'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday, 5 September 2017

अन्न गुडगुडे, नाड गुडगुडे दुष्काळ: ढिशक्यांव ढिशक्यांव ढिशक्यांव

पानी फाउंडेशनतर्फे गावागावात आयोजित करण्यात आलेली जलसंधारणाची स्पर्धा म्हणजे सत्यमेव जयते वॉटर कप. या स्पर्धेत आर्वी तालुक्याच्या समन्वयाची मोठी जबाबदारी मंदार देशपांडेने स्वीकारली. घरच्या सेंद्रीय शेतीकडे दुर्लक्ष करून ही जबाबदारी स्वीकारताना झालेली चलबिचल ते महाराष्ट्रातील १३०० गावांमधून आर्वी तालुक्यातील काकडधरा गावाला मिळालेले पहिले बक्षीस... मंदारने शेअर केलेला हा प्रामाणिक प्रवास...

To be or not to be...
            माझा मित्र चिन्मय फुटाणे याने मला पानी फॉउंडेशनसोबत काम करण्याबद्दल विचारले. मी सेंद्रीय शेती शेतीआधारित उद्योग करतो. चार वर्षांपासून केलेली उद्योगाची सुरूवात एका टप्प्यावर होती. योग्य आर्थिक मोबदला मिळण्यास सुरूवात व्हावा यासाठी आता त्याची व्याप्ती वाढवण्याची गरज होती. तसेच शेतीही एका टप्प्यावर होती. आता उत्पादन वाढ, भाजीपाला लागवड, फळझाड लागवड, खत-फवारणी व्यवस्थापन यांची व्याप्ती वाढवणे गरजेचे होते. मी नसताना या सर्व व्यवस्थेकडे पहायला कोणी नव्हते. तसेच 'खूप झटून लोकांसाठी काम केल्याने लोकांमध्ये बदल होईल का?’ हाही प्रश्न होताच. किंबहुना नाही असेच माझे मत होते! या सर्व कारणांमुळे माझी काम करण्याची तयारी नव्हती. पण चिन्मय म्हणत होता की हे काम करून तुला शेतीही करता येईल. त्याच्या अनुभवावर मी विश्वास ठेवला. मानधनही चांगले होते. हो नाही करता करता 'सत्यमेव जयते वॉटर कप' स्पर्धेसाठी मी आर्वी तालुक्याचा (जि. वर्धा) समन्वयक म्हणून काम करू लागलो.

१५ दिवसांत १४० गावांचा सहभाग कसा मिळवावा?
            ४ दिवसांच्या प्रशिक्षणानंतर १५ जानेवारीपासून आम्ही आर्वी मध्येच राहायला गेलो. वॉटर कप मध्ये गावांनी सहभाग नोंदवण्यासाठी ३१ जानेवारी ही अंतिम तारीख होती. तहसील कार्यालयातून कळले की आर्वी तालुक्यात ७२ ग्रामपंचायतींमध्ये २२२ गावे आहेत. त्यातील १४० ही लोकवस्तीची, तर इतर गावे उजाड आहेत. कितीही धावपळ केली तरी आम्ही २ तालुका समन्वयक १५ दिवसांत १४० गावांपर्यंत पोहचून त्यांनी वॉटर कपमध्ये सहभाग घ्यावा म्हणून ग्रामसभा घेणे शक्य नव्हते. मग काय करावे?
            अभ्यास करताना लक्षात आले की ७२ ग्रामपंचायती ह्या पंचायत समितीच्या १२ गणांमध्ये विभागल्या गेल्या आहेत. मग गणनिहाय बैठका घेण्याचे ठरले. या गणनिहाय सभा एकाच दिवशी गणांमध्ये घेऊन आम्ही समन्वयकांनी दिवसांत संपवल्या. दिवसा या सभा रात्री गावसभा चालू होत्या. ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, तलाठी यांच्यामार्फत प्रवेश अर्ज गावागावांपर्यंत पोहचवून काम करणे सुरू होते.
            पाणी प्रश्न हा महिलांसाठी महत्वाचा प्रश्न आहे. महिलांना दुरून पाणी आणावे लागते. पाळीव जनावरांसाठी, भांडीकपडे धुण्यासाठी पाण्याची व्यवस्था करावी लागते. जर महिलांना वॉटर कपची संकल्पना पटली तर त्या येणाऱ्या २६ जानेवारीच्या ग्रामसभेत वॉटर कप मध्ये सहभाग घेण्यासाठी जोर लावू शकतील. म्हणून २४ जानेवारीला आम्ही महिला मेळावा घेतला. महिला बचत गट पंचायत समिती अंतर्गत असतात. त्यांच्या सहकार्यामुळे या महिला मेळाव्याला १५०० महिला विविध गावांतून उपस्थित होत्या. डॉ. अविनाश पोळ सरांचे मार्गदर्शन, महिलांनी बसवलेली पाणी प्रश्नावरची एकांकिका, 'दुष्काळाशी दोन हात' ही फिल्म यांनी मेळाव्यात रंग भरला आणि महिला उत्साहाने गावोगावी परतल्या.

