'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday, 17 January 2018

मयूर सरोदेची सेल्को, महाराष्ट्र सोबत कामाला सुरूवात

मुळचा नाशिकचा असलेला मयूर सरोदे (निर्माण ४) हा गेली काही वर्ष स्वतःची सौर उपकरणांची कंपनी नाशिकमध्ये चालवत होता. व्हीएनआयटी, नागपूरमधून बीटेक आणि आयआयटी, मुंबईमधून एमटेक केलेला मयूर सौर ऊर्जेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील ऊर्जा प्रश्नावर मागची ५ वर्ष काम करत आहे. त्याच्या नव्या प्रवासाविषयी जाणून घेऊया...

SELCO विषयी:
SELCO कंपनी ही एक Socio-Commercial Organization आहे. मायक्रो-फायनान्सद्वारे ग्रामीण भागातील जनतेला कर्ज उपलब्ध करून देऊन सौर ऊर्जा प्रणालीचा प्रसार करण्याचे काम गेल्या २३ वर्षांपासून कर्नाटक राज्यात करते आहे. सौर ऊर्जेचा वापर करून रोजगार निर्मितीचे अनेक प्रोजेक्ट्स वेगवेगळ्या ठिकाणी या कंपनीने केलेले आहेत. या कंपनीचे संस्थापक डॉ. हरीश हांडे यांना २०११ साली त्यांच्या कामासाठी रेमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला होता.
कर्नाटक राज्यामध्ये सुमारे ४० शाखांद्वारे ३,००,००० पेक्षा जास्त ग्रामीण घरांमध्ये आजपर्यंत SELCO द्वारा सौर ऊर्जा प्रणाली बसवली गेलेली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये बिहार, केरळ, ओडीसा, तामिळनाडू आणि महाराष्ट्र अशा राज्यांत एकूण १० शाखा सुरु झाल्या आहेत.

मयूरच्या कामाविषयी:
"सौर उर्जेचा वापर करून ग्रामीण विद्युतीकरण आणि त्याद्वारे ग्रामीण भागाचा विकास या क्षेत्रामध्ये गेली ५ वर्ष काम केल्यानंतर आता मला असं वाटतंय की, माझ्या स्वतःच्या मिशनमध्ये मदत करेल आणि तशी मला संधी देईल अशी कंपनी मला मिळाली आहे. जानेवारी २०१८ पासून मी SELCO INDIA या कंपनीमध्ये कामाला सुरुवात केली आहे. सध्या मी पुण्यातून काम करत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी नवीन शाखा स्थापन करून SELCO कंपनीचा विस्तार करण्याची जबाबदारी सध्या माझ्यावर आहे. महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या सामाजिक संस्थांना सोबत घेवून व स्थानिक परिस्थिती समजून घेवून त्याप्रमाणे तांत्रिक, आर्थिक आणि सर्विस इनोव्हेशन करून सौर ऊर्जेचा प्रसार करण्याचं काम सध्या मला करायचं आहे.
मी करत असलेल्या कामात तुमची नक्कीच मला मदत होईल. तुम्ही काम करत असलेल्या किंवा तुम्हाला माहित असलेल्या सामाजिक संस्थांना सौर ऊर्जा क्षेत्रामध्ये काही प्रकल्प करायचे असल्यास त्यांनी मला जरूर संपर्क साधावा."
मयूरला त्याच्या पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा!
मयुर सरोदे, निर्माण ४

No comments:

Post a Comment