'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday, 8 November 2017

Judicial Activism Workshop

पुण्याला कायद्याचे शिक्षण घेणारा आपला मित्र दीपक चटप (निर्माण ७) आणि त्यांच्या काही मित्रांनी मिळून Judicial Activism कार्यशाळा पुण्याला आयोजित केली होती. या कार्यशाळेचा प्रमुख हेतू म्हणजे विद्यार्थांना जनहित याचिकेविषयी माहिती देणे, न्यायालयीन प्रक्रिया आणि संविधानात्मक मूल्यांशी परिचय करून देणे, नित्य उपयुक्त असणारे ड्राफ्टींग, इतर न्यायालयीन अर्जासोबतच न्यायव्यवस्थेचा प्रभावी शस्त्र म्हणून कसा उपयोग करता येईल याबाबतचे मार्गदर्शन करणे हे होते. तर जाणून घेऊया या कार्यशाळेबद्दल दिपकच्याच शब्दात ...
मोंटेस्क्यू (Montesque) ची "Separation Of Power Theory" लोकशाहीप्रधान देशात प्रचलित आहे. विधीमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ हे लोकशाहीचे तीन प्रमुख आधारस्तंभ आहेत. परंतु, काळानुरूप या तिन्ही बाबींचे आयाम विस्तारत चालले आहेत. तेव्हा संवैधानिक मूल्यांची जपवणूक करणे गरजेचे आहे तर या तिन्ही बाबींत समन्वय टिकेल आणि लोकशाही सदृढ होईल. हा समन्वय टिकवण्यासाठी न्यायिक सक्रियता (Judicial Activism) ही एक महत्वाची बाब आहे. ती समजून घेणे व तिचा प्रचार-प्रसार विद्यार्थी वर्गात होणे गरजेचे आहे, असे मला मनोमन वाटते.
विधी विद्यार्थ्यांमध्ये ‘समाजाभिमुख वकिली’चा आदर्श निर्माण करण्यासाठी मी व माझ्या मित्रांनी मिळून या कार्यशाळेचे पुण्यात आयोजन केले होते. या कार्यशाळेत १४७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटीलप्रख्यात विधिज्ञ असीम सरोदे, विधी अभ्यासक प्रा. गणेश शिरसाट, लेखक श्रीरंजन आवटे यांचं मार्गदर्शन व थेट प्रश्नोत्तरे यामुळे विधी क्षेत्रातील नवे आयाम समजण्यात ही कार्यशाळा उपयुक्त ठरली.
केवळ मोर्चा, आंदोलन, निषेध सभा न करता त्यासोबतच रचनात्मक काम देखील केलं पाहिजे या हेतूने ही कार्यशाळा आयोजित केली होती. यात विद्यार्थ्यांनी जनहित याचिका, मानवाधिकार, पर्यावरण संबंधीत प्रश्न तसेच समाजातील विविध समस्या सोडविताना न्यायव्यवस्थेचा प्रभावी शस्त्र म्हणून कसा वापर करता येईल (Judiciary as an important tool) या अनुषंगाने प्राथमिक स्तरावर ही कार्यशाळा झाली. वकिलीला केवळ व्यवसाय व धंदा  न मानता सामाजिक कर्तव्य पार पाडण्याचं माध्यम आहे हा विचार या कार्यशाळेतून रुजविण्यात आला.

यापुढे सहभागी विद्यार्थ्यांना त्यांच्या अवतीभोवतीच्या समस्यांचा संशोधनात्मक अभ्यास करून जर त्यांना समस्या निराकरणासाठी जनहित याचिकेसंदर्भात, पर्यावरणहित याचिकेसंदर्भात किंवा विधी मार्गदर्शन हवे असल्यास त्यांना ते मोफत देण्याचे आम्ही ठरविले आहे.

दीपक चटप, निर्माण ७

No comments:

Post a Comment