'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday, 8 November 2017

अन्न गुडगुडे, नाड गुडगुडे दुष्काळ: ढिशक्यांव ढिशक्यांव ढिशक्यांव

"वॉटर कप जिंकणा-या त्या गरीब आदिवासी गावात असे वेगळे होते तरी काय? निःस्वार्थीपणे आम्हाला कुणी आणि कशी मदत केली? वॉटर कपने मला काय शिकवले?” आर्वी तालुक्यात समन्वयक म्हणून काम करताना मंदारच्या मनात उमटलेले हे तरंग...

तुफानाचे गाव...
            "एकजुटीने पेटलं रान, तुफान आलंया...”  हे थीम सॉंग रात्री ११ वाजता एका गावात सत्यमेव जयते वॉटर कपची वातावरण निर्मिती करत होते. निमित्त होते गावसभेचे जी आम्ही निर्माणींनी आयोजित केली होती. रात्री गावात पोचण्याची काही सुविधा नव्हती. मात्र गावातल्या लोकांनी आमच्यासाठी मुख्य रस्त्यापर्यंत एक ऑटो पाठवल्यामुळे आम्ही १०.३० गावी पोचलो होतो. लोक आमची वाटच पाहात होते. आम्ही लगेच सर्व व्यवस्था करून 'दुष्काळाशी दोन हात' ही फिल्म दाखवली आणि पानी फाउंडेशन व वॉटर कपबद्दल मांडणी केली. अत्यंत शांतपणे सर्वांनी संपूर्ण कार्यक्रम पाहिला व त्यानंतर चर्चापण केली. रात्री १२ ला ही गावसभा आटोपली व आम्ही गावातच झोपलो. दुस-या दिवशीची सकाळ अनेक आश्चर्यांसह आमची वाट पाहत होती.
            सकाळी नाष्टा-चहा झाल्यावर गावातल्या नामदेवराव, दौलतभाऊ व इतर लोकांनी गावशिवार फेरीसाठी नेले. गावातले लोक चक्क रिज लाईन, माथा ते पायथा, LBS, CCT, जमिनीचा उतार अशा टेक्निकल भाषेत बोलत होते. पाणलोटाचे शास्त्र सांगत होते. गावात १९८६ पासूनच पाणलोटाची शास्त्रशुद्ध कामे झाली होती. ज्या गावाला पाणलोटाचे सर्व शास्त्र माहीत होते, त्या गावाने काल रात्री नवख्या मुलांनी पाणलोटाविषयी सांगितलेले सर्व काही शांतपणे ऐकून घेतले होते. आम्ही भारावून गेलो. येथूनच त्या गावाच्या खऱ्या ओळखीला सुरुवात झाली. ते गाव होते काकडदरा!!
            काकडदरा हे आर्वी तालुका मुख्यालयापासून ४० किमी अंतरावर, समुद्र सपाटी पासून ३८५ मीटर उंच, जंगलाच्या कुशीत वसलेले, ३७६ लोकसंख्येचे गाव. संपूर्ण वस्ती आदिवासी. मुख्य रस्त्यापासून आत आहे. सरकारी प्रवास साधने नाहीत. गट ग्रामपंचायत असल्याने, तसेच पंचायत समितीच्या विरुळ गणातील दूरचे शेवटचे गाव असल्याने दुर्लक्षित.