            
२६ जानेवारी रोजी होणाऱ्या ग्रामसभांमध्ये वॉटरकप मध्ये सहभागी होण्याचे आवाहन करता आले तर? फारच शॉर्ट नोटीसवर निर्माणची २६ युवक युवती २५ जानेवारीच्या संध्याकाळपर्यंत आर्वीला पोहचले. या २६ निर्माणींनी ३० ग्रामसभांमध्ये मांडणी केली.
            या कार्यक्रमांचा परिणाम उत्तम झाला. ८२ गावांचे प्रवेश अर्ज आले. पानी फाउंडेशनतर्फे आयोजित प्रशिक्षण शिबिरात पाणलोट उपचार शिकण्यासाठी आता प्रत्येक गावातून ५ जण येणार होते, पानीने घातलेल्या अटींनुसार त्यात २ महिलांचा समावेश होता.

गावांनी टीमच्या सदस्यांची नोंदणी तर केली, पण ते खरंच प्रशिक्षणाला येतील?
            प्रशिक्षण पहिल्या वॉटर कपमध्ये सहभागी लोणी (जि. अमरावती, ता. वरुड) या गावी होते. फेब्रुवारीमध्ये आर्वी तालुक्यात निवडणूक आल्या. त्यामुळे मार्चमध्ये आम्हाला सलग प्रशिक्षण बॅचेस घ्याव्या लागल्या. ४०-४० जणांची एक प्रशिक्षण बॅच होती. इथे मात्र कस लागला. जमेल तसे भेटून, वारंवार फोन करून आम्ही लोकांना प्रशिक्षणाला येण्यासाठी प्रोत्साहित करत होतो. प्रशिक्षणासाठी नावे दिलेल्यांनी अचानक नाही म्हटल्यामुळे ऐनवेळी नवीन माणूस तयार करणे, टीममध्ये महिला आवश्यक असल्याने त्यांना तयार करणे, शेतीची कामे असताना ४० ची बॅच तयार करणे अवघड होते. एक समन्वयक बॅचला घेऊन प्रशिक्षणाला जाई, तर एक पुढच्या बॅचला तयार करण्यासाठी आर्वीमध्ये थांबत असे. याकाळात स्वतःचे motivation जपणे हीही कसरत होती.


प्रशिक्षणामध्ये motivation साठी प्रार्थना, गाणी, खेळ, अमिर खान यांचा फिल्मद्वारे मराठीतून संदेश होता. पाणलोट उपचारांचे महत्त्व व तंत्र समजावे यासाठी फिल्म्स, उपचारांचा परिणाम डोळ्यांनी बघता यावा यासाठी खास बनवलेले मॉडेल्स, काही प्रयोग, लोणी गावचे काम पाहण्यासाठी शिवारफेरी व गावक-यांसोबत प्रश्नोत्तरे, प्रत्यक्ष श्रमदान होते. चार दिवसांच्या प्रशिक्षणानंतर लोक गाव पाणीदार करण्याच्या निश्चयानेच परतत होते.
            ज्या गावांनी प्रशिक्षण पूर्ण केले तीच गावे स्पर्धेत राहणार होती. त्यामुळे आर्वी तालुक्यातून प्रशिक्षणाला आलेली ३० गावे स्पर्धेच्या बाहेर पडली. हे अवघड होते पण शिस्त लागण्यासाठी योग्यच होते. शिस्त नि शास्त्र ही पानी फॉउंडेशनची महत्वाची तत्वे होती.
           
