'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Sunday, 5 March 2017

नमस्कार मित्रमैत्रिणींनो…

कसे आहात?
अर्थपूर्ण जीवनाच्या शोधात आपला प्रत्येकाचाच प्रवास सुरु झालेला आहे. सर्व निर्माणींचे ह्या प्रवासातले अनुभव, त्यांच्या कामात येणाऱ्या अडचणी, यश, खबरबात इ. सर्वांपर्यंत पोहोचावे म्हणून आपण ६ वर्षांपूर्वी ‘सीमोल्लंघन’चा घाट घातला होता.
मग? तुमच्याकडेही असेलच की काहीतरी सांगण्यासारखं... शेवटी आपल्या सगळ्यांचा प्रवास तर एकच आहे, ‘या जीवनाचे काय करू?’ अनुभव फक्त वेगळे.
मग या प्रवासातले अनुभव आम्हाला कळवत रहा... आम्ही इतर निर्माणींनाही ते सांगत जाऊ.
२०१७ ह्या नवीन वर्षाचा हा पहिलाच अंक. मागच्या दोन महिन्यांत शोधग्राममध्ये आणि महाराष्ट्रात व इतरही ठिकाणी विखुरलेल्या निर्माणींच्या आयुष्यातील घडामोडींचा हा लेखाजोखा तुम्हाला सुपूर्त करत आहोत...


निर्माण ७.१ बॅचचे ब (वैद्यकीय) आणि क (मिश्र) शिबीर संपन्न

‘तारुण्यभान ते समाजभान’ ही थीम घेऊन निर्माण ७ ‘ब’ आणि ‘क’ बॅचचे पहिले शिबीर शोधग्राम येथे मोठ्या उत्साहात पार पडले. त्यात अनुक्रमे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून आलेले ५७ आणि ५३ असे युवक-युवती सहभागी झाले. शिबिरात प्रामुख्याने स्वची ओळख आणि स्वतःला पडलेले प्रश्न यांवर भर दिला गेला.


निर्माण ७ बॅचचे वैद्यकीय युवांचे पहिले शिबीर ४ फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी दरम्यान शोधग्राम येथे पार पडले. महाराष्ट्रातल्या मुंबई, औरंगाबाद, यवतमाळ, कोल्हापूर, नागपूर, इ. शासकीय तसेच जळगाव, पुणे येथील खासगी अशा वेगवेगळ्या वैद्यकीय महाविद्यालयातील एकूण ५७ युवांनी शिबिरात सहभाग नोंदवला. शिबिरात नायनांनी ‘आजच्या वैद्यकीय शिक्षणाकडे वळून बघताना’ आणि ‘आरोग्य स्वराज्य’ या खूप महत्त्वाच्या विषयांवर प्रकाश टाकला. सोबतच शिबिरार्थ्यांशी प्रश्नोत्तरीही केली. अम्मांनी ‘मां दंतेश्वरी दवाखाना’ मूर्त स्वरुपात येण्याची गोष्ट सांगितली. योगेश दादाने त्याचा अमेरिकेतून भारतात परत येण्याचा प्रवास सगळ्यांसमोर उलगडून दाखवला. ‘बार्कर्स हायपॉथेसिस’ वर बेतलेल्या शोधनिबंधातून संशोधन कसे असावे, शोधनिबंध कसा पहावा आणि आरोग्य क्षेत्रात संशोधनाचे महत्त्व योगेशदादाने समजावून सांगितले. सामाजिक विषमता हा विषय सुनील काकांनी आजच्या परिभाषेत समजावून सांगितला. आपल्या सामाजिक कामाच्या प्रेरणा, वैद्यकीय सेवा देण्यासाठी माझ्यासाठी आदर्श सेक्टर कोणते, माझी आर्थिक गरज किती यांबाबत अधिक स्पष्टता यावी, म्हणून अमृत आणि आकाशने वेगवेगळे exercises घेतले. प्रथमेश हेमनानी आणि शिवाजी खोसे या आपल्या डॉक्टर मित्रांना ते काम करत असलेल्या ठिकाणी (पेंढरी आणि धानोरा) जाऊन भेटलो आणि त्यांचा एका वर्षातला अनुभव ऐकला. हृषीकेश मुन्शीने मागच्या दोन वर्षांचा आदिवासी आरोग्यावर काम करताना आलेला त्याचा अनुभव सर्वांसोबत शेअर केला. तसेच फार्मा कंपनीचे माजलेले लोन एका केसस्टडीच्या रुपात त्याने समजावून सांगितले.


