'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 27 October 2016

संपादकीय

नमस्कार मित्रमैत्रिणींनो...

निर्माण ७ ची प्रवेशप्रक्रिया पूर्ण

गेले ३ महिने सुरु असलेली निर्माण ७ ची प्रवेशप्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली. या वर्षी खूप चांगला प्रतिसाद मिळाला. ७ व्या बॅचसाठी ३६ जिल्ह्यातून ५४५ , तर महाराष्ट्राबाहेरूनही ९ फॉर्म्स आले होते. निर्माण टीमने यापैकी ३६० हून अधिक जणांच्या मुलाखती घेतल्या. यावर्षी बऱ्याच मुलाखती स्काईप (Video Calling) द्वारे देखील घेण्यात आल्या. Concern (सामाजिक प्रश्नांविषयी वाटणारी तळमळ), Drive (हे प्रश्न सोडविण्यासाठी कृती करण्याची तयारी) व Talent (सामाजिक प्रश्न सोडविण्याची क्षमता) हे निकष लावून १८६ जणांची निर्माण शिबिरांसाठी निवड करण्यात आली. ह्या वेळी मिळालेला एवढा चांगला प्रतिसाद पाहून यावर्षी प्रथमच ७.१ अ, ७.१ ब आणि ७.१ क अशी तीन शिबिरे होणार आहेत.
मागील काही दिवसात या सगळ्यासाठी निर्माण टीमचे खूप फिरणे झाले. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना भेटता आले. निर्माण टीमला मुलाखतींच्या नियोजनात मदत केली. चांगले आदरातिथ्य पण केले!! तुमच्या घरच्यांनीदेखील खूप सहकार्य केले. सर्वांचे मनापासून धन्यवाद...

निर्माणची सहावी ऑक्टोबर कार्यशाळा संपन्न

            निर्माणच्या शिबिरातून गेलेले जे निर्माणी पूर्णवेळ काम करत आहेत त्यांच्यासाठी दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात आयोजित करण्यात येणारी कार्यशाळा यावर्षीदेखील मोठ्या उत्साहात पार पडली. ७ ते ११ ऑक्टोबर दरम्यान झालेल्या या कार्यशाळेत निर्माणच्या पहिल्या बॅचच्या सात वर्ष कामाचा अनुभव असणाऱ्यांपासून ते ६ व्या बॅचच्या नुकतीच कामाला सुरवात केलेले असे एकूण ४४ निर्माणी सहभागी झाले होते. या सर्वांना एकत्र भेटणे हा आनंददायी सोहळा असतो.
            या शिबिरात प्रसिद्ध नाटककार महेश एलकुंचवार यांनी त्यांच्या शैलीत सामाजिक कार्यकर्त्याच्या जीवनातील कलेचे स्थान या विषयावर आपले विचार मांडले. सेल्कोचे हरीश हांडे, ‘असरच्या रुक्मिणी बॅनर्जी यांची सत्रे स्काईपचा (Video Calling) वापर करून आयोजित करण्यात आली. त्यांनी आपल्या कामाबद्दलचे अनुभव निर्माणींसोबत शेअर केले. नायनांनी केळकर समितीच्या अहवालाचा संदर्भ, त्यांनी वापरलेली पद्धती आणि त्या निमित्ताने नायनांचे झालेले शिक्षण तसेच काम करत असताना data चा वापर कसा करावा याबाबत मार्गदर्शन केले. सहभागी निर्माणींनी देखील मागील वर्षभरातील त्यांच्या कामाचे स्वरूप, झालेले शिक्षण, कामाची पुढील दिशा, त्यांना पडलेले प्रश्न व त्यांचा वैयक्तिक प्रवास सर्वांसोबत शेअर केला. एकंदरीत हा अनुभव खूप उत्साह वाढवणारा होता.