            या गावात ८६ नंतर विदर्भाच्या पाणलोटाचे pioneer असलेल्या श्री. खडसे सरांच्या मार्गदर्शनाखाली व असेफा संस्थेतर्फे काम सुरू झाले. त्यावेळी गावात १०-१२ दारुच्या भट्टया होत्या. जंगलातील लाकडाच्या मोळ्या विकून उपजीविका चालत होती. उन्हाळ्यात पाण्याची कमतरता होती. अशा परस्थितीत असेफाचे कार्यकर्ते श्री. घनश्याम भीमटे परिवारासहित तेथे राहायला गेले. त्यांच्या माध्यमातून हळूहळू अवैध जंगलतोड बंद झाली, अंगणवाडी सुरु झाली, दारुबंदी झाली. जलसंधारणाची कामे सुरू झाली. शेतांवर बांधबधिस्ती, कंटूर बांध झाले. इतर ठिकाणी LBS, CCT, मातीनाला बांध झाले. यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाली. सामुहिक विहिरीतून ओलित होऊन ८-१० शेतं भिजू लागली. कंटूरमुळे पीक उत्पादनात वाढ झाली. रोपवाटिका सुरु झाली. दर बुधवारी गावसभा होऊ लागली. ग्रामकोष जमा होऊ लागला. आठवड्यातून एक दिवस श्रमदान होऊ लागले. CCT व सागाची झाडे यासाठी सामाजिक वनीकरण विभागाकडून मिळालेले ५००० रुपये लातूरच्या भूकंपग्रस्तांसाठी पाठवून गावाने नवीन आदर्श निर्माण केला. अशा व्रतस्थतेने चांगली कामे झाल्याने ठाकुरदास बंग, अण्णा हजारे, रतन टाटा असे मोठे लोक-सामाजिक कार्यकर्ते व संस्था भेट देऊ लागले.
            मात्र १०-१५ वर्षांनी असेफाचे काम बंद झाले. काही वर्षे धरामित्रने काम केले. पण काही कारणास्तव हेही काम बंद झाले. २०१३ ला ढगफुटी झाली. प्रचंड पावसामुळे २ मातीनाला बांध फुटले आणि पाणी टंचाईला सुरुवात झाली.
            २०१७ मध्ये पानी फाउंडेशनमुळे वॉटर कपची संधी चालून आली. पाणलोटाचे शास्त्र व फायदे माहीत असल्याने हे आव्हान त्यांनी स्वीकारले. प्रशिक्षणाने उत्साहित झालेल्या प्रशिक्षणार्थींनी गावसभा घेऊन लोकांमध्ये उत्साह जागवला. संपूर्ण गाव कोरडवाहू म्हणजे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने मजुरीसाठी इतरत्र कामाला जात असते. पण स्पर्धेच्या कालावधीत (४५ दिवस) मजुरीवर न जाता काम केले. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी, ८ एप्रिलला मा. जिल्हाधिकारी व इतर अधिकारी गावात आले तेव्हा त्यांना १०० लोक श्रमदान करण्यात मग्न दिसले. त्यांना आश्चर्य वाटले. गावाची परिस्थिती समजल्यावर जिल्हाधिका-यांनी तात्काळ सर्व कामे रोजगार हमीमध्ये घेण्याचे आदेश दिले व सातत्याने त्याचा आढावा घेतला. लोक अधिक जोमाने कामाला भिडले. रोज जवळपास ८० ते १०० लोक कामाला असायचे. विशेषतः महिलांची उपस्थिती जास्त होती- जवळपास ५०-६०! अत्यंत मन लावून रोज सकाळी ७ ते दुपारी १ व शक्य त्या दिवशी संध्याकाळी ४ ते ६ लोकांनी काम केले. प्रति माणूस ६ घन मीटर असणारे श्रमदानाचे उद्दिष्ट गावाने उत्कृष्ठ गुणवत्तेचे काम करत पूर्ण केले.
            हे गाव एकजूट आहे. जेव्हा जेव्हा आम्ही गावात सभा बोलावली तेव्हा तेव्हा पूर्ण गाव सभेला उपस्थित राहात असे. कधी कधी १०-११ वाजेपर्यंत सभा चाले, तरी सर्वजण बसलेले असत. गाव विचारी आहे. कोणताही विषय पूर्ण समजून घेऊन, प्रश्नांवर चर्चा करुन निर्णय घेतले जातात. प्रत्येकाचे अर्धा एकर ओलित व्हावे एवढी माफक गावातील लोकांची अपेक्षा आहे. कितीतरी वेळा गावात राहण्याचा प्रसंग आला. गावाने नेहमी जेवणाची, राहण्याची चांगली व्यवस्था केली. महिलांविषयी बोलावे तेवढे कमी आहे. श्रमदानात मोठया संख्येने, गावसभेत मोठ्या संख्येने; तालुका व राज्य परीक्षक गावात आले तेव्हा गावसभेत व शिवारफेरीत मोठ्या संख्येने महिलाच उपस्थित होत्या. जास्त प्रश्नांची उत्तरेही महिलांनीच दिली.
