'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Friday, 12 October 2018

संपादकीय

नमस्कार मित्रमैत्रिणींनो,
सालाबादप्रमाणे गेल्या काही दिवसांत निर्माण समुहात घडलेल्या काही घडामोडी आम्ही घेऊन आलो आहोत. निर्माणचा व्याप जसजसा वाढतोय तसेच हळूहळू निर्माणी आपल्या कामाची छाप सोडत आहेत. कुठे कोणता निर्माणी महाराष्ट्रातील मुलांसाठी पाठ्यपुस्तक लिहितो तर कुठे कोणी पानी फाउंडेशनसारख्या स्पर्धेत गाव निवडून आणतो! सीमोल्लंघनच्या टीमकडे इतरही जबाबदाऱ्या असल्यामुळे सर्वच बातम्या सर्वांपर्यंत पोहचत नाहीत. सामाजिक प्रश्नांशी झुंजणाऱ्या आपल्या निर्माणी मित्रमैत्रिणींच्या कारवायांबद्दल (कामाबद्दल!) आम्हाला कळवाल का?  तुम्ही कराल मदत?
            बाकी तुमच्यासाठी ह्या अंकात भरपूर काही घेऊन आलो आहोत. तुमचा अभिप्राय वेळोवेळी कळवत राहा.


निर्माण ८.२ ब शिबीर
नुकतेच ऑगस्ट महिन्यात शोधग्राममध्ये निर्माण ८ (वैद्यकीय गट) बॅचचे दुसरे शिबीर पार पडले. ०४ ऑगस्ट ते १२ ऑगस्ट या कालावधीत वैद्यकीय शाखेतील ४५ युवक-युवतींनी ह्या शिबीरात उपस्थिती दर्शवली. आरोग्य क्षेत्रातील समस्यांबद्दल, त्यांच्या जटीलतेबद्दल कुतूहल आणि बौद्धिक समज निर्माण करणे; आरोग्य क्षेत्रात सामाजिक योगदान देण्यासाठीचे वेगवेगळे मार्ग समजून घेणे; वेगवेगळ्या रोल मॉडल्सच्या प्रवासातून सामाजिक कृती करण्याचे धाडस निर्माण करणे आणि आरोग्य क्षेत्राच्या परिघाबाहेरील सामाजिक-आर्थिक-राजकीय वास्तवाची ओळख व्हावी अशी ह्या शिबिराची ढोबळमानाने उद्दिष्टे होती.
निर्माण ८.१ शिबिराच्या शेवटी स्वतःसाठी, स्वतः बनवलेला कृती शिक्षण कार्यक्रम तसेच गेल्या ६ महिन्यांत घडलेल्या वेगवेगळ्या गोष्टी, त्यातून झालेले शिक्षण, पडलेले प्रश्न , वाचन, इ. च्या शेअरिंगने शिबिराची सुरूवात झाली. बायफ या संस्थेचे संजय पाटील यांनी देशी वाणाच्या संवर्धनाविषयी माहिती दिली. टाटा मेमोरिअल कॅन्सर हॉस्पिटलचे डॉ. पंकज चतुर्वेदींनी दवाखान्याबाहेरची डॉक्टरची भूमिका काय असावी यावर मार्गदर्शन केले. मोठमोठ्या तंबाखू कंपन्यांविरुद्ध चालू असलेल्या त्यांच्या लढ्याची माहिती दिली. डॉ. अभय बंगांनी नवजात मृत्यू रोखण्यासाठी सर्चने केलेल्या कामाबद्दल सांगितले. जगात बाजारव्यवस्थेची उत्क्रांती आणि वैद्यकीय क्षेत्रात त्याचा शिरकाव याबद्दल योगेश दादाने मार्गदर्शन केले. सुनील काकांनी अर्थव्यवस्था, बाजारीकरण आणि उपभोक्तावाद याविषयी सांगितले.
तसेच अमृतने अब्राहम मास्लोवने सांगितलेल्या माणसाच्या गरजांची उतरंड, सामाजिक क्षेत्रात काम करण्याचे विविध पर्याय, विठ्ठल साळवे आणि त्याने मिळून माहिती अधिकाराचा वापर करून केलेल्या कामाची गोष्ट असे सेशन्स घेतले. आरतीने ग्रामीण भागात मानसिक आजारांचा ताण तिला कसा दिसला, या तिच्या अनुभवाबद्दल सांगितले. दिल्ली ते गडचिरोली प्रवास करून आदिवासी भागात आरोग्य सेवा देण्याचा डॉ. चैतन्य मलिक आणि डॉ. शिल्पा खन्ना यांचेही अनुभव शिबिरार्थ्यांनी ऐकले.
एक दिवस सर्व शिबिरार्थ्यांनी गडचिरोली जिल्ह्यात वेगवेगळ्या प्राथमिक आरोग्य केंद्रांवर काम करत असलेल्या डॉ. रुपेश बनसोड, डॉ. पंकज औटे, डॉ. पूजा बोर्लेपावर, डॉ. प्रतिक सुराणा आणि डॉ. रितू दमाहे या निर्माणी डॉक्टरांना भेट दिली आणि त्यांचा अनुभव जाणून घेतला. आफ्रिकेत आलेल्या एड्स या रोगाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर आधारलेल्या फायर इन दी ब्लडही डॉक्युमेंटरी शिबिरात दाखवण्यात आली. आफ्रिकेत एड्सने लोक मरत असताना औषध कंपन्यांनी केलेल्या मनमानी कारभाराची आणि अमानवी नफेखोरीची ती कहाणी आहे. नियमितपणे शिबिरात काही छान पुस्तकांची ओळख झाली, जसे की १९८४, फ्रीडम फॉर सेल, एपिक मेझर्स, सेपियन्स, हिंद स्वराज आणि नवे मन्वंतर, आर्ट ऑफ लव्हिंग, लोकनीती, व्हॉट मनी कान्ट बाय, इत्यादी.
            आरोग्य क्षेत्रातील समस्या, माझी भूमिका, समस्या सोडवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती, आणि काही स्वप्न घेऊन शिबिरार्थी परतले. शिबिरार्थ्यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा!


