'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Monday, 1 May 2017

वार्षिक कौतुक कार्यक्रम ‘अपनी शाला’, मुंबई

मुंबईतील अम्रिता नायर व तिच्या २ मैत्रिणींनी मिळून २०१३ ला ‘अपनी शाला’ या NGO ची सुरवात केली.
शाळकरी मुलांच्यात (वयोगट: वय वर्षे १३) जीवन कौशल्यांचा विकास करणं आणि त्यातून त्यांच्या जीवनात व पर्यायाने समाजात सकारात्मक बदल घडवण्याचं काम ‘अपनी शाला’ करते आहे. ‘अपनी शाला’ ही मुख्यत्त्वे करून मुंबईमधील महानगरपालिकेच्या शाळांसोबत व इतर NGOs सोबत काम करते. त्यांचे मुलांसोबतचे मुख्य २ प्रोग्राम आहेत. Service Learning Programme (SLP) आणि Life Skill Development (LSD). त्यासोबतच वर्गांत मुलांसाठी सामाजिक व भावनिक पातळीवर खेळकर वातावरण निर्माण करण्यासाठी ‘अपनी शाला’ Teacher’s Training Programme ही राबवते.
SLP मध्ये गांधीजींच्या नयी तालीम पद्धतीवर आधारित प्रत्यक्ष कृतीद्वारे मुलांचे शिक्षण होणे अपेक्षित असते. परिसरातील एखादी समस्या निवडून मुले त्या समस्येचा खोलवर अभ्यास करतात आणि ती समस्या कमी करण्यासाठी किंबहुना सोडवण्यासाठी प्रयत्न करतात. LSD या उपक्रमाअंतर्गत ‘अपनी शाला’ ची टीम इ. ७ वी च्या मुलांसोबत काम करतात. त्यासाठी प्रत्येक शाळेच्या वेळापत्रकात आठवड्यातील एक तास ‘अपनी शाला’ कार्यक्रमासाठी असतो. यात खेळ, नाटक, कलेच्या माध्यमातून मुलांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्वगुण, संवादकौशल्य, सहवेदना ही जीवनकौशल्ये रुजवण्यासाठी प्रयत्न केले जातात.


‘अपनी शाला’ ३ मुख्य उद्दिष्टांवर काम करते.
  1. -          नाटक, खेळ, कला यांच्या माध्यमातून मुलांमध्ये जीवन कौशल्ये रुजवणे
  2. -          सरकारी शाळांत अमलांत आणता येतील व दुसरीकडेही वापरता येईल (Replicable) असे  मॉडेल बनवणे
  3. -          जीवन कौशल्य कार्यक्रमाची या शाळांत सक्षमरीत्या तसेच स्वतंत्र अंमलबजावणी करणे


प्रत्येक शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर मुलांनी वर्षभर केलेल्या कृतिकार्यक्रमांचा आढावा घेण्यासाठी कौतुक सोहळ्याचे आयोजन केले जाते. यावर्षीचा हा दिवसभराचा कार्यक्रम १५ एप्रिलला चेंबूर येथील एका शाळेत आयोजित केला होता. त्यात शाळांमधील १३५ मुलांनी सहभाग नोंदवला होता. यात मुलांनी वर्षभर केलेल्या वेगवेगळ्या कृतिकार्यक्रमांचे सादरीकरण केले. मुलांनी कचरा, दारू-नशा, मुलींची छेडछाड, पाणी, पर्यावरण, भांडणं, उघड्या नाल्या या समस्यांवर आपापल्या परिसरात कृतिकार्यक्रम केलेले होते. त्यात ठरवलेल्या विषयाबद्दलचं ज्ञान मिळवणे, त्याविषयी अभ्यास करणे (सर्वे, मुलाखती, निरीक्षण), त्यावर कृती करणे, ती समस्या कमी व्हावी म्हणून उपाय सुचवणे असे कृतिकार्यक्रमाचे स्वरूप असते. कृतिकार्यक्रमांच्या प्रदर्शनात मुलांनी फाईलच्या स्वरूपातील रिपोर्ट्स दाखवणे, नाटक सादर करणे आणि गाणे यांचा समावेश केला होता. त्यासोबत प्रत्येक गटाने त्यांच्या कामाचे पोस्टर बनवून ते देखील Gallery walk साठी ठेवले होते. कृतिकार्यक्रमांच्या सादरीकारणानंतर या विषयांवर मुलांच्या कार्यशाळादेखील झाल्या. त्यात मुले वरील प्रकारच्या समस्यांवर कसे काम करू शकतात यावर भर देण्यात आला होता. त्यानंतर मुलांनी Art Activity अंतर्गत अतिशय कलात्मक पद्धतीने कापडी पिशव्या रंगवल्या व शेवटी प्रमाणपत्राचे वितरण करून व मुलांना गिफ्ट्स व खाऊ देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
निर्माण ७ च्या प्रणाली सिसोदिया, शैलेश जाधव, पूजा कुंभार आणि शीतल म्होपरेकर यांनी या कार्यक्रमात स्वयंसेवक म्हणून काम केले. एकूण अपनी शालाच्या volunteering चा खुप चांगला अनुभव निर्माणींना मिळाला.
प्रफुल्ल, प्रणाली व शैलेश करत असलेल्या कुमार निर्माणच्या कामाशी बऱ्याच अंशी साधर्म्य असलेले हे काम असल्याने ह्या कार्यक्रमात मिळालेल्या अनुभवाचा फायदा नक्कीच होईल असे प्रणालीने सांगितले.
‘अपनी शाला’ चे काम जाणून घेण्यासाठी खाली दिलेली लिंक नक्की बघा:

प्रणाली सिसोदिया, निर्माण ७

No comments:

Post a Comment