'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 27 October 2016

खादी, ब्लॉक प्रिंट आणि कार्बन फुटप्रिंट

            पूर्ण जगभरात कार्बन फुटप्रिंट कमी कसा करता येईल यावर बरीच चर्चा चालू असते. आधुनिकीकरणामुळे प्रत्येक कृतीमागचा कार्बन फुटप्रिंट प्रचंड वाढला आहे. या प्रश्नाला उत्तर शोधायला स्वतःपासून सुरुवात करायची म्हटलं तर खादी हा एक छान उपाय आहे.
            आपण खादी वापरत असताना सर्वात महत्वाचे म्हणजे गावातील लोकांना रोजगार उपलब्ध करून देतो; देशातील कापूस पिकवणाऱ्या शेतकऱ्याला कापसाचा बरोबर मोबदला मिळेल यासाठी हातभार लावतो. संपूर्ण खादी निर्मिती ही कुठल्याही यंत्राच्या सहायाने होत नसल्याने याचा निसर्गावर होणारा परिणाम देखील अत्यल्प आहे. गांधीजी म्हणायचे की गाव या सौर यंत्रणेतील, खादी हा सूर्य आहे.            तर अशा या बहुपयोगी खादीचा समाजात अधिकाधिक प्रसार कसा करता येईल, यावर विचार करत असताना खादी आणि ब्लॉक प्रिंट यांची उत्तम जोडी साधून खादीचे कपडे बनवण्याचे मी ठरवले. आधीच प्रिंटींगच्या व्यवसायात असल्यामुळे मला या विषयाबद्दल आणखीच गोडी निर्माण झाली. म्हणून केंद्र सरकार द्वारा चालू असलेले ब्लॉक प्रिंटींगचे शिक्षण मी घेतले.
            पुढचे पाऊल म्हणजे या शिक्षणाचा माझ्यासाठी व समाजासाठी होणारा उपयोग. म्हणूनच या दिवाळी पासून मी खादी आणि ब्लॉक प्रिंटचे उत्पादन सुरु करत आहे. खादी निर्मित शर्टस, कुर्ती आणि साडी वगैरे akdee.co.in या संकेतस्थळावर आणि सोबतच नागपूरमध्ये लवकरच उपलब्ध करत आहे. या अगदी साध्या आणि सोप्या माध्यमातून निसर्गाचा होणारा बराच ऱ्हास टाळता येतो, आणि आजच्या भाषेत बोलायचं झाल तर कार्बन फुटप्रिंट कमी करता येतो. पाण्याची प्रचंड टंचाई असलेल्या महाराष्ट्रात यामुळे थोडं का होईना पाण्याची बचत होईल! या प्रकारचे छोटे प्रयोग गाव पातळीवर करण्यात आले तर लोकांच्या रोजगारासोबतच इतर सामाजिक प्रश्न सोडवण्यात देखील मदत होईल.

            तर आरोग्यासाठी, निसर्गासाठी आणि एकूणच समाजासाठी भरपूर उपयोगी असा हा खादी आणि ब्लॉक प्रिंटचा प्रयोग आहे. आपण सर्वजण देखील खादीचा अधिकाधिक वापर करून या प्रयोगाला यशस्वी करण्यात आपला हातभार लावूयात...

आकाश नवघरे (निर्माण ६),

No comments:

Post a Comment