'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday, 31 August 2016

माझा रोजा - एक संस्मरणीय अनुभव

शरीराची शुद्धी, कुरान पठन आणि जगातील अनेक कमनशिबी लोकांप्रती समवेदना यासाठी मुस्लीम बांधव रमझानच्या महिन्यात रोजे पाळतात. आसाममध्ये psychiatry शिकणा-या निलेश मोहीतेने (निर्माण ३) आपल्या मुस्लीम मित्रांसोबत रोजे ठेवले. आतून-बाहेरून ढवळून काढणा-या या अनुभवाने निलेशला काय शिकवले?
            खरंतर आयुष्यात मी कधी उपास-तापास केलेच नाहीत. घरी आई कधीकधी उपास करायची. पण तो उपास म्हणजे change in food असायचा. त्यादिवशी नेहमीपेक्षा थोडे वेगळे पदार्थ खाल्ले जायचे. आयुष्यात पहिला उपास मी ३० जानेवारी २०१० ला गांधी पुण्यतिथीला निर्माण ३.१ कॅंपमध्ये केला. तो एक सुंदर अनुभव होता, पण तो २४ तासांचा उपास करण्यासाठी आणि निभावून नेण्यासाठी निर्माणचं प्रेरणादायी वातावरण कारणीभूत होतं. त्या दिवसानंतर मी परत कधीच उपास केला नाही. कारण उपास करण्यासाठी काही ठोस कारणच नव्हते.
            दोन वर्षांपूर्वी Psychiatry शिकण्यासाठी मी तेजपूर, आसामला आलो. इथं आल्यवर माझं सामाजिक वर्तुळ पूर्णपणे बदललं. महाराष्ट्राप्रमाणे इथे धर्माचे, जातीचे, वर्गाचे बंध त्रासदायक नव्हते. इथे माझे खूप सारे मुस्लीम, ख्रिश्चन, हिंदू, आदिवासी, बौद्ध धर्माचे मित्र झाले. त्यांच्याकडून मला खूप सा-या नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. आमच्या हॉस्पिटल मध्ये खूप सारे मुस्लीम पेशंट येतात. आजूबाजूला काम करणारे वेगवेगळ्या सामाजिक पार्श्वभूमीचे आहेत.
            आमच्या हॉस्टेलचा कुक शानू हा माझा खास मित्र. मी त्याला खूप सा-या महाराष्ट्रीय रेसिपीज् शिकवल्या, तर त्याने मला पूर्वांचलच्या रेसिपीज्. शानू आणि मी रोज रात्री एकत्र जेवायचो. तो माझी रोज वाट पहायचा. आमच्या मैत्रीमध्ये शानू मुस्लीम आहे हे मी कधीच विसरलो होतो. शानूप्रमाणे माझे खूप सारे मित्र मुस्लीम होते. रमजान महिना सुरू होण्याच्या आधी शानूने मला सांगितलं की उद्यापासून एक महिना आम्ही एकत्र जेवू शकणार नाही. मस्करीमध्ये मी पण त्याला म्हटलं, 'मग मी पण जेवणार नाही.' मी हे बोलून तर गेलो, निभावून कसं नेणार हे माहीत नव्हतं. दोन दिवसांपूर्वीच आमच्या सिस्टरनी त्यांच्या ९ वर्षांच्या मुलाने एक महिना कसा रोजा पूर्ण केला हे सांगितलं होतं. मी जास्त विचार न करता उपास करायचं ठरवून टाकलं.
            पहिल्या दिवशी हॉस्पिटलमध्ये खूप पेशंट होते, त्यामुळे मला खायचा विचार करायला वेळच नाही मिळाला. पहिल्या दिवशी मी पाण्याची बाटली घेऊन गेलो नाही, त्यामुळे पाणी आणि जेवण दोन्ही टाळता आलं. संध्याकाळी ४ नंतर मला सडकून भूक लागली, पण ६.११ वाजेपर्यंत (अजान होईपर्यंत) मला थांबणं भाग होतं. ते दोन तास वाट बघणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. मी १५ मिनीटे आधीच जेवणासाठी गेलो तर माझ्या मुस्लीम मित्रांनी तेव्हाच जेवणाचं व फळांचं ताट वाढून ठेवलं होतं. मी खूष झालो, पण मला कल्पनाच नव्हती की पुढची १५ मिनीटे इतकी कठीण असतील. १५ मिनीटे आम्ही delayed gratification अनुभवणार होतो. प्रचंड भूक लागली असताना आणि समोर चविष्ठ अन्नपदार्थ असतानासुद्धा कंट्रोल करायला शिकणं हा माझ्यासाठी नवीन आणि छान अनुभव होता.
            पहिल्या दिवशी व्यस्त असल्यामुळे भूक इतकी जाणवली नाही. परंतु दुस-या दिवशी मी तसा मोकळा होतो. त्यावेळी खूप त्रास झाला. मग मी स्वतःला दुस-या कामात गुंतवलं आणि माझा जेवणाचा विचार निघून गेला. संपूर्ण महिन्यात मी एक गोष्ट अनुभवली की आपल्याला नेहमीच्या खाण्याच्या वेळेसच भूकेची जाणीव होते. ती वेळ एकदा टाळली की आपण भूक सहज कंट्रोल करू शकतो. पुढे एक महिना मी हीच strategy वापरली. मी संध्याकाळी ६.१५ वाजता जेवायचो आणि रात्री ११ ला थोडी फळं खायचो. इतर वेळी काहीच नाही.
            या सर्व प्रक्रियेमध्ये मला स्वतःच्या आतल्या आणि बाहेरच्या खूप सा-या गोष्टींकडे नव्याने बघण्याची दृष्टी मिळाली. मी माझ्या शारीरिक आणि मानसिक क्षमता पडताळून पाहू शकलो. जर जगामध्ये १०० कोटी माणसं एका वेळी उपवास करू शकतात, तर आपण का नाही? जर माझे खूप सारे मानसिक पेशंट मित्र स्वतःला कंट्रोल करू शकतात, तर मी का नाही? एका महिन्याच्या शेवटी या प्रश्नांचं उत्तर माझ्याकडे होतं, 'होय, आपण नक्कीच करू शकतो. आपल्याला वाटतं तेवढं ते कठीण नक्कीच नाही.' एका महिन्यात मला बरेच शारीरिक फायदे झाले. माझं वजन ४ किलोंनी कमी झालं, गॅसचा त्रास कमी झाला, त्वचा उजळली इ. पण या सर्व शारीरिक फायद्यांपेक्षा मानसिक फायदा जास्त मोठा होता. मला या प्रक्रियेमध्ये फार समाधान आणि आनंद मिळाला. सुरूवातीला माझ्या खूप सा-या हिंदू मित्रांना हा खुळचटपणा वाटला. काही जणांनी मला 'आता मुस्लीम धर्म घेणार का?' असे मिश्कीलपणे विचारले पण. पण माझा उत्साह बघून माझे अजून काही मित्र काही दिवसांसाठी माझ्यासोबत join झाले. आम्ही ही काहीही न खाण्याची पार्टी खूप enjoy केली. आता पुढच्या वर्षीच्या रमजानची वाट पाहतोय, कारण पुढच्या वर्षी तुमच्यातले बरेचसे मित्र मला join करतील याची मला खात्री आहे.
            कठीण आहे म्हणता??
            "कर के देखो."

निलेश मोहीते (निर्माण ३), 

No comments:

Post a comment