'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday, 5 September 2017

सोलापूरची पूजा कुंभार (निर्माण ७), इंजिनिअरींग झाल्यानंतर दीड वर्ष Infosys ह्या कंपनीत काम करत होती. ती ने ती नोकरी सोडून पुण्यातील ‘खेळघर’ या संस्थेसोबत काम करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामागचा प्रवास ती स्वतः सांगतेय...

मी गेली दीड वर्ष डोळे, कान, मन, सगळं बंद ठेऊन Infosys मध्ये काम करत होते. अजूनही कॉलेजचे मित्रमैत्रिणी, त्यांची मैत्री एवढंच माझं आत्मकेंद्रित विश्व होतं. मला प्रश्न पडायचे - तिथल्या स्पर्धेत असणं खरंच एवढं महत्त्वाचं आहे का? शाळा कॉलेजमध्ये असताना वेगवेगळी पुस्तके वाचली होती. त्या पुस्तकांनी आणि त्यातल्या माणसांनी मनात घरच केलं होतं. तेव्हा वाटत राहायचं की मी सुद्धा असंच काहीतरी काम करणार, जे फक्त माझ्यापुरतं नसेल. एका ठरवून दिलेल्या चाकोरीत जगणं मला पटत नव्हतं. मग वाटलं की जे आवडत नाही असं काम करत बसण्यापेक्षा नवीन काहीतरी करू. हे जाणवलं की जर खरंच आयुष्य वेगळ्या प्रकारे जगायचं असेल तर रस्ता बदलला पाहिजे आणि तोही आत्ताच.
घरी जेव्हा आईबाबांना सांगितलं की नोकरी सोडून मी सामाजिक क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला आहे, तेव्हा आईबाबांकडून विरोध होणं स्वाभाविक होतं. नोकरी सोडताना सगळ्यात मोठा प्रश्न होता आर्थिक सुरक्षिततेचा. कंपनीत मिळणाऱ्या पगारापेक्षा सामाजिक क्षेत्रात खूप कमी पगार मिळेल याची जाणीव होती. पहिला प्रश्न होता, बचतचं काय करायचं आणि दुसरं, आपात्कालीन परिस्थितीमध्ये मी काय करेन. पहिल्या प्रश्नाला मी स्वतःला उत्तर दिलं की बचत कमी होईल चालेल, गरजा कमी कशा करता येतील ते पाहू. दुसऱ्या प्रश्नाचं अजून समाधानकारक उत्तर नाही मिळालं. आणि मला जोडीदार मिळेल की नाही, याच्याबद्दल माझ्यापेक्षा आईबाबांनाच जास्त असुरक्षितता वाटते; त्यांची ही काळजी पण साहजिक आहे.
समान संधी उपलब्ध न झाल्याने कोणी उपेक्षिताचे आयुष्य जगावे हे काही मला पटत नाही. ‘खेळघर’ ही संस्था कोथरूडमधील ‘लक्ष्मीनगर’ वस्तीतल्या अशाच उपेक्षित मुलांसोबत काम करते. साधारणपणे पहिली ते दहावी पर्यंतची मुले खेळघरात येतात. त्यांच्या बुद्धीला, विचाराला चालना देईल असं काहीच त्यांच्या आसपास नसतं. या सगळ्या गोष्टी त्यांना काही प्रमाणात अनुभवता याव्यात, यासाठीच खेळघराकडून मुख्य काम केलं जातं.
माझा रोल इथे मुलांची ‘ताई’ असा आहे. माझ्याकडे चौथी-पाचवीचा गट आहे. आम्ही भाषा, गणित आणि life skills हे घटक मुलांसोबत घेतो. त्यासाठी वर्षभराचा आराखडा सुरुवातीलाच बनवला जातो. मला खेळघरात येऊन दोनच महिने झालेत. आता मुलांनी मला ‘ताई’ म्हणून स्वीकारलंय. त्यांच्यासोबत असताना नेहमीच असं जाणवतं की मुलं कधीच हताश, निराश होत नाहीत. प्रचंड ऊर्जा आणि उत्साह असते. मला प्रश्न पडतो की ते ज्या वातावरणात असतात तिथे इतका उत्साह येतो कुठून?
पूजाला तिच्या कामासाठी खूप खूप शुभेच्छा!

                                                                                                     पूजा कुंभार, निर्माण ७
                                                                                                                                pjkumbhar26@gmail.com

No comments:

Post a Comment