'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday, 8 November 2017

वर्धिष्णूचे तिसरे ‘आनंदघर’ सुरु

२ जानेवारी २०१४ रोजी वर्धिष्णूने कचरा वेचक मुलांमध्ये शिक्षणाविषयी गोडी निर्माण व्हावी या हेतूने जळगावातील तांबापुरा भागातील ‘मरिमाता मंदिरात’ पहिले केंद्र सुरु केले. ४ वर्षांनंतर वर्धिष्णूच्या माध्यमातून तिसरे केंद्र सुरु झाले आहे. नवीन ‘आनंदघरा’बद्दल सांगतोय निर्माण ४ चा अद्वैत दंडवते...
शिकण्याची आणि शिकवण्याची प्रक्रिया आनंददायी करण्याच्या उद्देशाने सुरु झालेल्या या उपक्रमाला ‘आनंदघर’ हे नाव दिले होते. कामाचा आवाका वाढत जात असताना, फक्त कचरा वेचकच नाहीत तर शाळाबाह्य मुलं/मुलीदेखील यात सामील होत गेले. गेल्या ४ वर्षात तांबापुरातील ५० हून अधिक मुलं/मुली या सगळ्या प्रक्रियेतून गेली. तर सध्या ४५ मुलं दररोज या केंद्रात शिकत आहेत. जळगावातील इतर भागातील मुलांपर्यंत पोहोचायचे या हेतूने मार्च २०१७ ला तंट्या भिल्ल वस्तीत ‘आनंदघराचे’ दुसरे केंद्र सुरु करण्यात आले. आज तिथे सुमारे ३० मुलं/मुली दररोज शिकत आहेत.
आता ३० ऑक्टोबर रोजी वर्धिष्णूने समता नगर भागात ‘आनंदघराचे’ तिसरे केंद्र सुरु केले आहे. समता नगर हा सुमारे १०,००० लोकसंख्येची वस्ती असलेला भाग. लोकांचा मुख्य व्यवसाय म्हणजे हातमजुरी. घोषित वस्ती असल्याने समतानगरमध्ये सिमेंटचे पक्के रस्ते आहेत. पिण्याचे पाणी तसेच शौचालय देखील आहेत. बहुसंख्य मुले शाळेत जातात पण ८ वी नंतर गळतात. १ लीत दाखल होणाऱ्या मुलांपैकी १०% पेक्षा कमी मुले ८ वीच्या पुढे जातात. लिहिता-वाचता न येणं हे शाळा सोडण्याचं प्रमुख कारण. याव्यतिरिक्त मुलं कामाला लागतात तर मुलींची लग्न होतात. यामुळे शिक्षणाचे प्रमाण कमीच आहे. याठिकाणी वर्धिष्णूला एक खोली मिळाली असून, तिथेच हे केंद्र सुरु झाले आहे. अगदी पहिल्या दिवसापासून सुमारे ३० मुलं/मुली इथे शिकायला येत आहेत.

वर्धिष्णूच्या तीनही केंद्रावर मिळून शिकणाऱ्यांची संख्या आता १०० च्या पुढे गेलेली आहे. अक्षर व अंक ओळख, तसेच आरोग्य व व्यसन या मुख्य विषयांवर ‘आनंदघरात’ काम सुरु आहे.


अद्वैत दंडवते, निर्माण ४
adwaitdandwate@gmail.com

No comments:

Post a Comment