'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Monday, 1 May 2017

वर्धिष्णूचे जळगावातील कचरावेचक मुला-मुलींसाठी आनंदघराचे दुसरे केंद्र सुरु

कचरावेचक मुला-मुलींमध्ये शिक्षणाविषयी आवड आणि गोडी निर्माण व्हावी या हेतूने अव्दैत, प्रणाली आणि त्यांच्या मित्रांनी वर्धिष्णूया संस्थेची स्थापना केली. याच संस्थेअंतर्गत त्यांनी जळगावातील कचरा-वेचकांचे सामाजिक-आर्थिक सर्वेक्षण करून त्याव्दारे मिळालेल्या माहितीच्या आधारे जळगावातील तांबापुरा भागात ‘आनंदघर’ या नावाने एक लर्निंग सेंटर सुरु केले. गेल्या ३ वर्षात ५० हून अधिक मुलं-मुली या सगळ्या प्रक्रियेतून गेली. तर सध्या सुमारे ३५ मुलं-मुली दररोज हजर असतात. ह्यातील बहुतांश विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करण्यात संस्थेला यश आले. गेल्या ३ वर्षातील अनुभवांच्या आधारे वर्धिष्णूने आता जळगावातील आणखी दोन भागात या वर्षी असेच केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून जळगावातील मटन मार्केट परिसरात मार्च महिन्यात ‘आनंदघर - ०२’ सुरु करण्यात आले.
जळगावातील मटन मार्केटच्या बाजूला ‘तंट्याभिल’ वस्ती आहे. येथे राहणारी बहुतांश जनता हि कचरा वेचण्याचे काम करते तर काही जण महानगरपालिकेमध्ये तसेच खाजगी कंपन्यात स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करतात. संपूर्ण भागाला तीन बाजूंनी सिमेंटची भिंत असून प्लास्टिकच्या पाल बांधून हि सगळी लोक राहतात. येथे काम सुरु करण्याआधी वर्धिष्णूने तिथे राहणाऱ्या १६ वर्षाखालील मुलांचे सर्वेक्षण केले. याठिकाणी सुमारे १६ वर्षाखालील सुमारे ५० मुल राहतात. यातील ९०% हून अधिक मुल हि एकतर शाळेत गेलेली नाहीत किंवा त्यांनी शाळा सोडलेली आहे. हि सर्व मुल जळगावातील प्रमुख रस्त्यांवर कचरा गोळा करण्याचे, भिक मागण्याचे तसेच काही गाड्यांवर व बाजूच्याच मटन मार्केटमध्ये काम करतात. सतत अस्वच्छ वातावरणात राहत असल्याने बहुसंख्य मुलांना आरोग्याचे प्रश्न देखील गंभीर आहेत.


सध्या ह्या केंद्रावरदेखील २५ ते ३० मुलं दररोज हजेरी लावत आहेत. याठिकाणी विविध उपक्रमांच्या तसेच खेळाच्या माध्यमातून मुलांना अक्षर-अंक ओळख आणि स्वच्छता तसेच आरोग्याच्या दृष्टीने काम करण्यात येत आहे.
येत्या शैक्षणिक वर्षात यातील शाळा सोडलेल्या मुलांना पुन्हा शाळेत दाखल करण्याची तसेच लहान मुलांना शाळेत दाखल करण्यासाठी वर्धिष्णू प्रयत्न करणार आहे. या केंद्रावर सध्या अव्दैत (निर्माण ४) सोबत जगदीश बोरसे (निर्माण ७) आणि वर्धिष्णूमधील त्यांचे सहकारी अनिता व भावना यादेखील मुलांना शिकवण्याचे काम करत आहेत.

आवाहन: आज वर्धिष्णूच्या ‘आनंदघर १ व २’ या दोन्ही केंद्रांमध्ये मिळून ६० हुन अधिक मुल-मुली शिक्षण घेत आहेत. यांकडून वर्धिष्णू कुठल्याही प्रकारची फी आकारात नाही तसेच ज्या मुलांना शाळेत दाखल करण्यात आले आहे त्यांचा शैक्षणिक खर्चाचा मोठा हिस्सा वर्धिष्णू उचलत आहे. कामाचा व्याप वाढत असताना त्यासाठी लागणारी साधने आणि पैसा देखील वाढत आहे. त्यामुळे वर्धिष्णूला आर्थिक सहाय्य देण्याचे आवाहन अव्दैत आणि त्याच्या सहकाऱ्यांनी केले आहे.


अव्दैत दंडवते, निर्माण ४

No comments:

Post a Comment