'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday, 8 November 2017

नमस्कार मित्रमैत्रिणींनो

कसे आहात तुम्ही सर्वजण?
तुम्हा सर्वांची दिवाळी नक्कीच आनंदात गेली असणार, अशी आशा करतो.
दिवाळीला आपण दिव्यांचा सण म्हणतो. अंधार झाला की आपण दिवा लावतो. आजूबाजूला पाहिलं तर समाजातही आपल्याला inequality चा, injustice चा, ignorance चा, exploitation चा अंधार पसरलेला दिसेल. जिथे अंधार आहे तिथे जाऊन दिवा लावावा, आणि त्यातच आपल्या जीवनाचा अर्थ शोधावा, हे ढोबळमानाने निर्माणचं तत्वज्ञान. गेली ११ वर्षे निर्माण प्रक्रियेतून असे दिवे लागले आहेत आणि लागत आहेत; आपापल्या शक्तीनुसार, आपापल्या परिघामधील अंधार ते घालवत आहेत. ह्या अंकात आपण वाचूया काही अशाच झगमगत्या दिव्यांच्या कहाण्या...
निर्माण ८ ची प्रवेश प्रक्रिया पूर्ण!
आपल्याला माहितच आहे की गेल्या तीन महिन्यांपासून निर्माणच्या आठव्या बॅचसाठीची प्रवेशप्रक्रिया सुरु झाली होती. फेसबुक, WhatsApp, पोस्टर्सद्वारे, वर्तमानपत्रात निर्माण ८ साठी अर्ज मागविण्यासाठी आवाहन केले होते. तुम्हीही निर्माण ८ च्या प्रसिद्धीमध्ये मोलाचा वाटा उचलला. ह्यावर्षी निर्माण ८ साठी महाराष्ट्रातून व महाराष्ट्राबाहेरून एकूण ७०२ अर्ज आले. आणि त्यापैकी ~४८० मुलाखती आपण घेतल्या. महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी ह्या मुलाखती घेण्यात आल्या. निर्माण ७ च्या चांगल्या अनुभवावरून ह्या प्रवेश प्रक्रियेसाठी तंत्रज्ञानाचा भरपूर वापर आपण केला. आणि जवळपास ~१४५ मुलाखती ह्या स्काईपवर झाल्या. निर्माण ८ च्या ह्या नवीन बॅचसाठी एकूण २४० युवांची निवड आपण केली. निर्माणच्या इतिहासातील आतापर्यंतचे (एकूण अर्ज, एकूण मुलाखती, स्काईप मुलाखती, निवड झालेल्यांची संख्या) हे सगळ्यात मोठे आकडे आहेत.
निर्माण ८ च्या निमित्ताने आपण आणखी एक टप्पा ओलांडला, तो म्हणजे, निर्माण समुदाय म्हणून आपण १००० च्या पलीकडे गेलो. महाराष्ट्रसोडून भारतातील एकूण ११ राज्यांतील युवांची निवड ह्या बॅचसाठी झाली. निर्माण ८ च्या मुलाखतींमध्ये आम्हाला २६ अशी काही मुलं-मुली भेटली की जी उत्कृष्ट होती, पण निर्माण शिबीर त्यांना ह्यावर्षी उपयुक्त राहावं यासाठी त्यांचं वय आणि जीवनानुभव कमी होता. आणि म्हणून निर्माण ९ साठी आपण ह्या वर्षीच त्यांचं अॅडव्हान्स बुकिंग करून टाकलं. ह्या बॅचसोबत आपण महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व ३६ जिल्ह्यांचं प्रतिनिधित्व मिळवलं. आता लक्ष्य ३५८ तालुके!

मागच्या दोन महिन्यात मुलाखतीच्या निमित्ताने निर्माण टीमचे भरपूर फिरणे झाले. तुमच्यापैकी काही जणांना भेटताही आले. मुलाखतीच्या नियोजनात आणि मुलाखती घेण्यामध्ये स्थानिक निर्माणींनी खुपच हातभार लावला. तुमच्यामुळे ह्या मुलाखती इतक्या सहज पार पडल्या. तुमच्या घरी आल्यावर घरच्यांनाही भेटता आलं आणि त्यांनी खूप छान आदरातिथ्यही केले. तुम्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद!!!

No comments:

Post a Comment