'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Monday, 9 July 2018

मेहनतकशो के स्वास्थ्य के लिये...

प्रेरणा राऊत (निर्माण ) एप्रिल महिन्यात दल्ली राजहरा, छत्तीसगढमध्ये शहीद हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाली. दल्ली राजहरा येथे कोळसा खाणीत काम करणाऱ्या कामगारांचा मोठा लढा उभा राहिला होता. त्या लढ्यातून कामगारांना आरोग्य सेवा मिळावी म्हणून कामगारांनी निर्माण केलेलंशहीद हॉस्पिटल’. जाणून घेऊया तिच्या नवीन कामाबद्दल आणि निर्णयाबद्दल.

मी आणि माझा नवरा रणजीत, आम्ही दोघांनी मिळून एप्रिल २०१८ पासून शहीद हॉस्पिटल, दल्ली राजहरा, छत्तीसगढ़ इथे सामाजिक स्वास्थ्य या विभागात काम करायला सुरुवात केली. इथे काम सुरु करण्याआधी मी मेळघाट मधील एका सामाजिक संस्थेत अडीवर्षे विविध प्रकल्पाअंतर्गत काम करत होते. मेळघाटमध्ये काम करत असतांना मला मेळघाटमधील कोरकू लोकांची संस्कृती, त्यांचे बदलते जीवनमान, शेतीत होणारे विविध बदल, कुपोषण आणि त्याच्याशी निगडित असलेले विविध पैलू तसेच नवजात, अर्भक, अर्भोकत्तर व माता मृत्यू आणि त्या मृत्युंची विविध कारणे यासोबतच १६ ते ६० वर्षे या वयोगटातील लोकांना होणारे विविध आजार व त्यांच्या मृत्युंची कारणे इत्यादी गोष्टींचा अभ्यास करता आला. या सगळ्या अनुभवाची शिदोरी घेउन मी शहीद हॉस्पिटल, दल्ली राजहरा, छत्तीसगढ़ इथे काम करायला सुरुवात केली.
शहीद हॉस्पिटलमध्ये काम करत असताना या हॉस्पिटलचा पाया ज्या सिद्धांतावर उभा आहे त्या सिद्धांतावर ठाम राहून सगळ्या कामांची आखणी करणे हे सगळ्यात मोठे आव्हान आहे, असे मला वाटते. कारण शहीद हॉस्पिटल म्हणजे इथल्या खाण कामगारांनी त्यांच्या आरोग्यासाठी केलेल्या संघर्षाची, दिलेल्या बलिदानाची व गाळलेल्या घामाची फलश्रुती आहे. इथे काम करत असलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला याची जाणीव असल्यामुळे इथे उपचार घेणाऱ्या प्रत्येकाला हे रुग्णालय आपले वाटते. त्यामुळे याच धाग्याला पुढे धरून हा विचार गावपातळीवर कसा नेता येईल व गावातल्या लोकांना कुठलाही आरोग्यविषयक कार्यक्रम हा त्यांचा आपला कार्यक्रम आहे हे कसे वाटेल याचा विचार सतत डोक्यात ठेऊन काम करावे लागते. अर्थात सामाजिक स्वास्थ्य विभागात अशाच पद्धतीच्या कामाची अपेक्षा असते.
कामाच्या संदर्भात बोलायचे झाले तर सध्या मी, रणजीत अणि शहीद हॉस्पिटलमधील आमचे काही साथीदार मिळून “टी. बी. भगाबो, गाव बचाबो” या टी.बी. निर्मुलन प्रकल्पाअंतर्गत काम करतोय. यात आम्ही गावातीलच काही लोकांना (जे स्वच्छेने व कुठल्याही आर्थिक लाभाची अपेक्षा न ठेवता आमच्या सोबत आलेत, त्यात अर्थातच गावातले तरुण व किशोरवयीन मुले, मुलीच जास्त आहेत) सोबत घेऊन त्याना टी. बी. होण्याची कारणे, लक्षणे, बचाव, विविध तपासन्या, उपचार केंद्रे व उपचार पद्धती इत्यादींची माहिती देतोय. त्यासोबतच त्यांना गावातील लोकांचा सर्वे कसा करायचा टी. बी. चे संशयित रुग्ण कसे ओळखायचे व त्यांचे स्पुटम घेऊन स्मिअर कसे तयार करायचे इत्यादींचे प्रशिक्षणसुद्धा देतोय जेणेकरून टीबीच्या संशयित रुग्णाची योग्य वेळेत तपासणी होऊन त्याला टीबी असल्यास लवकरात लवकर औषधोपचार सुरु व्हावेत हा या मागचा सगळ्यात महत्वाचा हेतू आहे. तसेच ‘किशोर स्वास्थ्य’ या कार्यक्रमाअंतर्गत गावातील किशोरवयीन मुला-मुलींना त्यांच्या शारीरिक, मानसिक व लैंगिक आरोग्याविषयी मार्गदर्शन करण्याचे कामदेखिल सुरु आहे. शिवाय आत्ताच छत्तीसगढ़मधील शाळांच्या उन्हाळी सुट्या संपलेल्या आहेत त्यामुळे दल्ली राजहरा व त्याच्या आसपासच्या शाळांमध्येसुद्धा ‘किशोर स्वास्थ्य’ हा कार्यक्रम राबवण्याचा मानस आहे. पावसाळा सुरु झाल्यामुळे पावसाळ्य़ात होणारे विविध आजार व बचावात्मक उपाय इत्यादींचे मागदर्शन करण्याचे कामसुद्धा गावपातळीवर सुरु आहे. यासगळ्या आरोग्यविषयक कामांसोबतच इथली संस्कृती, घरांची रचना, शेती व आधुनिकरणाचा यासगळ्या गोष्टींवर झालेला परिणाम याचा देखिल अभ्यास सुरु आहे.
प्रेरणाला तिच्या पुढील कामासाठी खूप शुभेच्छा

प्रेरणा राऊत, निर्माण ४


No comments:

Post a comment