                                        सीमोल्लंघन ला सहा वर्ष पूर्ण             
 
निर्माणची शिबिरे झाल्यानंतर आपल्या सर्वांना जोडून ठेवण्यासाठी तसेच महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राबाहेरही पसरलेल्या आपल्या मित्रांची खबरबात देण्यासाठी सहा वर्षांपूर्वी दसऱ्याच्या मुहूर्तावर सीमोल्लंघनची सुरवात झाली. स्वतःच्या परिघाबाहेर पडून विविध सामाजिक प्रश्नांवर काम करण्याचा मार्ग निवडून निर्माणी आपल्या आयुष्यात एक प्रकारचे सीमोल्लंघनच करत असतात. त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी, त्यांच्या धडपडीतून आणि अनुभवातून आपले शिक्षण देखील व्हावे यासाठी स्व-अनुभव, वैचारिक लेख, वैचारिक कविता, पुस्तक परिचय पाठवणाऱ्या मित्राचं, या बातम्या आपल्या पर्यंत पोहोचाव्या म्हणून वेळ काढणाऱ्या पत्रकाराचं आणि तुम्हा सर्व सीमोल्लंघकांचं मनापासून अभिनंदन!

मैं जिन्दगीका साथ निभाता चला गया...


निखिल जोशी (निर्माण ४) आणि केदार आडकर (निर्माण ५) हे दोघेही अनुक्रमे गेली ५ वर्षे व ३ वर्षे निर्माण टीमचा भाग आहेत. कंप्युटर इंजिनिअर असलेला निखील गेली सहा वर्षे सर्चमध्ये कार्यरत होता. तंत्रज्ञानाचा वापर करून सर्चची आरोग्यसेवा अधिक सोप्या आणि प्रभावी पद्धतीने आदिवासी गावांत कशी पोहोचवता येईल, हा निखिलच्या कामाचा मुख्य विषय होता. सोबतच निखिल निर्माणच्या समन्वयक टीमचा सदस्यदेखील होता. निर्माणच्या समन्वयकाची जबाबदारी पार पाडत असताना, ‘सीमोल्लंघन’च्या संपादकाची मुख्य जबाबदारी निखिलने फार सुरेख आणि यशस्वीरीत्या सांभाळली. पर्यावरण हा जिव्हाळ्याचा विषय असलेल्या निखिलने शोधग्राममधील घनकचऱ्याच्या प्रश्नावरही काम केलं.मानवी संसाधन आणि सुविधा नियोजनात ११ वर्षे अनुभव असलेला केदार २०१२ पासून सर्चमध्ये रुजू झाला. सर्चमधील मेसच्या जबाबदारीपासून सुरूवात केलेला केदार नंतर ‘निर्माण’च्या समन्वयकाच्या भूमिकेत आला. सर्च हॉस्पिटल आणि कर्मचारी यांचे एकूण नियोजन, शोधग्रामला भेट देणारे पाहुणे, पर्यटक तसेच निर्माण शिबिरार्थी यांचे व्यवस्थापन ही केदारची मुख्य जबाबदारी होती. केदार निर्माण समन्वयक टीमचा सदस्य होता आणि ‘सीमोल्लंघन’च्या संपादकीय मंडळाचा सदस्यदेखील होता. निखिलप्रमाणे केदारही शोधग्रामच्या घनकचऱ्याच्या प्रश्नावर काम करत होता. शोधग्राममधील किशोरवयीन मुलांना घेऊन केदारने ‘कुमार निर्माण’ या उपक्रमात सहभाग घेतला होता आणि एक वर्ष निमंत्रकाची जबाबदारीही पार पाडली.
निखिल आणि केदार यांना ‘निर्माण’ टीमचे महत्त्वाचे अंग म्हणून आपण सर्वजण ओळखतो. आपण करत असलेल्या कामाची खोली वाढवण्यासाठी तसेच आपल्या काही कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी दोघांनीही शोधग्राम सोडण्याचा निर्णय घेतला. २५ ऑक्टोबर हा दोघांचाही शोधग्राममध्ये शेवटचा दिवस होता.
निखिल आणि केदार, दोघांनाही त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

No comments:

Post a Comment