यावर्षी नव्याने सुरु झालेली निर्माण ७ ची ‘क’ बॅच बऱ्याच अंगांनी विशेष होती. ह्या बॅचमध्ये वेगवेगळ्या शैक्षणिक, भौगोलिक, आर्थिक स्तरातून आलेल्या युवांचे वैविध्य स्पष्ट दिसत होते. शिबीर १८ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी दरम्यान शोधग्राममध्ये पार पडले. या शिबिरात अम्मांनी वयात येणे, प्रेम आणि आकर्षण यातला फरक हे विषय समजावून सांगितले. याही शिबिरात सुनील काकांनी सामाजिक विषमतेचा राक्षस शिबिरार्थ्यांना दाखवला आणि त्यातले आपले योगदान किती आणि कसे हेही समजावून सांगितले. ‘आनंद’ फक्त हा एक शब्द घेऊन प्रफुल्ल शशिकांतने आनंदी जगणे हा विषय समजावून सांगितला, आणि सेशन संपताना ‘आनंदापलिकडे आणखी मौल्यवान काही आहे का?’ हा प्रश्न शिबिरार्थ्यांना विचार करायला सोडून दिला. ‘स्वचा स्वीकार’ आणि आपल्या दुःखांच्या मुळाशी असलेला अविवेकी विचार हा विषय डॉ. आरती आणि अमोलने समजावून सांगितला. आपल्या सामाजिक कामाच्या प्रेरणा, वैद्यकीय सेवा देण्यासाठी माझ्यासाठी आदर्श सेक्टर कोणते, माझी आर्थिक गरज किती यांबाबत अधिक स्पष्टता यावी, म्हणून अमृत आणि आकाशने वेगवेगळे exercises घेतले. शिबिरात निखील जोशी, हृषीकेश मुन्शी, धीरज वाणी आणि रश्मी महाजन यांचा सामाजिक काम करत असतानाचा प्रवास ऐकला. तसेच नायनांसोबत प्रश्नोत्तरीही झाली ज्यातून युवांच्या विचारांत अधिक स्पष्टता यायला मदत झाली.

मूल्यव्यवस्था अधोरेखित करणारी माया स्टोरी, जितो जितना जीत सको, विनोबांचे निवडक लेख, नोबल प्रोफेशनचा कट असे विविध सेशन्स अमृत आणि प्रफुल्लने घेतले. तसेच शिबिरार्थ्यांनी वाचलेली अनेक छान छान पुस्तकांची समीक्षा सर्वांसमोर मांडली गेली आणि कमीत कमी वेळात अनेक पुस्तकांची ओळख झाली. ‘ब’ आणि ‘क’ शिबिरांत अनुक्रमे ‘निरोज् गेस्ट’ आणि ‘फायर इन द ब्लड’ अशा दोन फिल्म्स दाखवल्या गेल्या, ज्या पाहिल्यानंतर शिबिरार्थ्यांनी त्या रात्रीचे जेवण घेतले नाही. अशाप्रकारे निर्माण ७.१ ची तीनही शिबिरे संपन्न झाली.
निर्माण परिवारात दाखल झालेल्या सर्व निर्माणींचे स्नेहपूर्वक स्वागत !
भेटू लवकरच... ६ महिन्यांनी !