            राज्य परीक्षक टीमने गावात झालेल्या सर्व कामांची प्रशंसा केली. त्या टीमचे अध्यक्ष मा.पोपटराव पवार म्हणाले, “काकडद-यासारखे अनघड दगडी बांध (LBS) आख्ख्या महाराष्ट्रात नाहीत. शिवार फेरीत एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला कुठेही नव्हत्या. मशीनच्या कामाची गुणवत्ताही चांगली आहे.याच उत्तमतेच्या गुणवत्तेवर काकडद-याने सत्यमेव जयते वॉटर कपमध्ये महाराष्ट्रात प्रथम येण्याचा मान मिळवला. वॉटरकप आणि ५० लक्ष रुपये असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

तूफान पेलणारे हात       
आर्वी तालुक्यातील प्रशासन सुरूवातीपासूनच या स्पर्धेसाठी उत्साही होते. प्रत्येक विभागातील अधिका-यांनी आम्हाला भरभरून सहकार्य केलं. कुणी गावागावात बैठकी आयोजित करण्यासाठी मदत केली; कुणी रात्रीच्या वेळीही गावसभांसाठी उपस्थित राहून मार्गदर्शन केले; कुणी स्पर्धा सुरू झाल्यावर नियंत्रण कक्ष स्थापन करून गावांचा रोज आढावा घेणे सुरू केले; कुणी रोजगार हमीच्या कामांना प्रशासकीय मान्यता तात्काळ देऊन कामांना वेग आणला; कुणी मशीनच्या कामांसाठी योजनेतून डिझेल पुरविण्याचे लाखो रुपयांचे काम आडकाठी न आणता सहकार्याने केले.
            रोटरी क्लब मुंबई व नागपूर यांनी काकडद-यात लोकांची बैठक घेऊन मिळून काम करण्याचे ठरवले. त्यामुळे मशीनचे असलेले प्रति हेक्टर १५० घन मीटर पाणीसाठा निर्मितीचे काम उत्तमरीतीने पूर्ण झाले.
            वॉटर कपमधील निर्माणींच्या योगदानाबद्दल आपण वेळोवेळी सीमोल्लंघन मध्ये वाचले आहे. इथे मला कुणाल परदेशी (निर्माण ६) व डॉ. सावित्री (निर्माण ७) यांच्या योगदानाचा विशेष उल्लेख करायचा आहे.
            कुणालला झुंज दुष्काळाशीया निर्माणच्या उपक्रमांतर्गत कृती कार्यक्रमाची आखणी व अंमलबजावणी या दोन्हीचा अनुभव होता. त्यानंतर मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तन दूत म्हणून त्याची निवड झाली. फेलोशिप सुरू व्हायला वेळ असल्याने गावपातळीवर काम करून अनुभव घ्यायचे त्याने ठरवले. आमच्याकडेही कामाचा व्याप नि कार्यकर्त्यांची गरज खूप होती.
