सन 2006 साली डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांच्या प्रेरणेने सुरु झालेला'निर्माण' हा युवांसाठीचा उपक्रम...
'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध'ही संकल्पना मध्यवर्ती ठेवून तरुणांसाठी विकसित केलेली ही एक शिक्षणप्रक्रिया...
समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...
'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!
गेल्या एका महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त दर महिन्याला आपल्यासाठी घेऊन येतील निखिल जोशीjosnikhil[at]gmail[dot]com, केदार आडकर kedaradkar[at]gmail[dot]comव सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी -http://nirman.mkcl.org,http://en.wikipedia.org/wiki/Nirman

Saturday, 4 March 2017

मेडिकल ते मेळघाट – आरोग्य समस्या सोडवण्याचा एक प्रयत्न

नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे ६५  विद्यार्थी व नागपूरचेच सुपर स्पेशालिटी चे २२ तज्ञ डॉक्टर्स असे मिळून ८७  लोकांनी मेळघाटमधील ‘हातरु – चिलाटी’ ता. चिखलदरा येथे  ४ ते ११ फेब्रुवारी या काळात  या आदिवासी खेड्यात आरोग्यसेवा दिली, निर्माण ६ चा रोहित गणोरकर याचा यात सहभाग होता. त्याच्या या अनुभवाबद्दल....

पार्श्वभूमी
हातरु हे नागपूर वरून सुमारे साडेतीनशे किमी दूर असणारे आदिवासी खेडे मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये आहे. जेथे जाण्याकरिता पक्के रस्ते नाहीत त्यामुळे तेथील लोक इतर सुविधासोबत जोडलेले नाहीत. गेल्या २-३ वर्षात वीज आलेली आहे पण लगतच्या खेड्यांमध्ये नाही. वीज ६ तास असते सौर उर्जेचे दिवे आलेले आहेत. सेमाडोह – हातरु हा मुख्य रस्ता पावसाळ्यात बंद असतो. हातरु च्या PHC अंतर्गत १४ गावे येतात. २०११ च्या जनगणनेनुसार या १४ गावांची लोकसंख्या ८२५५ आहे. यापुढील आरोग्य सेवा घेण्यासाठी लोकांना ७५ किमी दूर परतवाड्याला जावे लागते. जाण्याकरिता एकच  बस आहे, ती पावसाळ्यात बंद असते.
मेळघाटमध्ये शिबीर घेण्याची तयारी व नियोजन डिसेंबरपासून सुरु झाली. आम्ही ८-१० जणांनी मेळघाटमधील आरोग्याची नेमकी गरज शोधण्यासाठी सातव सरांच्या ‘महान’ या संस्थेला भेट दिली व त्यांची गावातली कामे समजून घेतली. सेमाडोह व आजूबाजूच्या आरोग्य संस्थांना देखील भेटी दिल्या. सर्वप्रथम मा. कलेक्टर साहेब व धारणीतील आरोग्य अधिकारी यांची परवानगी घेतली. हातरु प्रथिमिक आरोग्य केंद्राची जागा कॅम्पची ठरवली व आम्ही पुढील तयारीला लागलो.


कामाची पद्धत
आमच्या कामाचं ध्येय हे ठरवलं –
अ) हातरु PHC  मधील सर्व गाव acute & chronic illness साठी screen करणे
ब) पेशंटला तज्ञ डॉक्टरांद्वारे तपासणी करणे व इलाज करणे
५ फेब्रुवारीला हातरुला पोहोचलो. ५-८ फेब्रुवारी सलग ४ दिवस आम्ही ३३ मुले वन विभागाच्या विश्राम गृहात रात्री आराम करून सकाळी सर्वे करत होतो. PHC च्या अॅम्बुलन्स व काही बाईक असे मिळून आम्ही ४ दिवसात १४ गावांचा सर्वे केला. सर्वे वरून आम्ही दुपारी परतत होतो. जेवण करून पुन्हा एका गावात आरोग्य शिक्षणाचा कार्यक्रम - प्रोजेक्टर वर सादरीकरण, पथनाट्य व संवाद याद्वारे करत होतो.
     ९ तारखेला १९ डॉक्टर्स हातरु येथे उपस्थित झाले. आम्ही अॅम्बुलन्स पाठवून पेशंटना बोलावून घेतले. हृदय रोग तज्ञापासून तर मूत्रविकार तज्ञ आले होते. डॉक्टरांनी तपासणी व उपचार केले. दुसऱ्या दिवशी पण खूप पेशंट आले. तपासणीनंतर कॅम्प यशस्वी  झाला म्हणून आम्ही  फोटो काढले.

परिणाम
·       १४ गावांची पूर्ण लोक संख्या - ८२५५
·       मेडीकलच्या विद्यार्थ्यांद्वारे केल्या गेलेल्या Screening मध्ये रोगी असणार्‍यांची संख्या  - ११०३
·       ९-१० फेब्रुवारी च्या opd ला येणाऱ्या पेशंट ची संख्या  - ९०८
·       रेफर केलेल्या पेशंटची संख्या - ७२
·       आमच्या लक्षात आलेले प्रमुख आजार (chronic) - पाठ दुखण्याचा त्रास, गुडघे व सांधेदुखी, मोतीबिंदू, हर्निया , पक्षाघात

मी काय शिकलो
या अनुभवातून मी समुहाने काम करणे, कामाचे नियोजन व व्यवस्थापन करणे, व्यक्ती आणि त्याचं कौशल्य ओळखून त्याला काम देणे तसेच लवकर निर्णय कसे घ्यायचे हे शिकलो. मी विना मोबाईल नेटवर्क राहू शकतो, हे माझ्या लक्षात आले. आमचा ६० लोकांचा ग्रुप झाला त्याला आम्ही ‘आरोग्यम’ नाव दिले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर ला  रेफर केलेल्या पेशंटची पुढचा उपचार व आमचा ६० जणांचा गट अभ्यास सांभाळत पुढील प्रवास कसा होतो हे बघू पुढे...

रोहित गणोरकर, निर्माण ६

No comments:

Post a Comment