'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday, 10 January 2017

विज्ञान आश्रमात बनतोय गरीबाला परवडणारा कृत्रिम हात...

           आपण घेतलेल्या शिक्षणाचा समाजासाठी काहीतरी उपयोग व्हावा, असं मला नेहमी वाटायचं. मी ह्या गोष्टीबद्दल खूप विचार करत होते की ‘मला काय करता येईल?’. कॉलेज सुरू असताना हा शोध चालूच होता, त्याच दरम्यान ‘विज्ञान आश्रम’बद्दल कळालं. विज्ञान आश्रम येथे Design Innovation Center मध्ये फेलोशीपसाठी नुकतेच अॅप्लिकेशन सुरू होते. मी त्यासाठी माझा अर्ज पाठवला आणि माझी निवड झाली. ‘इच्छा तिथे मार्ग’ म्हणतात ते हेच.
          अपंगांना त्यांची दैनंदिन कामं करता यावी म्हणून कृत्रिम हात वापरला जातो. पण त्याची किंमत सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर आहे. सामान्य माणसाला परवडेल असा कमी किमतीचा पण तितक्याच गुणवत्तेचा आणि उपयुक्ततेचा कृत्रिम हात (Low Cost Prosthetic Hand) तयार करणे, हा माझा प्रोजेक्ट आहे. Open source असलेले काही निवडक हात आणि उपलब्ध असलेल्या resourses मधून हे कसं साधता येईल, यावर काम चाललंय. आधुनिक तंत्रज्ञानाचा (3D printing) उपयोगही ह्या प्रोजेक्टमध्ये आम्ही करतोय.
         निर्णय घेताना मला वाटलं देखील नव्हतं की एवढा मोठा प्रोजेक्ट करण्यासाठी मी सक्षम आहे. पण हळू हळु सर्व काम व्यवस्थित होत गेलं. आता ६ महिने झाले आहेत विज्ञान आश्रममध्ये काम सुरु करून. खूप काही मोठं काम नाही केलं पण काही तरी समाजाला योगदान देतोय, वेगळं करतोय ह्याचं समाधान नक्कीच आहे. कॅम्पस प्लेसमेंट सोडून विज्ञान आश्रम जॉईन करणं तसं कठीण होतं माझ्यासाठी. पण मनात इच्छा फार होती आणि घरातून पाठबळ मिळाल्यावर मी मागे वळून बघितलच नाही. काम करताना एक वेगळीच मजा येतेय. पुढे आरोग्य क्षेत्राशी निगडीत तंत्रज्ञानावर काम करण्याचा विचार आहे.
        शिक्षणाने बायोमेडिकल इंजिनिअर असलेल्या निर्माण ६ च्या प्राची समर्थने नुकताच विज्ञान आश्रम मधील तिच्या कामाचा अनुभव शेअर केला. तिला तिच्या पुढील कामासाठी शुभेच्छा !


प्राची समर्थ, (निर्माण ६)

No comments:

Post a Comment