'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday, 10 January 2017

कुमार निर्माणची चौथी निमंत्रक प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न...

किशोर वयीन मुलांमध्ये सामाजिक बुद्धिमत्ता आणि वैश्विक मानवी मुल्यांची रुजवणूक व्हावी म्हणून सुरु झालेल्या ‘कुमार निर्माण’ या कृती आधारित उपक्रमाने ह्या वर्षी चौथ्या वर्षात पदार्पण केलं. उपक्रमातील निमंत्रकांना (मुलांच्या गटाला मार्गदर्शन करणारी मोठी व्यक्ती म्हणजे निमंत्रक) ‘कुमार निर्माणच्या उद्देश्यांची व कार्यपद्धतीची सविस्तर माहिती व्हावी, मुलांसोबत काम करणे त्यांच्यासाठी सहज सोपे व्हावे, त्यासाठी लागणारे कौशल्य त्यांना पुरवता यावे यासाठी तीन दिवसीय निमंत्रक प्रशिक्षण कार्यशाळा जे. पी. नाईक सेंटर, पुणे येथे आयोजित करण्यात आली होती.संपूर्ण महाराष्ट्रभरातून आलेल्या जवळपास ६७ निमंत्रकांच्या सक्रीय सहभागामुळे प्रशिक्षण कार्यशाळेची उत्साहवर्धक सुरूवात झाली. अगदी २० वर्षांपासून ते ६८ वर्षांपर्यंतचे निमंत्रक यात सहभागी होते. या वर्षी अर्ज केलेल्या सर्वच इच्छुक निमंत्रकांची सरसकट निवड न करता, अर्ज वाचून त्यातून अर्जदारांची प्रत्यक्ष वा फोनवर मुलाखत घेतली होती.
शिबिराच्या सुरुवातीलाच नायनांनी (डॉ. अभय बंग) स्काईपच्या माध्यमातून निमंत्रकांशी संवाद साधला.  कार्यशाळेत कुमार निर्माणच्या टीमने विविध सत्रांच्या माध्यमातून ‘कुमार निर्माण’ ची संकल्पना समजावून सांगितली. सोबतच ‘कुमार निर्माण’ला पूरक, आवश्यक कौशल्ये मिळवीत म्हणून बालभवनच्या संचालिका शोभा भागवत यांनी शिक्षण कशासाठी व कसे या बद्दल आणि खेळघराच्या कार्यकर्त्या शुभदा जोशी यांनी शालेय वयोगटातील मुलांच्या वाढीची प्रक्रिया, मुलांमध्ये कृतीकार्यक्रमांची बीजे कसे रोवावीत व गटांशी संवाद कशाप्रकारे साधावा या विषयी निमंत्रकांना मार्गदर्शन केले. केदारने खेळांचे महत्त्व, त्यातून होणारे शिक्षण, चित्रपटातून कसे शिकावे, चित्रपटाचा वापर करून कृतीकार्यक्रम कसे सुचवावे आणि डायरी का लिहावी याबद्दल विस्तृतपणे सांगितले. हरीश कुलकर्णी यांनी निमंत्रकांना कथाकथनाची कला यावर मार्गदर्शन केले. एकंदरीत ही कार्यशाळा मोठ्या उत्साहात पार पडली.

येत्या वर्षातील उपक्रमांसाठी कुमार निर्माणच्या टीमला खूप खूप शुभेच्छा !

No comments:

Post a comment