'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Monday, 1 May 2017

नमस्कार मित्रमैत्रिणींनो...

कसे आहात?
नुकतीच सर्चमध्ये वार्षिक आढावा बैठक झाली, त्यामध्ये निर्माणच्या कामाचे देखील सादरीकरण झाले. या निमित्ताने ‘कृती निर्माण’ अंतर्गत गेल्या वर्षभरात जे कृती कार्यक्रम झाले त्याच्याकडे मागे वळून पाहता आले.
निर्माणींना कृतीतून शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ह्या कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली होती.
सर्च मध्ये गेल्या वर्षभरात शस्त्रक्रिया शिबिरे, स्पेशल ओपीडी, मलेरिया व स्केबीज सर्व्हे, वार्षिक दारू व तंबाखू सर्वे, आदिवासी खेळ इ. साठी एकूण ११६ स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. (त्यातील ५५ जण निर्माणचे होते)
सर्च व्यतिरिक्त रोजगार, पाणलोट, शिक्षण, शेती, आदिवासी हक्क या विषयावर काम करणाऱ्या १० NGO सोबत निवासी शिबिरे, वेगवेगळे सर्व्हे, इंटर्नशिप्स या माध्यमातून ८५ स्वयंसेवक वेगवेगळ्या कृती कार्यक्रमांत सहभागी झाले. (यात ५० निर्माणी होते). सर्च व या इतर संस्था मिळून एकूण १०८४ मनुष्यादिवस काम झाले.
या निमित्ताने निर्माणींव्यतिरिक्त इतर युवांना देखील कृतीतून शिक्षणाची संधी उपलब्ध झाली.
याअंतर्गतच दुष्काळविरोधी कृती करण्यासाठी नुकतेच सालईबन ता. जळगाव-जामोद, बुलढाणा येथे एक निवासी शिबीर आयोजित करण्यात आले होते, त्याबद्दल...

हात लगे ‘निर्माण’में

सातपुड्याच्या पायथ्याशी, जळगाव जामोद (बुलढाणा) मध्ये ‘सालईबन’ नावाची जागा आहे. विनोबांच्या भूदान यज्ञातून मिळालेली ७२ एकरची जमीन सालईबन म्हणून ओळखली जाते. सालईच्या झाडांनी कधी काळी ही जागा गच्च भरलेली असायची. कालांतराने खासगी अतिक्रमणामुळे तिथली जंगल संपत्ती हळूहळू लोप पावू लागली. सालईची बरीचशी झाडे बेकायदेशीररित्या संपवण्यात आली. ‘महात्मा गांधी लोकसेवा मंडळ’ यांनी २ वर्षांपूर्वी ही जागा तरुणाई फाऊंडेशनच्या हवाली केली होती, तिथली नैसर्गिक संपदा पुन्हा पुनरुजीवीत करावी ह्या उद्देशाने...
मागच्या वर्षीप्रमाणे ह्याही वर्षी निर्माणच्या कृती शिक्षण उपक्रमांतर्गत सालईबनला ५ दिवसीय निवासी शिबीर आयोजित करण्यात आले होते. निर्माण आणि तरुणाई फाऊंडेशनच्या मनजित सिंग यांच्या नेतृत्त्वाखाली १३ एप्रिल ते १९ एप्रिल हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. शिबिरात एकूण २२ युवा सहभागी झाले होते. त्यात नागपूर, मुंबई, अकोला, पुणे, यवतमाळ, औरंगाबाद अशा वेगवेगळ्या जागेहून आलेले आणि विभिन्न शैक्षणिक पार्श्वभूमीचे युवा होते.


