'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday, 17 January 2018

Managing the Non-Profit Organization Peter Drucker

सामाजिक संस्थांचं व्यवस्थापन हा माझा जिव्हाळ्याचा विषय! २००३ सालपासून करत असलेल्या (एकूण १३ वर्षे) कामापैकी नऊ वर्षे मी सामाजिक संस्थांत काम केलं. त्यातही माझं काम back end (administration वगैरे) चं होतं. हे काम करताना त्यातल्या अडचणी समजायला लागल्या आणि ‘या कामाचं व्यवस्थापन कसं सुधरवता येईल?’ हा माझा जिव्हाळ्याचा (आणि कामाचा) विषय झाला. यातच गेल्या वर्षी पीटर ड्रकरचं ‘Managing the Non-Profit Organization’ हे पुस्तक हातात पडलं आणि झरझर झरझर वाचूनही झालं.

पुस्तकात काय आहे त्याकडे जाण्याआधी पुस्तकाच्या लेखकाविषयी थोडसं
            पीटर ड्रकर हे पश्चिमेतील अतिशय नावाजेलेले ‘व्यवस्थापन गुरु’, इतके की त्यांना ‘Founder of Modern Management’ म्हणूनही ओळखलं जातं. विशेषतः ‘Management by Objective’ या संकल्पनेच्या मांडणीसाठीही त्यांचं काम अग्रक्रमी आहे. ४० वर्षांहून अधिक त्यांच्या कॉर्पोरेट क्षेत्रातील, शिक्षण क्षेत्रातील केलेल्या कामासोबतच अमेरिकेतील सामाजिक संस्थांच्या कामातही त्यांचा सक्रीय सहभाग होता. या कामाच्या अनुभवांतून हे पुस्तक लिहीलं गेलं.

आता पुस्तकाविषयी
आपण सामाजिक संस्थांमध्ये काम करताना ‘मिशन स्टेटमेंट, गोल्स’ असे शब्द आजकाल बरेच वेळा ऐकतो. पैसा हे जवळपास साचेबद्ध मिशन असणाऱ्या कॉर्पोरेट जगापेक्षा सामाजिक संस्थाना ‘मिशन स्टेटमेंट’ ही गोष्ट कितीतरी अधिक लागू होते. पण बरेचदा ‘मिशन स्टेटमेंट’ हा संस्थेच्या वरच्या लोकांनी करायचा विचार आहे, किंवा ‘संस्थेचं जे काय असेल ते मिशन स्टेटमेंट असो, मला तर हे हे काम करायचं आहे’ असा याकडे पाहण्याचा दृष्टीकोन असतो. बरेचदा हे मिशन स्टेटमेंट लिहिताना पुरेसा विचार होत नाही. “आम्हाला काय करायचं ते माहिती आहे नं? झालं तर मग” अशी साधारण प्रतिक्रिया असते. आणि मग आपण जे काम करतो त्याच्याशी ताळमेळ नसणारं, काहीतरी अघळपघळ असं वाक्य ‘मिशन स्टेटमेंट’ म्हणून लिहीलं जातं. जे एकतर जगातल्या सर्व समस्या सोडवायला सिद्ध असतं नाहीतर स्वतःच एक समस्या असतं (त्याचा अर्थ लावणं, या अर्थाने).
पण खरंतर कोणतंही काम उभारण्यामागे ‘आम्हाला नक्की काय काम करायचं आहे (आणि काय करायचं नाही) हे संस्थेतल्या प्रत्येकाला माहिती असणं ही पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे. संस्थेतील प्रत्येकाला मिशन स्टेटमेंट हे एका ध्रुव ताऱ्यासारखं असतं जे त्यांच्या कामाची दिशा ठरवतं, कामाची प्रेरणा देत राहतं आणि मागे वळून बघताना कुठं पोहोचलो ते सांगतं. पण मग हे मिशन स्टेटमेंट लिहावं कसं? ते संस्थेतील सर्वांपर्यंत कसं पोहोचवावं? एकदा लिहिलं की ते ‘ब्रम्हवाक्य’ होतं की ते सुद्धा वेळोवेळी घोटवून सुधारत राहावं लागतं? अशा महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं हे पुस्तक देतं.  याचप्रमाणेच,
*      सामाजिक संस्थांच्या कामाचं मार्केटिंग करावं का? मुळात मार्केटिंग म्हणजे नक्की काय? सामाजिक क्षेत्रात त्याचं स्थान काय?
*      सामाजिक कामांत पूर्णवेळ कार्यकर्त्यांचं, स्वयंसेवकांचं, विश्वस्तांचं महत्व काय, योगदान काय?
*      या कामासाठी लागणारा पैसा कसा उभा करावा, तो गरजेप्रमाणे उभा करू शकणारी सक्षम यंत्रणा कशी बनवावी?
*      कामाची परिणामकारकता कशी मोजावी? त्याचे मापदंड कसे ठरवावे?
*      कामात महत्वाचे निर्णय घेताना, बदल घडवून आणताना काय पायऱ्या फॉलो केल्या पाहिजेत?
*      हे सर्व करत असताना स्वतःची वाढ कशी कायम ठेवावी?
अशा खूप साऱ्या महत्वाच्या प्रश्नांचा विस्तृत उहापोह पुस्तकात घेतला आहे.

