'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 5 April 2018

आदिवासींच्या पोषणासाठी पंचायत राज कॉंवर्जन्स

आकाश पतकी (निर्माण ) याने जानेवारी २०१८ पासून अवन्था फाउंडेशनमध्ये सक्षमया प्रकल्पामध्ये काम करण्यास सुरुवात केली. आदिवासी भागातील अंगणवाडीतील मुलांचे पोषण कसे सुधरवता येईल, यावर आकाश सध्या काम करत आहे. जाणून घेऊया त्याच्या नवीन कामाबद्दल आणि निर्णयाबद्दल.

हा निर्णय घेताना काय विचार केला
छत्तीसगढमध्ये ३ वर्षे प्रधानमंत्री ग्रामीण विकास फेलो म्हणून नारायणपूर जिल्ह्यात काम केल्यानंतर मी २०१७ मध्ये राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन छत्तीसगढमध्ये राज्य कार्यक्रम प्रबंधक म्हणून काम करत होतो. ज्यात मुख्यत्वे पंचायती राज संस्थांसोबत अभिसरण (कॉंवर्जन्स), मिशन अंत्योदय गरीबी मुक्त ग्राम पंचायत या योजनांसाठी राज्य आणि केंद्र सरकारशी समन्वय या पद्धतीचे काम होते.

त्या आधी प्रधानमंत्री ग्रामीण विकास फेलो म्हणून एका जिल्ह्यात जनरलिस्ट (गरज आहे त्या-त्या विषयांमध्ये कार्य) म्हणून काम समाधानपूर्वक आणि उत्साहाने करत होतो. कारण तिथे प्रत्यक्ष लोकांशी संबंध जास्त होता, जबाबदाऱ्या प्रत्यक्ष आणि लोकाभिमुख होत्या. आणि स्वत:चा अभ्यास आणि पुढाकार घ्यायला वाव होता. हे सर्व राज्य प्रबंधक म्हणून काम करताना शक्य होत नव्हते. राज्य स्तरावर काम करताना मानव संसाधनाची कमी असल्यामुळे वेळोवेळी कामाच्या प्राथमिकता, स्वरूप बदलत जाते आणि ते येणाऱ्या अधिकाऱ्यांच्या व्यक्तिमत्व, उद्देश आणि क्षमतेनुसार बदलत जाते. विशेषतः सामाजिक सेवां/योजनांमध्ये, मुख्यत्वे गुणात्मक बदल अपेक्षित असतो. परंतु प्रशासनाचा पसारा आणि परिणाम दाखवण्याची सहजता यामुळे अशा योजनांचे आउटपुट हे आउटकमपेक्षा प्रबळ होऊन संख्यात्मक बाबींवरच जास्त भर दिला जातो. एखाद्या गोष्टीचा पूर्ण अभ्यास न करताच पॉलिसी बनवणे, आणि गोष्टी करवून घेणे या पद्धतीने काम होत होते. जर सामाजिक विषयांवर काम करायचं आहे तर अभ्यास आणि संशोधन याला पर्याय नाहीच. शिवाय फिल्डशी संबंध अतिशय कमी/ नगण्य झाला होता. असे काम करण्याची माझी क्षमता आणि तयारी दिवसेंदिवस कमी होत होती. त्यामुळे एका विषयाला धरून शिकायची आणि काम करण्याची इच्छा झाली. माझ्या पुढील वाटचालीसाठी हा बदल मला व्यक्तिश: आवश्यक होता. यामुळे मी नोव्हेंबरमध्ये राजीनामा दिला आणि नवीन कामाचे पर्याय शोधू लागलो.
महाराष्ट्रातील आदिवासी भागातील ग्राम पंचायती सोबत महिला आणि बाल स्वास्थ्य, सुपोषण या विषयासाठी पंचायत राज कॉंवर्जन्स (PRI - Convergence) या कार्यक्रमात अवन्था फाउंडेशन, पुणे यांच्याकडे एक संधी मिळाली. कॉंवर्जन्स विषयावर काम केले असल्याने यात आवड होती. शिवाय ग्रामीण विकास विषयात प्रोफेशनल म्हणून काम करण्यासाठी ग्राम पंचायत आणि कॉंवर्जन्स हे दोन्ही विषय शिकणे आवश्यक होते. शिवाय या नवीन प्रोजेक्टच्या निमित्त्याने मेळघाट, गडचिरोली या भागात पुन्हा काम करण्याची संधी मिळत होती.  म्हणून मी जानेवारी २०१८ मध्ये अवन्था फाउंडेशन येथे जॉईन झालो.

नवीन कामाबद्दल
अवन्था फाउंडेशनद्वारा राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य आणि पोषण मिशन, जिल्हा परिषद अमरावती, गडचिरोली, नाशिक, पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने सक्षमकार्यक्रमाची अंमलबजावणी केली जात आहे. याचा उद्देश महाराष्ट्रातील १९ आदिवासी तालुक्यातील गरोदर माता व ३ वर्षाखालील मुलांच्या आरोग्य व पोषण निर्देशांकात (Maternal Infant Young Child Nutrition –MIYCN indicators) वाढ  घडविणे हा असून यात अंगणवाडी स्तरावरील कामे, व्हिडिओ शो, जनजागृती (माता व परिवार), अंगणवाडीताई व आशाताईचे कौशल्य वाढविणे, पोषणाशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंधीत विभागांमध्ये समन्वय वाढविणे इत्यादी कामे सक्षम न्युट्रीशन फेलोच्या माध्यमातून केली जात आहेत.
परंतु कुपोषण हा विषय केवळ अंगणवाडी, आणि स्वास्थ्य केंद्र आणि कर्मचारी यांच्याशी निगडीत नसून संपूर्ण ग्रामीण परिवेशाशी निगडीत आहे. ज्यात स्वच्छता, पाणी, शेती, इन्फ्रास्ट्रक्चर, वन, शिक्षण, रेशन, रोजगार, गरीबी अशा अन्य सर्व विषयांचे महत्वपूर्ण संबंध आहेत. यासाठी ग्राम पातळीवर ग्राम पंचायत आणि ग्राम सभा यांच्या सोबत समन्वय करून या सर्व योजना/विभागांचा कॉंवर्जन्स - अभिसरण घडवून आणणे आवश्यक आहे.
यासाठी PRI-Convergence या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली. पायलट स्तरावर गडचिरोलीच्या १८ ग्राम पंचायती निवडून त्यांच्यासोबत अभ्यास कार्यक्रम सुरु केला आहे. महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम, विभिन्न विभागांचे कायदे, नियम, सर्क्युलर, विभिन्न स्तरावरील समन्वयाची यंत्रणा यांचा अभ्यास करून ग्राम पंचायातींना त्याबद्दल जागरूक करणे, ग्राम पंचायात सदस्यांचा आणि कर्मचाऱ्यांचा क्षमता विकास करणे आणि ग्राम पंचायतीला एक संस्था म्हणून या विषयासाठी कार्य करण्यास प्रवृत्त करणे यासाठी या कार्यक्रमात प्रयत्न केले जातील आणि PRI-Convergence करीता एक तंत्र विकसित करण्याचा या पायलट प्रोजेक्टचा उद्देश आहे. त्यानंतर हा अन्य आदिवासी तालुक्यांमध्ये लागू केला जाईल.
आकाशला त्याच्या पुढील कामासाठी खूप शुभेच्छा!
                                                                                                          
                                                                                                                                                                                                                                                                        आकाश पतकीनिर्माण २
                                                                                                        akash.patki@gmail.com

No comments:

Post a Comment