मागच्या वर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील शिबिरादरम्यान पाणलोटाची कामे श्रमदानातून करण्याचे नियोजन होते. Loose Boulder Checks आणि शेताच्या धुऱ्यावर Stone Bunding ची कामे करायची ठरली. नियोजित ५ दिवसांत ३ LBC बांधून पूर्ण केले. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या नैसर्गिक ओहोळांवर ह्या कामाचे नियोजन केले होते. शेतातून वाहून जाणारी माती अडवण्यासाठी शेताच्या धुऱ्यावर ६० मी हून अधिक लांब stone bunding चे काम पूर्ण झाले. रोहयो योजनेअंतर्गत ह्या सर्व कामाचे मूल्यमापन रु. १८,००० इतके आले. शिबिरातील कामांच्या तांत्रिक बाबींची जबाबदारी प्रतिक उंबरकर (निर्माण ६), प्रताप मारोडे (निर्माण ४) व अजय होले (निर्माण ४) यांनी पार पाडली.
शिबिरात शारीरिक श्रमासोबत बौद्धिक श्रमही शिबिरार्थ्यांनी केले. अजय होलेने (निर्माण ४) भूजल आणि पाणलोटाच्या कामांशी त्याचा संबंध शिबिरार्थ्यांना समजावून सांगितला. आकाश नवघरेने (निर्माण ६) विषमुक्त अन्न याविषयी शिबिरात चर्चा केली तर चाळीसटापरी या आदिवासी गावाचे माजी सरपंच ग्यानसिंगजी यांच्या सोबत आदिवासी जीवनावर चर्चा झाली. सालईबनाची धुरा सांभाळणारे मनजित सिंग यांच्या सामाजिक क्षेत्रातील वाटचालीविषयी ही त्यांच्याच कडून ऐकून घेतले. शिबिरात सर्वांनी मिळून आफ्रिकेतल्या बुशमन आदिवासींवर बेतलेल्या ‘गॉड्स मस्ट बी क्रेझी’ हा चित्रपट पाहिला.


शिबिरात घडलेली विशिष्ट गोष्ट म्हणजे १६ एप्रिलला सर्व शिबिरार्थ्यांनी मिळून सातपुड्याच्या जंगलातली आग विझवली. सातपुडा मानवी स्वार्थासाठी नेहमी जळत आलाय, तसाच तो त्यादिवशीही जळत होता. श्रमदान करून झाल्यावर दूरवर जळत असलेला सातपुडा बघून शिबिरार्थ्यांनी वणवा विझवायला जाण्याची इच्छा व्यक्त केली. शरीर थकलेली असतानाही सर्व शिबिरार्थी ४-५ किमीचे अंतर चालून डोंगरात आगीपर्यंत पोहोचले आणि कुठलाही अनुभव गाठशी नसताना भरपूर जोशाने आग विझवली. आग विझवून झाल्यावर रात्री समाधानी मनाने सर्वांनी जंगलात जोशपूर्ण गाणीदेखील म्हटली. मनजित सिंग यांनी जंगलाविषयी, त्याच्या शांततेविषयी, शुद्धतेविषयी, सुंदरतेविषयी शिबिरार्थ्यांना सांगितले. त्या रात्री सर्व जण जंगलाविषयी भावूक झालेले दिसले.


ह्या वेळचे सालईबन येथील कृती निर्माणचे शिबीर उत्तम पार पडले. माती, पाणी आणि जंगल या तीन महत्त्वाच्या गोष्टींविषयी शिबिरात मोलाचे मार्गदर्शन मिळाले आणि तितकीच आश्वासक, शास्त्रीय कृती केली गेली. पहिल्या दिवशी अनोळखी असलेले सर्व चेहरे शेवटच्या दिवसापर्यंत एकमेकांच्या जवळचे वाटू लागले. शिबिरार्थ्यांनी शिबिरार्थ्यांसाठी केलेला स्वयंपाक असो की मानवी साखळीत वाहून नेलेले मोठमोठाले दगड असोत, एकमेकांना हात देत चढलेला सातपुडा असो की सातपुडा चढून गेल्यावर त्वेषाने आगीवर तुटून पडणे असो... सर्वच सोबत सोबत आणि जबाबदारीने पार पडलं. शिबिरात झालेल्या शारीरिक, बौद्धिक श्रमाबद्दल आणि दाखवलेल्या धाडसाबद्दल शिबिरार्थ्यांना सलाम.
सर्व शिबिरार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा !
                                               
हात लगे ‘निर्माण’में, नहीं मारणे नहीं मांगने !!!


No comments:

Post a Comment