'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday, 31 August 2016

खोलवरचा अपघात

ज्योती सदाकाळ (निर्माण ) प्राथमिक आरोग्य केंद्र, परिंचे (ता-पुरंदर, जि-पुणे) येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. मीटिंगला जात असताना ज्योतीला अपघात झालेला, रक्ताने माखलेला पेशंट दिसला. उशीर होऊ नये म्हणून मीटिंगला निघून जायचे का पेशंटला मदत करायची? असे प्रसंग सर्वांवर कधी कधी येतातच. आपण काय प्रतिसाद देतो त्यामुळे पेशंटवर आणि आपल्यावर खोल परिणाम होत असतो.

            "त्यादिवशी शनिवार होता. घाईघाईने आवरुन DHO मीटिंग साठी ambulance ने मी, सिस्टर आणि ड्रायव्हर मामा बारामतीला निघालो होतो. पुणे -बारामती हायवे. मीटिंगची धास्ती होतीच. उशिरा पोहचलो तर शिस्तभंगाची कारवाई! अशा विचारांत असतानाच हायवेवर एके ठिकाणी खूप गर्दी दिसली. ड्रायव्हर मामा म्हणाले, 'मॅडम, इथे रोजच अपघात होतात. Danger zone आहे हा. आपण इथून निघूया पटकन, नाही तर मीटिंगला उशीर होईल.' मी थक्कच झाले. थोड्या चढ्या आवाजातच त्यांना गाडी थांबवायला सांगितली. गाडी थांबली.
            मी पटकन खाली उतरून पेशंटला रस्त्यातून बाजूला घेतले. बघ्यांचा जमाव बराच होता, पण रक्ताने माखलेल्या पेशंटला उचलण्यासाठी विनंतीवजा मागणी करावी लागली ! पटकन पेशंटला stable केले, तसेच ambulance साठी १०८ ला फोन लावला. लोकांची कुजबुज सुरु होती, तर काही लोक निघून गेले होते. दोघा-तिघांनी आम्हाला चांगली मदत केली. १०८ ची गाडी आल्यावर आम्ही पुढे निघालो. मोजून १० मिनीटे दिली आम्ही फक्त तिथे. निघताना पेशंट स्टेबल झाला होता आणि मी सुद्धा.
            -२ लोकांनी टाळ्यादेखील वाजवल्या आणि म्हणाले, “मॅडम, खरंच तुमच्यासारख्या अधिकाऱ्यांची गरज आहे. नाहीतर इथे accident झालेला पाहून, लोक स्वतःला उशीर होईल म्हणून अजून फास्ट निघून जातात. पण तुम्ही थाबंलात, मनापासून आभारी!खूप छान वाटलं कौतुकाचे ते दोन शब्द ऐकून. सुदैवाने खूप रक्त नव्हतं गेलं म्हणून पेशंट बरा होता.
            गाडी थांबवताना माझ्या लक्षातही आले नाही की मी डॉक्टर आहे, इथे मदत करणे माझे कर्तव्य आहे. फक्त एकच प्रश्न मनात आला होता, की ह्याच जागी मी जखमी होऊन पडली असते तर??”

ज्योती सदाकाळ (निर्माण ),

No comments:

Post a Comment