'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday, 17 January 2018

निर्माणी व पानी: नवी भागीदारी

महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याच्या उद्देशाने पानी फाऊंडेशन ‘वॉटर कप’ ही पाणलोटाच्या कामांची स्पर्धा गावागावांमध्ये आयोजित करते. पहिल्या वर्षी (२०१६) ३ तालुक्यांत, तर दुस-या वर्षी (२०१७) ३० तालुक्यांत ही स्पर्धा आयोजित केली गेली होती. २०१८ ची तिसरी वॉटर कप स्पर्धा विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील ७५ तालुक्यांमध्ये आयोजित केली जाणार आहे. या वाढत्या भौगोलिक विस्ताराला प्रतिसाद देत निर्माणींनी वॉटर कप ३ मध्ये जबाबदारीच्या भूमिका घेतल्या आहेत.
            चिंतामणी पवार (ता. उमरखेड, जि. यवतमाळ), प्रताप मारोडे (ता. संग्रामपूर, जि. बुलढाणा), प्रवीण डोणगावे (ता. आर्वी, जि. वर्धा), गौरी चौधरी (ता. वरूड, जि. अमरावती), ज्ञानेश मगर (ता. शिंदखेडा, जि. धुळे), प्रफुल्ल सुतार (ता. माण, जि. सातारा) विशाल चौधरी (ता. अंबाजोगाई, जि. बीड) यांची तालुका समन्वयक पदासाठी निवड झाली आहे. प्रत्यक्ष तालुक्यात राहून व गावागावांत फिरून स्पर्धेबाबत माहिती देणे, स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी गावांना प्रेरित करणे, गावक-यांच्या प्रशिक्षणाचे नियोजन करणे, प्रशासन व गाव यातील दुवा म्हणून सक्रिय राहणे, गावे पाणीदार व्हावीत यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे हे तालुका समन्वयकांचे काम आहे.
            स्वप्नील अंबुरेची तांत्रिक प्रशिक्षक म्हणून निवड झाली आहे. वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावातील गावकऱ्यांना जलसंधारणातील पाणलोट विकासाचे तांत्रिक प्रशिक्षण देणे, गावांच्या तांत्रिक अडचणी सोडवण्यास मदत करणे व प्रत्यक्षात गावांना भेटी देऊन शास्त्रीयरित्या जलसंधारणाचे उपचार करण्यास मदत करणे हे तांत्रिक प्रशिक्षकांचे काम आहे.
            याशिवाय मागील वर्षी उमरखेड तालुक्याचा (जि. यवतमाळ) समन्वयक असणारा संतोष गवळे  यवतमाळच्या ४ व वाशिमच्या २ तालुक्यांच्या समन्वयाची जबाबदारी सांभाळणार आहे. मागील वर्षी आर्वी तालुक्याचा (जि. वर्धा) समन्वयक असणारा मंदार देशपांडे एका तालुक्याच्या समन्वयाची जबाबदारी घेणार असून आपल्या अनुभवाच्या आधारे विदर्भातील उत्साही गावांना नियोजन व अंमलबजावणीत मदत करणार आहे.
            स्पर्धेतील अनेक तालुक्यांमध्ये निर्माणी सक्रिय असून इतर निर्माणींना स्वयंसेवक म्हणून या तालुक्यातील गावांना पाणीदार होण्यासाठी मदत करण्याची व शिकण्याची संधी मिळेल.
या सर्व टीमला मनापासून शुभेच्छा!
पानी फाऊंडेशनबद्दल अधिक माहितीसाठी:
                                                                                                                            
स्त्रोत: निखिल जोशी, निर्माण ४
  

No comments:

Post a Comment