'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday, 4 April 2018

स्मिता DFY ला कामासाठी रुजू

डॉ. स्मिता तोडकर (निर्माण ४) गेल्या डिसेंबरपासून Doctors For You (DFY) या संस्थेसोबत मसाढी, जि. पटना, बिहार येथे रुजू झाली. या निर्णयापर्यंत ती कशी पोहचली, तिच्या सुरवातीच्या कामादरम्यान तिला काय अनुभव आले, आणि त्यातून कामाची पुढची वाट कशी सापडत आहे हे जाणून घेऊयात तिच्याच शब्दात -
बिहार म्हणताच डोळ्यासमोर येतात चोरी-मारी, लूट-पाट, भ्रष्टाचाराच्या असंख्य बातम्या. आरोग्य या क्षेत्राबाबतच बोलायचे तर बालमृत्यू, मातामृत्यू, खालावलेले आरोग्य अशा काही. पण मग खरच बिहार असाच आहे का? की मग गडचिरोलीबद्दल आपण जे वाचतो नि जसा तो लांबून वाटतो, त्याहून प्रत्यक्षात तो निराळाच दिसतो. बिहारबद्दल माझी धारणा अगदी अशीच होती. पण मग ठरवले की काहीही मत बनविण्यापेक्षा जाऊन प्रत्यक्ष पाहावे.

दि. ११ डिसेंबरला सकाळी ५ वाजता पटनापासून ३०-३५ किलोमीटरवर असणाऱ्या मसाढी या गावी मी Doctors For You (DFY) या संस्थेत काम करण्यासाठी येऊन पोहचले. सोबत SEARCH, ज्ञानप्रबोधिनी, SPARSH, Swasthya Swaraj इथे केलेले काम आणि नुकतीच मिळालेली MPH (Master of Public Health) ची पदवी अशी अनुभवाची शिदोरी होतीच. सुरवातीला एक महिना काम करून बघायचं असं ठरवलं होतं पण डिसेंबर नि सुरुवातीचा जानेवारी केवळ कामाचे स्वरूप समजून घेणे आणि आजबाजूच्या गावांना भेट देऊन पाहण्यात गेला, इथे नक्की समस्या काय आहेत हे समजून घेण्यात गेला. म्हणून मग हा कालावधी वाढवावासा वाटला.
मग हळूहळू लक्षात येत गेलं. इथल्या रूढी, परंपरा, खोलवर रुजलेल्या अंधश्रद्धा, रुजलेली सावकारी, जातपात नि त्यामुळे असणारी गरिबी अशा कितीतरी गोष्टी लक्षात येत होत्या पण त्यासोबतच जाणवले की लोकांना त्यांच्या गरजांची जाणीव आहे. त्यासाठी तुम्ही काही काम करत असाल तर त्यांच्यापरीने ते मदतही करतात.
इथे राहणारे मुसाहरया जमातीचे लोक शोषणाला सर्वाधिक बळी पडलेले आहेत. ज्ञानाअभावी आणखीनच दबले आहेत. त्यात बालविवाह ही खूपच नॉर्मल गोष्ट! या दरम्यान लक्षात आले की गावातून ८०% महिला जवळच्या सरकारी दवाखान्यात प्रसूती करिता जातात, जननी सुरक्षा योजनेचा लाभ घेतात. पण गर्भावस्थेत उपचार अथवा तपासणी करण्यासाठी मात्र त्या दवाखान्यात जात नाहीत. याची फलश्रुती मग कुपोषण आणि बालमृत्यू मध्ये होते. केवळ पटना जिल्ह्यातील ग्रामीण भागापुरते बोलायचे तर
 केवळ ७०% Immunization होते,
 केवळ १३% मातांची ४ वेळा गर्भावस्थेदरम्यान (Ante Natal Check up) तपासणी होते,
 ३३% मुलींचा विवाह १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच होतो,
 केवळ ६०% लोकच साक्षर आहेत (त्यातही वरच्या जातीचे अधिक).
(पटणाबद्दल अधिक माहितीसाठी ही लिंक पहा  - India Demographic and Health survey 2015-2016 - http://rchiips.org/NFHS/FCTS/BR/BR_FactSheet_230_Patna.pdf)
मग या सर्वांवर शाश्वत आणि परिणामकारक (Sustainable) असे काय काम करता येईल? त्याचा Research कसा करता येईल? किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी व आरोग्य यासंबंधी काही काम करता येईल का? असा विचार सुरु झाला. सोबत डॉक्टर या नात्याने रुग्ण तपासणीही सुरु होतीच.
              म्हणूनच मग Evidence Based काम कसे करता येईल, त्या मुलींना (त्यांच्या आरोग्यासंबंधी) काय माहित आहे हे जाणून घेता येईल का? त्याचा अभ्यास करता येईल का? अशा प्रश्नांवर मी काम करायला सुरुवात केली. त्यातून सध्या जवळपास ३५० मुलींपर्यंत पोहचून त्यांचे याविषयीचे ज्ञान, विचार नि त्या काय काय करतात याचा अभ्यास करत आहे.
 मुलींमधील ३० मुली (८.६%) कधीही शाळेत गेलेल्या नाहीत,
 ८४ मुलींनी (२६.२५% - ३२० पैकी) ७ वी पूर्वीच शाळा सोडलेली आहे,
 ५०% पेक्षा जास्त मुली ह्या मासिक पाळी दरम्यान अंघोळ करत नाहीत,
 केवळ ३०% मुलींच्याच घरी बाथरूम अथवा तत्सम सुविधा आहे.
या आणि अशाच इतर कितीतरी धक्का देणाऱ्या गोष्टी समोर येत गेल्या.सध्या इथे Out-reach Doctor नि Public Health Professional अशा दुहेरी भूमिकेत कामाला आकार देण्याचा प्रयत्न करते आहे. पूर्वीच्या कामाचा अनुभव, SEARCH मध्ये लागलेली कामाची नोंद करण्याची सवय नि सध्या नुकतेच मिळालेली मोजमापाची दृष्टी यांची सांगड घालण्याचा प्रयत्न सुरु आहे. सोबतच बिहार समजून घेणे ही सुरु आहेच. आरोग्य शिक्षणहे खूप चिकाटीने करण्याचे काम आहे, हेही पुन्हा नव्याने उमगते आहे!
स्मिताला तिच्या या नव्या कामासाठी खूप साऱ्या शुभेच्छा!
                                                                                                 
                                                                                                    स्मिता तोडकरनिर्माण ४

No comments:

Post a Comment