'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday, 31 August 2016

पाऊले चालती...

            महेश लादे (निर्माण ४) बायफ विकास संशोधन केंद्र (वारजे, पुणे) येथे वरिष्ठ प्रकल्प अधिकारी म्हणून काम पाहतो. दरवर्षी पंढरीच्या वारीमध्ये ग्रामीण तंत्रज्ञान दिंडीचे आयोजन बायफकडून करण्यात येते. हे दिंडीचे तिसरे वर्ष. दिंडीमध्ये करत असलेल्या तंत्रज्ञान जनजागृतीबद्दल आणि त्याच्या अनुभवाबद्दल सांगतोय महेश...

"आषाढी वारीचे निमित्त साधून फार पूर्वी पासून संतांनी ग्रामीण जनतेला प्रगतीचा व समतेचा संदेश दिला आहे. मला बरेच लोक विचारतात की तू वारीला जातो म्हणजे आस्तिक झाला की काय? विठ्ठलाची भक्ती करायला लागला की काय? काम सोडले की काय? पण मला वाटतं की वारीला आस्तिकता आणि नास्तिकता याच्या पलीकडे जाऊन, एक संधी म्हणून आपण बघावं. आणि तसं केलं तर आपल्याला बऱ्याच गोष्टी साध्य करता येतील. वारीमध्ये खूप कचरा होते, वारीनंतर मागे खूप घाण शिल्लक राहते म्हणून अशा वारीत आपण सहभागी होता कामा नये, अशी टीकादेखील आपल्या निर्माणच्या काही मित्रांनी केली. परंतु माझं असं मत आहे की मी सहभागी झालो काय किंवा नाही झालो काय, जी घाण आणि कचरा व्हायचा तो होणारच. मग बाहेर बसून फक्त टीका करत बसण्यापेक्षा वारीत सहभागी होऊन त्या बद्दल काय करता येईल, हा विचार करावा, जन जागृती करावी. हा पर्याय मला जास्त योग्य वाटला आणि म्हणून मी वारीत सहभागी झालो.
वारीमध्ये माझा सहभाग हा माझ्या कामाचाच एक भाग आहे. आम्ही बायफमार्फत वारीमध्ये ग्रामीण तंत्रज्ञान दिंडीचे आयोजन करतो. ज्यामध्ये आम्ही जगभरातील शेती आणि ग्रामीण उपयोगी तंत्रज्ञान, त्याची माहिती, प्रारूप (मॉडेल) शेतकऱ्याच्या माहिती करता ठेवतो. दरवर्षी प्रमाणे यावर्षीदेखील आम्ही ग्रामीण तंत्रज्ञान दिंडीचे आयोजन केले होते. बायफमध्ये सध्या मी महाराष्ट्र ग्रामीण अभिनव तंत्रज्ञान प्रसार प्रकल्प (महानेत्र) या प्रकल्पावर काम करत आहे. त्या प्रकल्पाचा मुख्य हेतू हा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांपर्यंत सुयोग्य व शाश्वत तंत्रज्ञान पोचवणे व त्या माध्यमातून सामाजिक व आर्थिक विकास घडवणे, हा आहे.
वारी हे एक असे व्यासपीठ आहे, जिथे महाराष्ट्रतील जवळ जवळ सर्व भागांतून व सर्व स्तरांतून ग्रामीण जनता सहभागी होत असते. वारीच्या माध्यमातून त्यांच्या पर्यंत आपण सहज पोहचू शकतो, असा माझा तीन वर्षांचा अनुभव सांगतो. वारीमध्ये आम्ही कृषी, पशुधन, जलसंपदा, अपारंपरिक ऊर्जा (सोलर,बायोगॅस, .) या चार मुख्य विषयांवर माहिती देतो. तसेच सोलर ड्रायर (महिला उद्योग उभारणीसाठी), सोलर पंप (शेती व पिण्याचे पाणीपुरवठा), सौरदिवे (बायफच्या बचत गटांनी बनवलेले), सौर कीड सापळा, सौर कुंपण, कीडरोधक धान्य साठवण पिशवी तसेच बायफ नेपियर, बायफ बाजरा, आफ्रिकन टॉल मका अशा पिकांच्या जातीही विक्रीसाठी ठेवत असतो. याबरोबरच दुष्काळी भागात कमी पाण्यात चारा उत्पादन करण्याचे तंत्रज्ञान जसे की हायड्रोफोनिक्स, अझोला, चाऱ्याचे निवडुंग अशा बऱ्याच नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती आम्ही शेतकऱ्यांना देतो.


वारीत तसे बरेच अनुभव येतात. त्यापैकी वारंवार येणारा अनुभव म्हणजे सोलर पंपाच्या बाबतीत लोक पडणाऱ्या पाण्याला हात लाऊन बघतात की पाणी गरम लागतं का? तसेच काही लोक मला प्रश्नदेखील विचारतात की या पंपाचं बिल कुठे भरायचं? एकीकडे आपण तंत्रज्ञानाच्या बाबतीत खूप पुढे गेल्याचे दावे करतो आणि दुसरीकडे आपला गावातील शेतकरी बेसिकच्या ही खूप मागे आहे. असे काही प्रसंग समोर आले की डोक्यात हजारो प्रश्न जन्म घेतात आणि कळतं की अजून बरंच काम करावं लागणार आहे.
महेश आणि मित्रांनी वारीसाठी गाणी बनवली आहेत. त्यातील एक गाणं 'चल गड्या जाऊ'- http://picosong.com/xjDB/  

महेश लादे (निर्माण ४)

No comments:

Post a Comment