सतीश गिरसावळे (निर्माण ७) निर्माण टीममध्ये सामील

मुळचा चंद्रपूरचा असलेला सतीश १० जानेवारीपासून निर्माण टीमसोबत काम करण्यासाठी सर्चमध्ये रुजू झाला. शिक्षणाने इंजिनिअर असलेला सतीश निर्माण ७ व्या बॅचचा शिबिरार्थी आहे. सतीश हा उत्तम कलाकार आहे आणि पथनाट्य हा त्याच्या आवडीचा विषय आहे. निर्माण शिबिरांच्या नियोजनात मदत करणे, निर्माणचे महत्त्वाचे डॉक्युमेंटेशन करणे, निर्माणींशी संपर्क वाढवणे, इ. कामांची जबाबदारी सध्या सतीशकडे आहे. सर्चच्या दारू-तंबाखू विरोधी कार्यक्रमात सतीशच्या नाट्यकलेची मदतही होते.
सतीशचे निर्माण टीममध्ये स्नेहपूर्वक स्वागत !


‘उत्तर शोधण्याचा प्रवास’ शेअर केल्याबद्दल धन्यवाद !

सामाजिक काम करू पाहणाऱ्या किंवा तशी इच्छा असलेल्या निवडक युवांचा समूह म्हणजे ‘निर्माण’ ! ‘असं कसं तुमच्या डोक्यात येतं काहीबाही?’ हे प्रश्न कम कुतूहल आता आपल्या सर्वांनाच काही नवीन नाही. आई-वडिलांपासून ते नातेवाईकांपर्यंत; शिक्षकांपासून ते मित्रमैत्रिणींपर्यंत; शेजारपाजारच्यांपासून ते शेजारच्या सीटवर बसलेल्या सहप्रवाश्यापर्यंत – सर्वांनाच पडलेला हा प्रश्न. 


समाजाने ठरवून दिलेल्या विशिष्ट चौकटीबाहेर जाऊन ज्यांनी विचार केला, ती ही लोकं कोण आहेत? असा प्रश्न नक्कीच पडू शकतो. ते काय विचार करून सामाजिक क्षेत्राकडे वळले? त्यांचा नोकरी-करिअर-आर्थिक सुरक्षिततेविषयी काय विचार आहे? हे लोक पार्टनर कसा निवडतात? जीवनाकडे बघण्याची यांची दृष्टी काय आहे? असे असंख्य प्रश्न निर्माणच्या युवांबद्दल विचारले जाऊ शकतात, किंबहुना विचारले जातात सुद्धा !
या सर्व प्रश्नांची सर्व महाराष्ट्राला उकल व्हावी म्हणून गेल्या जानेवारीपासून लोकमत वृत्तपत्राने ‘ऑक्सिजन’ या पुरवणीमध्ये नवे सदर सुरु केले आहे, ‘निर्माण – उत्तर शोधणारा प्रवास’. ज्यात दर महिन्याला एक प्रश्न निर्माणींना संबोधून विचारला जातो. आणि त्या प्रश्नाचे निर्माणी त्यांच्या मनात तयार असलेले उत्तर लिहून पाठवतात. सध्या या उपक्रमाला निर्माणींकडून आणि वाचकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यासाठी निर्माणी आणि वाचक दोघांनाही धन्यवाद.

या प्रश्नांच्या माध्यमातून निर्माणींना पुन्हा एकदा आपल्या कामाकडे आणि जीवनाकडे थोडा वेळ काढून, थांबून बघता येतं. काम सुरु करताना असणारा विचार पुन्हा तपासता येतो; मान खाली घालून जगत असलेल्या आयुष्याची दिशा तपासता येते; जीवनाबद्दल असलेल्या जुन्या मतांची समीक्षा करता येते; नवीन विचार, संकल्प सर्वांबरोबर शेअर करता येतो. तसं पाहायला गेलं तर हा उपक्रम आपल्याच आत्मपरीक्षणाचा आहे.
           म्हणून आयुष्यभरासाठी जीवनाचे विद्यार्थी असलेले आपण सर्व निर्माणी ह्या उपक्रमाला असाच प्रतिसाद देत राहू...

No comments:

Post a comment