'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday, 4 April 2018

प्रियंका सोनवणे QUEST मध्ये रुजू

मुळची अहमदनगर जिल्ह्यातली प्रियांका सोनवणे (निर्माण ८) नुकतीच QUEST या पालघर जिल्ह्यातील संस्थेसोबत काम करण्यासाठी रुजू झाली. शिक्षणाने MSW असलेली प्रियंका नोकरी करत होती. तिच्या कामाबद्दल ती सांगत आहे.


२०१५ मध्ये मी MSW पूर्ण केले आणि सर्वांप्रमाणे माझीही नोकरी शोधण्याची धडपड सुरु झाली. आयुष्यातील पहिल्या टप्प्याला (चार भिंतीतील घेतलेलं शिक्षण) काही पर्याय नव्हता म्हणून ते सोसणं भागच होतं. पण आयुष्याच्या दुसऱ्या टप्प्याची निवड करताना मला सोसलेपणाची भावनाच नको होती. मला हवा होता निख्खळ आनंद, समाधान, प्रेम, आपुलकी आणि जगण्यासाठी गरजेपुरते पैसे. आणि नोकरी नावाच्या प्रवासाला सुरुवात झाली. शिकायला खूप मिळत होतं पण यापेक्षा वेगळं काहीतरी हवं होतं. पण हे वेगळं म्हणजे नेमकं काय, हे समजत नव्हतं. हे शोधण्यासाठी मित्रांशी बोलली, स्वतःला बराच वेळ दिला, भरपूर वाचन केलं. साधारण हे लक्षात आले की आदिवासी भागात जाऊन लहान मुलांसोबत काम करायला मला आवडेल आणि समाधान मिळेल. पण त्याची सुरुवात कशी करू, कुठून करू, पुन्हा गोंधळ.
याच दरम्यान माझ्या एका निर्माणी मित्राशी चर्चा झाली. त्याने मला निर्माणबद्दल सांगितलं. निर्माणच्या शिबिराची मला माझे प्रश्न समजण्यात खूप मदत झाली. नायना शिबिरात एकदा म्हणाले होते -  बदल हवा असेल तर समस्या आहेत तिथे जायला पाहिजे, घरी बसून उपयोग नाही. या वाक्याने मला निर्णय घेण्यासाठी खूप मदत झाली. आणि मी ठरवले की अशा सामाजिक संस्थेत काम करायचे जी मला आदिवासी भागात राहून काम करण्याची संधी देईल.काही संस्थेंची नावे समोर होती त्यात QUEST हे एक होते. १० फेब्रुवारीपासून QUEST या संस्थेसोबत काम करायला सुरुवात केली. सध्या मी पूर्वप्राथमिक शिक्षणावरील उपक्रमाअंतर्गत Project Coordinator आहे. ३ ते ६ वयोगटातील बालकांना अंगणवाडीच्या माध्यमातून शिक्षण, या उपक्रमातील साधनांची निर्मिती, अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण, असे सध्या कामाचे स्वरूप आहे.
प्रियंकाला तिच्या नव्या कामासाठी खूप शुभेच्छा!

                                                                                                                                                                                                                                                                          प्रियंका सोनवणेनिर्माण ८

No comments:

Post a Comment