            गावांनी वॉटर कप स्पर्धेत सहभाग घ्यावा म्हणून निर्माणींमार्फत २६ जानेवारीला गावागावात ग्रामसभा घेणे, सहभाग नोंदवल्यानंतर पानी फाउंडेशनच्या प्रशिक्षणासाठी गावांच्या टीम्स जमवून पाठवणे, प्रशिक्षणानंतर पाणलोटाच्या नियोजनासाठी गावागावांना तांत्रिक सहकार्य करू शकणारे स्वयंसेवक तयार करणे इ. अनेक कामे आम्ही एकत्र केली. या कामांचे नियोजन, प्रशिक्षणाची आखणी, फोन करून स्वयंसेवकांचा-प्रशिक्षणार्थींचा फॉलोअप घेणे, जेवण व इतर व्यवस्था पाहणे इ. कोणतीही आणि सर्वच कामे कुणालने केली. त्याने स्वतः पानी फाउंडेशनचे प्रशिक्षण घेतले. मग स्पर्धेदरम्यान गावागावांत फिरून जमिनीचा उतार काढण्यास मदत करणे, पाणलोटांच्या उपचारांची आखणी करुन देणे यातही त्याने स्वतःला झोकून दिले. स्पर्धा संपायला ८ दिवस राहिले असताना काकडदरा गाव जेव्हा राज्य स्तरावर बक्षीस मिळवू शकते असे वाटू लागले, तेव्हा कुणालने काकडद-यातच ठाण मांडला. श्रमदानाचे टारगेट पूर्ण करणे कठीण वाटू लागले तेव्हा ४५ डिग्री तापमानात स्वतः रोज श्रमदान केले. रोजची टारगेट्स ठरवून पूर्ण करून घेण्यात पुढाकार घेतला.
            कुणाल सरम्हणून त्याची गावागावात ओळख होऊ लागली. प्रचंड प्रेरणेने त्याने तब्बल ३-४ महिने voluntarily काम केले. योगायोगाने त्याला काकडदरा समाविष्ट असणारी सालदरा ही ग्रामपंचायत fellowship साठी मिळाली  आहे.
            सावित्री श्रमकार्यासाठी आली असताना आरोग्यासाठी आपण काकडदरा येथे काही तरी करुयात असे मी सुचवले होते. महिलांमधील अॅनिमियासाठी हिमोग्लोबिन टेस्ट करायचे ठरले. निर्माण शिबिरात असताना काकडदरा प्रथम आल्यावर आपणच जिंकलो असे तिला वाटले. शिबिरातून परत आल्यावर सावित्री तिच्या सुप्रभा व तेजस्विनी या २ मैत्रिणींसह काकडदरा येथे हिमोग्लोबिन
टेस्टिंग किटसह दाखल झाली. त्या तिघी, कुणाल व मी मिळून दिवसभरात १०० महिलांचे हिमोग्लोबिन टेस्टिंगसाठी रक्त घेतले. आता ते लॅब मध्ये टेस्ट करुन मग result आल्यावर पुढील दिशा ठरवू. आरोग्याच्या विषयावर काकडद-यात बरेच काम करायचे आहे. ज्यांना इच्छा आहे त्यांनी जरूर जोडल्या जावे.

माझे शिक्षण
            मी शेती करत असल्याने मला पाणलोटाच्या विविध उपचारांची माहिती होती. काही उपचार मी माझ्या शेतावर केलेले होते. गावात राहात असल्याने गावातील लोकांच्या मानसिकतेचा अंदाज होता. अनेक ठिकाणी जोडलेला असल्याने अनेकांचे इनपुट्स घेता आले. गावसभेत बोलण्याचा अनुभव येथे कामाला आला. Technical background असल्याने पाणलोटाचे शास्त्र गावकऱ्यांपर्यंत पोचवता आले. Coordinator बरोबरच technical कामही करता आले.
            एका गावात शेवटच्या ३-४ दिवसात राजकारण झाले, त्यामुळे त्यांची मशीन कामे अपूर्ण राहिली. नाहीतर तालुका स्तरावर त्या गावाने बक्षीस आणले असते. १-२ लोकांनी राजकारण केले, श्रम केलेल्या अनेकांना याचे वाईट वाटले. दुस-या एका गावात १६०० लोकसंख्या होती, पण ४५ दिवस सातत्याने फक्त २५ लोक काम करत होते. Hats off to their spirit! एक तर भारी गोष्ट घडली-एका गावात छोटा मंदार तयार झाला. पांजरा(बोथली) नावाच्या एका गावात चांगले काम झाले. तेथे एक लहान मुलगा रोज काम करायचा. बोलता बोलता तो एकदा म्हणाला की मी पुढे मंदार सरांसारखे काम करणार. त्याचे नाव लोकांनी छोटा मंदार ठेवले. यापेक्षा जास्त काम केल्याची सार्थकता काय असू शकते?
