते.
            जातीव्यवस्थेमुळ दलितांवर झालेल्या आणि होत असलेल्या अन्यायाची उदाहरणे दिल्यानंतर; जातीव्यवस्थेमुळे संपूर्ण भारतीय समाजाचं काय काय नुकसान झालंय हे लक्षात आणून देताना आंबेडकर म्हणतात, ‘जातीव्यवस्थेमुळं श्रमिक हवाबंद कप्प्यांमध्ये विभागले गेले. आपल्याला आयुष्यभर हेच काम करायचंय हे लहानपणीच मनावर बिंबवलं गेल्यामुळं कारागीरांमधला नवीन काही करून बघायचा उत्साह निघून गेला. त्यामुळं भारतीय समाज तंत्रज्ञानाच्या एकाच टप्प्यावर शेकडो वर्षे अडकून पडला. प्रत्येकाचे सगेसोयरे जातीतच असल्यामुळं समाजाच्या व्यापक हितापेक्षा वैयक्तिक जातीच्या हिताला जास्त महत्त्व दिलं गेलं. भारतीय समाज हा एक राष्ट्र न बनता स्वतःच्या स्वार्थी ध्येयापुरतं जगणाऱ्या युद्धखोर गटांचा समूह बनला; त्यामुळं कुठल्याच परकीय आक्रमणासमोर टिकू शकला नाही. जन्मावरून ठरणारा व्यक्तीचा सामाजिक दर्जा आयुष्यभर तोच राहत असल्याने प्रगती करण्याची इच्छा कोणामधेच राहीली नाही. त्यामुळं भारतीय समाज कुठलीही प्रगती न करता आहे त्या स्थितीत फक्त टिकून राहिला.’
            शेवटी जातीव्यवस्थेच विध्वंसन कसं करता येऊ शकतं याबाबत आंबेडकरांनी वेगवेगळे उपाय सुचवलेत. त्यापैकी प्रमुख उपाय म्हणजे आंतरजातीय विवाह वाढवणे आणि जातीव्यवस्थेला मान्यता देणारा धार्मिक आधार उखडून टाकणे हे आहेत. हे आणि बाकीचे उपाय पुस्तकात तपशीलवार वाचता येतीलच.
            गांधीजींनी हे भाषण वाचल्यानंतर त्यातील काही मुद्द्यांवर मतभेद नोंदवणारे लेख हरिजन मधून लिहिले आणि आंबेडकरांनी त्याला पत्राद्वारे उत्तर दिलं. या दोन्हीचा समावेश पुस्तकाच्या शेवटी एका परिशिष्टात करण्यात आला आहे. या चर्चेतील चातुर्वर्ण्य व्यवस्था, वंश परंपरागत व्यवसाय, कोणते हिंदू धर्मग्रंथ प्रमाण मानावेत? यासारखे मुद्दे आज कालबाह्य झाल्यासारखे वाटतात; पण हिंदू धर्माकडं बघण्याच्या दोघांच्या दृष्टीकोनात मूलभूत आणि प्रचंड फरक असल्याचं लक्षात येतं. आजही तो फरक दोघांच्या आजच्या अनुयायांपर्यंत झिरपत आलेला स्पष्टपणे दिसतो.
            तर हे पुस्तक वाचल्यानंतर आणि इतर काही लोकांचं म्हणणं समजून घेतल्या नंतर माझ असं मत बनल की, जातीव्यवस्था हा मोठा विषय आहे. जातीव्यवस्था म्हणजे अमेरिकन/ग्रीक गुलामगिरीसारखी शोषक-शोषित अशी सरळ सरळ विषम विभागणी नाही. जातीव्यवस्था म्हणजे शिया-सुन्नी, प्रोटेस्टंट-कॅथलिक, दीनयान-महायान, श्वेतांबर-दिगंबर अशी एकाच पातळीवरची मतभिन्नता नाही. धनगर, वंजारी, भिल्ल लोक जातीव्यवस्थेला निव्वळ गावगाड्यातली उतरंड ठरवू देणार नाहीत. जैन, बोहरा, पारशी लोक जातीव्यवस्थेला हिंदूंपुरतं मर्यादित ठेवू देणार नाहीत. आणि संपूर्ण भारतातल्या चार हजार जातींना चातुर्वर्ण्य व्यवस्थेत कोंबण्याचा प्रयत्न म्हणजे निव्वळच भोंदूगिरी आहे.
            सध्या प्रत्येकच जात दिवसेंदिवस अधिकाधिक आक्रस्ताळ्या स्वरूपात आपल अस्तित्व दाखवून देताना दिसतीये. आपले प्रश्न मांडण्यासाठी सुशिक्षित उच्चशिक्षित तरुणांना जातीचं व्यासपीठ जवळचं वाटतंय. खून, बलात्कारासारख्या घटनांवर कशी प्रतिक्रिया द्यायची हे आरोपीची, पिडीत व्यक्तीची आणि स्वतःची जात बघून ठरवलं जातंय. प्रत्येक जातीतून एका व्यक्तीसाठी महापुरुषपद आरक्षित करण्याच्या सरकारी धोरणाला लोकांचा वाढता पाठींबा मिळतोय. आपल्या जातीचा खरा इतिहास जगासमोर आणण्यासाठी अनेक तरूण संशोधक दिवसरात्र मेहनत करतायेत. जातीव्यवस्थेचा भक्कम आधार असणारी गावगाड्यातली शेतीकेंद्रित उत्पादन व्यवस्था औद्योगिक जीवनशैलीच्या दबावाखाली कोसळून गेलीये; त्याचा परिणाम म्हणून वाढलेल्या महाराष्ट्रातल्या शहरीकरणासोबत गावातून येवून शहराच्या गर्दीत सेटल झालेले काका लोकं आपल्या जुन्या आयडेंटीटीच्या शोधात आपापल्या जातीची वावटळं उठवतायेत आणि गावातले/शहरातले उच्चशिक्षित बेरोजगार तरुण त्या वावटळांमधे वाळलेल्या चिपाडासारखे उडतायेत.
            कदाचित आणखी शहरीकरण वाढल्यावर, औद्योगिकीकरण वाढल्यावर, उपभोक्तावाद वाढल्यावर, व्यक्तिवाद वाढल्यावर जात खिळखिळी होईलही. पण जर या सगळ्याला वाईट ठरवून आपण पुन्हा खेड्याकडे चला असं म्हणणार असू तर खेड्यातली जातीव्यवस्था कशी नष्ट करायची किंवा कशी सुधारायची, याच काहीतरी व्यावहारिक उत्तर शोधायलाच लागेल. ‘कुठलही काम हलक्या दर्जाच नाहीकिंवासर्वजण एकाच हरीची लेकर आहेतअसे तात्विक युक्तिवाद नाहीत टिकणार.


निरंजन तोरडमल (निर्माण ५),  

No comments:

Post a Comment