'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Sunday, 5 March 2017

वॉटर कप : स्पर्धा दुष्काळाला हरविण्याची

सत्यमेव जयते या जनजागृती माहितीपर मालिकेच्या यशानंतर आमीर खान, सत्यजीत भटकळ व सत्यमेव जयतेच्या टीमला असे वाटले की जनजागृतीची गरज होतीच आणि आहेच पण त्याने प्रश्न सुटतीलच असे नाही. तर त्या साठीकाही कृतीची आवश्यकता आहे. म्हणून महाराष्ट्रामधील मागील ३ वर्षापासून दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन पाणी या प्रश्नावर काम करायच ठरलं व पानी फाउंडेशनची स्थापना झाली. त्या अंतर्गत मागील वर्षी सत्यमेव जयते वॉटर कपया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जे गाव अधिक चांगली पाणलोटाची कामे करेल ते विजयी होईल. मागील वर्षी ३ तालुक्यांत ही स्पर्धा आयोजित केली गेली. या वर्षी ३० तालुक्याची निवड झाली आहे, त्यात उमरखेड जि. यवतमाळ व आर्वी जि. वर्धा या तालुक्याचा समावेश आहे.
मागील ६ वर्षांपासून उमरखेड तालुक्यातील स्वतःच्या मन्याळी गावात व इतरही गावात विविध प्रश्नावर काम करणारा निर्माण २ चा आपला मित्र संतोष गवळे तसेच सेलू तालुक्यातील आमगांव(मदनी) गावात राहून सेंद्रिय शेती व उद्योग आधारित जीवन जगताना गावात काम करणारा निर्माण ४ चा आपला मित्र मंदार  देशपांडे यांची पानी फाउंडेशनच्या जलसंधारणाच्या कामात अनुक्रमे उमरखेड तालुका समन्वयक व आर्वी तालुका समन्वयक म्हणून निवड झाली आहे. डिसेंबर २०१६ पासून कामाला सुरवात पण झाली.
पुढील ३ महिने या तालुक्यातील गावांमध्ये पाणलोटाच्या कामांचे नियोजन व श्रमदानातून कामे होणार आहेत. या स्पर्धेबद्दल अधिक माहितीसाठी -  http://www.paanifoundation.in/mr/about-satyamev-jayate-water-cup-marathi/

पहिल्या टप्प्यातील कामादरम्यान आर्वी येथे मंदारने एक कल्पना राबवली. ती त्याच्याच शब्दात~
वॉटर कप स्पर्धेत सहभागी होण्याची शेवटची तारीख होती ३१ जानेवारी. शेवटच्या टप्प्यात अधिक गावांना या स्पर्धेत सहभागी करून घेण्यासाठी २६ जानेवारीच्या ग्रामसभांचा उपयोग करून घेता येईल अशी कल्पना मला सुचली. या कामासाठी मी मदतीचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देऊन २५ स्वयंसेवक मित्र-मैत्रिणी आले. २५ जानेवारीला संध्याकाळपर्यंत सगळे जमा झाले. रात्री त्यांचे orientation झाले व उद्या कोण कुठे जाईल याचे नियोजन केले.


दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही वेगवेगळ्या ग्रामसभांमध्ये स्पर्धेची माहिती देणारी फिल्म दाखवली व त्यांच्या शंकांचे निरसन केले आणि आनंद आहे की गावांनी उत्तम प्रतिसाद दिला. यातील १५ जण अजून पुढील काही दिवस मदतीसाठी थांबले आणि उरलेल्या गावांपर्यंत याची माहिती पोहचविली, तसेच काकडधरा गावात झालेली पाणलोटाची कामे समजून घेतली. आलेल्या अनुभवांची तालुक्याच्या SDO, BDO व तहसीलदार यांच्यासोबत चर्चा केली.
यातून आलेल्या मुलांचेही शिक्षण झाले. गाव कसे असते, ग्रामसभा काय असते, पाण्याचा प्रश्न कसा आहे, त्या सोडवण्यासाठी कोणी काही केले आहे का, इतर प्रश्न कोणते आहेत असा अभ्यास त्यांनी केला त्यांचे अनुभव ऐकायला खुप मजा आली. त्यातील काही अनुभव खाली दिले आहेत –
२६ जानेवारीच्या दिवशी ग्रामसभेत जाऊन या स्पर्धेविषयी माहिती दिली. लोकांसमोर विषय मांडायचा, एकत्र विचार करून त्यातून निर्णयापर्यंत यायचं, हे पाहता आलं. गावातील लोकांना कसे समजावयाचे? त्यांना विश्वास वाटेल असं वागायचं हे शिकायला मिळालं. पाण्यासोबतच त्यांच्या व्यसन, शेती बद्दलच्या समस्यादेखील कळाल्या. एकजुटीने केलं की अवघड वाटणारी कामेदेखील सोप्पी होतात हे समजले. – बिंदिया तेलगोटे, अकोला

ग्रामसभेत एकट्याने जाऊन विषय मांडणं आव्हानात्मक होतं. सोरटा गावातील २५-३० ग्रामस्थांशी बोलताना गावच्या प्रशासनाचे अनेक पैलू समजले. ग्राम प्रशासनात लोकांचा सहभाग किती महत्त्वाचा असतो हे समजले. समोरच्याचे म्हणणे कसे ऐकून घ्यावे ही गोष्ट पाहायला मिळाली. याआधी मी फक्त पुस्तक, वर्तमानपत्रात वाचून अंदाज बांधायचो की दुष्काळी परिस्थिती आहे, पण इकडे येऊन अगदी ४ किमी दूरच्या गावात भौगोलिक परिस्थिती मुळे कसा फरक पडतो हे दिसले. या सगळ्यातून क्षेत्र भेटी, लोकांमध्ये राहून त्यांना समजावून घेऊन काम करण्याचे महत्त्व कळले. – सागर बेंद्रे, निर्माण ७


मी पहिल्यांदाच ग्रामसभा अनुभवली. गावातील लोकांशी चर्चा झाली, त्यांना विचार पटवून द्यायचा असेल तर कसे सांगावे हे शिकायला मिळाले. गावातल्या समस्यांबाबत प्रशासनातील व्यक्तींशी चर्चा करता आली. निर्माणचे नवीन मित्र मिळाले. माझ्या दैनंदिन जीवनातील मित्र क्रिकेट, फिल्म याच्यापलीकडे काही बोलतच नाहीत, पण इथे मुलं लोकांच्या अडचणी कशा सोडवायच्या यावर चर्चा करत होती, त्यांची वैचारिक पातळी देखील वेगळी होती. या सर्वच अनुभवांचा मी माझ्या गावी व आजूबाजूला बदल घडवून आणण्यासाठी उपयोग करेन. – रिंकेश मोरे, नाशिक
पुढेही या कामादरम्यान तुमच्या सहकार्याची गरज आहे. ज्यांना यात सामील व्हायचे आहे त्यांनी संतोष व मंदारशी संपर्क करावा.
  
मंदार देशपांडे, निर्माण ४                                                                संतोष गवळे, निर्माण २

mandar9999@gmail.com                           sgawale05@gmail.com

No comments:

Post a comment