            यापूर्वी मी व्यवस्थेमध्ये काम केले नव्हते. एका मोठ्या व्यवस्थेमध्ये काम करण्याचा अनुभव व शिक्षण झाले. प्रशासनाची कामे कशी चालतात, त्यांच्या अडचणी काय असतात याचा प्रत्यक्ष अनुभव आला. प्रशासन नि लोकांमधला संवाद वाढण्याची गरज जाणवली. दोघे एकत्र आले तर चांगले काम होऊ शकते हे जाणवले. सामान्य माणसांत खूप ताकद असते. त्यांना योग्य प्रशिक्षण व support दिला तर लोकच चांगले काम करून दाखवतात. त्यामुळे लोकांसाठीपेक्षा लोकांसोबतकाम करणे जास्त effective असते असे जाणवले.
            महाराष्ट्र शासन पानी फाउंडेशन सोबत होते. त्यामुळे तालुका स्तरावरील प्रशासनाने त्यात लक्ष घातले. प्रशासन व गाव यातील संबंध खूप चांगले नव्हते. पण वॉटर कपमुळे ही दरी कमी झाली. जलयुक्त शिवार ही सरकारी कृषी विभागाची योजना होती; वॉटर कप ही लोकांची योजना होती. जलयुक्त शिवार मध्ये लोकांचे प्रतिनिधित्व नव्हते. वॉटर कप मध्ये लोक नि सरकार मिळून कामे ठरवत होती. जलयुक्त शिवारमध्ये काम करण्यावर जास्त भर होता, गुणवत्तेवर कमी. वॉटर कपमध्ये गुणवत्तेला १० गुण होते. जलयुक्त शिवारमध्ये पायथ्याशी जास्त कामे झाली, जसे की नाला खोलीकरण. वॉटर कपमध्ये माथा ते पायथा काम करण्यासाठी १० वेगळे गुण होते. वॉटर कपमध्ये शेतकऱ्यांच्या शेतावर कामे झाली, ओघळावर - छोट्या नाल्यावर कामे झाली. त्यामुळे प्रत्येक शेतकरी याच्याशी जोडला गेला. प्रत्येक घरी शोषखड्डे झाल्याने प्रत्येक घर जोडले गेले. जलयुक्तमध्ये मशीन काम झाले पण त्याच्या मोजमापाशी लोकांचे देणे घेणे नव्हते. वॉटर कपमध्ये शासनाने / संस्थेने मशीन काम केले, पण त्यात लोक सहभागी होते. त्याच्या गुणवत्तेवर लोकांची नजर होती. मोजमाप लोकांनी स्वतः केले. जलयुक्तमध्ये पैसा केंद्रस्थानी होता. वॉटर कपमध्ये श्रमशक्ती प्रमुख होती. पहिलं पाऊल गावाचं, दुसरं पाऊल पानी फाउंडेशन-शासन-संस्था यांचेहे लोकसहभागाचे गमक होते.
            वॉटर कप सुरु झाल्यापासूनच जलसंधारणाची कामे केल्याने पाणी तर येईल पण पुढे काय? जास्त गावे कोरडवाहू म्हणजे पावसाच्या पाण्यावर अवलंबून होती. म्हणून मग पाणी आल्यावर चारा, दुभत्या जनावरांमध्ये वाढ, त्यातून सेंद्रिय शेतीकडे वाटचाल, दूध व्यवसाय मत्स्यव्यवसाय - बकरी पालन यातून उत्पन्नात वाढ, फळबाग लागवडीमधून शेतीत बदल या दिशेने विचार सुरू आहे. अर्थात हे सर्व लोकांसोबत बसून, चर्चा करुन त्यांना वाटत असेल तरच मिळून करण्याचा विचार आहे. बघूया काय होतंय ते. स्वप्न आहे की काकडद-यासारखी गरीब गावेही म्हणू शकली पाहिजेत-
आम्ही प्रकाशबीजे रूजवीत चाललो

वाटा नव्या युगाच्या रूळवीत चाललो !मंदार देशपांडे, निर्माण ४

No comments:

Post a Comment