स्पर्धा सुरू... चले चलो 
            ८ एप्रिल ते २२ मे असा ४५ दिवसांचा स्पर्धेचा कालावधी होता. ७ एप्रिलला मध्यरात्रीनंतर १२ वाजून मिनिटांनीच काही गावात लोकांनी श्रमदान सुरू केले. आमच्या सोबत पानी फाउंडेशनचे दोन तांत्रिक अधिकारी श्री. प्रविण बागडे (WOTR संस्थेचा १८ वर्षांचा अनुभव) श्री. प्रणव गोरीवले सहभागी झाल्यामुळे गती वाढली. या दोघांसोबत टीम बनवून गावागावात फिरून जमिनीचा उतार काढण्यास मदत करणे, उपचारांचे नियोजन-आखणी करण्यास मदत करणे, लोकांना प्रोत्साहन देत राहणे हे काम सातत्याने सुरू होते.
            काही गावांत कमी, काही गावांत मध्यम, तर काही गावांत जास्त प्रतिसाद होता. सर्वच ठिकाणी पुरे पडणे आम्हाला शक्य नव्हते. जेथे जास्त लोकसहभाग होता तेथे आम्ही अधिक लक्ष देत होतो. सोबतच गावातील लोक तांत्रिकदृष्ट्या तयार करत होतो.
            श्रमदानासोबतच मशीनद्वारे करायच्या पाणलोटाच्या कामांचे नियोजन करावयाचे होते. भारतीय जैन संघटना पूर्ण महाराष्ट्रात मशीन देणार होती. जास्त मशीन उपलब्ध नव्हत्या आणि मशीन शिफ्टिंग हा मोठा विषय होता. त्यामुळे योग्य श्रमदान झाले त्या गावांना मशीन मिळण्यासाठी मदत करायची असे धोरण आम्ही ठरवले होते.

  स्पर्धा आता अंतिम टप्यात आली होती. कामाचा वेग अधिकच वाढला होता. स्पर्धेत टिकू शकणाऱ्या गावांमध्ये शेवटच्या दिवसांत अधिक लक्ष देऊ लागलो. रात्रीच्या ग्रामसभा घेऊन गावागावात श्रमदान व मशीनने करायच्या कामाचे टार्गेट किती बाकी आहे हे समजावू लागलो. काय केल्याने ही टार्गेट्स पूर्ण होऊ शकतील हे ही समजावू लागलो. आली वेळ तर गावातच मुक्काम होत होता. आंघोळ, कपडे याचा काही पत्ताच नव्हता. गावांनीही उत्तम प्रतिसाद दिला.
            बघता बघता २२ मेचा दिवस उजाडला. आता केलेल्या कामाचे मोजमाप कामाच्या फोटोसहित पानी फाउंडेशनच्या अॅपमध्ये २५ मे पर्यंत भरायचे होते. त्यामुळे एकाचवेळी-३ टीम्स मोजमाप भरत होत्या. काही ठिकाणी फोनमधील जागा संपल्याने फोटो निघत नव्हते. काही गावात नेटवर्क नसल्याने ही सर्व माहीती पानी फॉउंडेशनला पाठवणे कठीण होते. अशा सर्व अडचणी सोडवत हेही काम गावांनी पूर्ण केले.
            तालुकास्तरीय बक्षिसाला पात्र ठरण्यासाठी श्रमदानाने कमीतकमी,००० घन मीटर आणि मशीनने कमीतकमी २०,००० घन मीटर पाणीसाठ्याची क्षमता निर्माण करणे गावासाठी आवश्यक होते. तसेच राज्यस्तरीय बक्षिसाला पात्र ठरण्यासाठी श्रमदानाने कमीतकमी,५०० घन मीटर आणि मशीनने कमीतकमी ५०,००० घन मीटर पाणीसाठ्याची क्षमता निर्माण करणे गावासाठी आवश्यक होते. त्यानुसार आर्वी तालुक्यात गावे नियमानुसार व्हेरिफिकेशनसाठी होती.
            आता हे गावांनी टाकलेले मोजमाप योग्य आहे की नाही हे तपासणे गरजेचे होते. अन्यथा चुकीचे मोजमाप टाकलेले गाव पुढे जाऊ शकत होते. या तपासणीसाठी विदर्भ, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र या विभागांतील तांत्रिक टीम्सना त्याच विभागातील तालुके बदलून दिले गेले. पुढच्या टप्प्यात प्रत्येक विभागातल्या गावांचे व्हेरिफिकेशन दुस-या विभागातल्या तांत्रिक टीम्सनी केलं. निःपक्ष परीक्षण होण्यासाठी हे आवश्यक होते. यानंतर महाराष्ट्रातील उत्कृष्ट १२ गावे निवडून श्री. पोपटराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय परीक्षण करण्यात आले. १२ गावांची वॉटर बजेट मांडणी कामांची गुणवत्ता काटेकोरपणे तपासली गेली. यातून राज्यस्तरावरचे पहिले नंबर निवडले जाणार होते. पहिले बक्षीस होते ₹ ५० लक्ष, दुसरे होते ₹ ३० लक्ष आणि तिसरे होते ₹२० लक्ष.