आता पुस्तकातील विषयांच्या मांडणीबद्दल थोडेसं
पुस्तकातील मजकुराची मांडणी ओघवती असूनही अतिशय मुद्देसूद आहे. पुस्तकातील प्रत्येक विषय (उदा. कामाची परिणामकारकता कशी मोजावी)
*      सुरुवातीला महत्वाचे मुद्दे – त्यातही प्रत्येक गोष्टीत काय करावे, सोबतच काय करू नये याची स्पष्टता
*      त्यानंतर त्या विषयावर भरीव काम केलेल्या सामाजिक क्षेत्रातील (अमेरिकेतल्या अर्थात) व्यक्तींच्या मुलाखती
*      आणि शेवटी पूर्ण विषयाचा सारांश किंवा ‘action implications’ असा उलगडत जातो.
पुस्तक वाचताना लेखकाच्या दांडग्या अनुभवाचा, एखाद्या विषयाचे सार काढून मांडण्याच्या सचोटीचा, वारंवार प्रत्यय येतो. कामाचे व्यवस्थापन अतिशय महत्वाचे असले तरी ते ज्यासाठी करत आहोत ते काम, त्यामागची मुल्यव्यवस्था, त्यात काम करणाऱ्या लोकांच्या कामाबद्दलच्या प्रेरणा, एकत्र पाहिलेली स्वप्न, अशा मुलभूत गोष्टी व्यवस्थापनाइतक्याच किंबहुना काकणभर अधिक महत्वाच्या आहेत हे पुस्तकात वेळोवेळी मांडले जाते.

तसंच आपल्या कामात नेहमी समोर येणारे छोटे छोटे प्रश्न, अडचणी लेखकाच्या नजरेतून सुटत नाहीत. उदा. काम सुरु करून काही वर्षे झाली की हळू हळू त्यात तोचतोचपणा यायला सुरवात होते. अशावेळी यातून बाहेर कसं पडावं? कामात ‘Self-Renewal’ कसं करावं याबाबत पीटर ड्रकर लिहितात – ‘The three most common forcing tools for sustaining the process of self-renewal are teaching, going outside the organization, and serving down in the ranks.’ आणि पुढे हे तीन मुद्दे विस्तृत समजावून सांगितले आहेत. तर असं हे ‘व्यवस्थापन विशेष’ पुस्तक सामाजिक क्षेत्रात काम करत असणाऱ्या, किंवा काम करू इच्छिणाऱ्या सर्वांसाठीच वाचनीय आहे.

केदार आडकर, निर्माण ५

No comments:

Post a Comment