'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday, 31 August 2016

कल्याण टांकसाळेच्या मदतीने राजस्थानच्या महिलांची ३ सौर दुकाने

               कल्याण टांकसाळे (निर्माण २) गेले काही महिने आय. आय. टी मुंबई बरोबर ‘वन मिलियन सोलर प्रोग्राम’मध्ये काम करत आहे. या उपक्रमाअंतर्गत विशिष्ठ कालावधीत भारतातील १० लाख ग्रामीण मुलांपर्यत सौरदिवे पोचवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. कल्याण गेले सहा महिने ग्रामीण भागातील सोलर तंत्रज्ञानाचा परिचय झालेल्या महिलांपैकी काही महिलांना प्रशिक्षित करून त्यांचे सोलर व्यवसाय उभे करण्यासाठी प्रयत्नशील आहे. महिलांच्या आणि कल्याणच्या प्रयत्नांना फळ आले असून राजस्थानमध्ये उदयपुरच्या दक्षिणेला डूंगरपुर नावाच्या गावात १५ महिलांनी मिळून सोलरच्या ३ दुकान सुरु केली आहेत.
  
          डूंगरपुर हा आदिवासी बहुल आणि अतिमागास भाग आहे. पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारी शेती आणि रोजगार हमी योजनेतून मिळणारी  मजूरी सोडली तर ग्रामीण भागात उपजिविकेची साधनेच नाहीत. पुरुष स्थलांतर करून जातात. महिलाना अनेकवेळेला तोही पर्याय उपलब्ध नसतो. देशात सर्वत्र अशा महिला बचत गटांच्या सदस्य होतात, तशा त्या इथेही संघटित झाल्या आहेत. त्यांनी काहीतरी व्यवसाय उद्योग करून आपल्या परिवारासाठी उपजिविकेचं साधन निर्माण करावे अशी अपेक्षा असते. डूंगरपुरच्या महिलानी नुकतंच ते प्रत्यक्षात करून दाखवलं. स्वत:चे तीस हजार रुपये गुंतवण्याची ३ महिलांनी जोखीम पत्करली, इतर महिलांना तयार केलं आणि सोलरच्या दिव्यांची ३ दुकाने सुरु केली. पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी जिल्हाधिकारी, तहसीलदार, फौजदार अशा अधिका-यांच्या हस्ते दुकानांचं उद्घाटन केले. एका दुकानाला तर राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया यांनी देखील भेट दिली.
            ‘राजीविका’ या राजस्थानमधील नॅशनल रूरल लाइव्हलिहूड मिशनने आय आय टी मुंबईच्या वन मिलियन सोलर प्रोग्राम अंतर्गत डूंगरपुरमध्ये शालेय विद्यार्थ्यांना सोलर दिवे बनवून देण्याचा कार्यक्रम केला. अशा व्यवसायाचे स्वरूप ठरवणे, स्थानिक गरजेचा अभ्यास करणे, महिलाना उद्योजक बनवण्यासाठी प्रोत्साहित करून त्यांना प्रशिक्षण देणे, सोलर उत्पादकांसोबत त्यांना जोडून देणे असे प्रयत्न कल्याण करतो आहे. यातील आनंदाची बाब म्हणजे या तीन महिलांनी सुरु केलेल्या दुकानांनी पहिल्या आठवड्यातच प्रत्येकी सरासरी ८०० रुपयांचा नफा कमावला आहे. कल्याणला आणि त्याच्या उपक्रमाला मन:पूर्वक शुभेच्छा!

कल्याण टांकसाळे (निर्माण २),

No comments:

Post a Comment