आणि विजेते आहेत...
            वॉटर कपचा निकाल हा बालेवाडी क्रीडा संकुल, पुणे येथील स्टेडीयममध्येव्यदिव्य अशा सोहळ्यात जाहीर झाला. या कार्यक्रमाला आर्वी तालुक्यातील सहभागी गावांमधल्या श्रमवीरांना उपस्थित राहता यावे याकरिता शासनाद्वारे राज्य परिवहन बसची सोय करण्यात आली होती. या बसमधून आर्वी तालुक्यातील १२० श्रमवीर ग्रामस्थ उपरोक्त सोहळ्याकरिता उपस्थित होते.
            राज्यस्तरावरच्या बक्षीसासाठी पात्र १२ गावांमध्ये काट्याची टक्कर होती. एकएक करून बक्षीसांची घोषणा होऊ लागली- तिसरा, दुसरा आणि शेवटी पहिला क्रमांक. महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आर्वी तालुक्यातील काकडदरा हे आदिवासी गाव; आणि बालेवाडी स्टेडिअममध्ये घुमला निर्माणींना परिचित नारा - अन्न गुडगुडे, नाड गुडगुडे दुष्काळ: ढिशक्यांव  ढिशक्यांव ढिशक्यांव !

            

बोथली नटाला, नेरी मिर्झापूर आणि पिंपळगाव भोसले हे तालुका स्तरावर अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या बक्षिसाचे मानकरी ठरले. काकडदऱ्याला पाणी फाउंडेशन तर्फे ५० लाखाचे बक्षीस सत्यमेव जयते वॉटर कप मिळाला. तर बोथली नटाला पानी फाउंडेशनतर्फे १० लाख रूपये आणि ट्रॉफी महाराष्ट्र शासनातर्फे लाख रूपये मिळाले. महाराष्ट्र शासनातर्फे नेरी मिर्झापूरला . लाख रूपये आणि पिंपळगाव भोसलेला लाख रूपयांचे बक्षीस मिळाले.

   काकडद-यासाठी सर्वात मोठे बक्षीस कोणते होते? प्रचंड कष्टाने निर्माण केलेली पाणी साठवण्याची क्षमता; त्यात साठलेले पाणी; ३० वर्षांनंतर पुन्हा ताकदीने एकत्र झालेले गाव; “महाराष्ट्रात इतक्या उत्तम प्रतीचे एल.बी.एस. मी याआधी पाहिले नाही.” अशी पोपटराव पवारांनी दिलेली काैतुकाची थाप! त्या ३५०-४०० लोकांच्या गरीब आदिवासी गावात असे वेगळे काय होते? काकडद-याने आणि वॉटर कपने मला काय शिकवले? निःस्वार्थीपणे आम्हाला कुणी आणि कशी मदत केली? वाचूया पुढच्या भागात...
(क्रमशः)

   मंदार देशपांडे (निर्माण ४),
       mandar9999@gmail.com


No comments:

Post a Comment