NIRMAN Alumni वार्षिक ऑक्टोबर कार्यशाळा २०१८
            निर्माणच्या शिबिरातून गेलेले जे निर्माणी पूर्णवेळ सामाजिक क्षेत्रात काम करत आहेत त्यांच्यासाठी २०११ पासून दरवर्षी एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी ही कार्यशाळा २९ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर दरम्यान शोधग्राममध्ये पार पडली आणि ५० निर्माणी या कार्यशाळेला उपस्थित होते. सर्वांनी मी करत असलेल्या कामाचा प्रश्न, पद्धत, येणाऱ्या अडचणी आणि भविष्यातील वाटचालहे शेअरिंग आलेल्या समुहात केले.
            नुकताच भारत सरकारने जाहीर केलेला आदिवासी आरोग्यावरचा रिपोर्ट नायानांनी सर्वांसमोर मांडला. नायना त्या कमिटीचे अध्यक्ष असल्यामुळे हा अभ्यास करताना काय काळजी घेतली, काय अडचणी आल्या, अहवालाचे मुख्य मुद्दे काय, शिफारशी कोणत्या आणि मी माझ्या पातळीवर काय करू शकतो याविषयी मार्गदर्शन केले. तसेच डेव्हलपमेंट इकॉनोमिस्ट ए. के. शिव कुमार यांनी शिबिरात वेगवेगळी ३ सत्रे घेतली. आर्थिक विकास आणि जीडीपी याचे फसवे रूप, अमर्त्य सेन यांची मनुष्य विकासातून आर्थिक विकास ही मांडणी आणि सध्या महिलांचे समाजातील स्थान याविषयी त्यांनी सर्वांना मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या शेवटी निघण्यापूर्वी पुढच्या वर्षी पुन्हा भेटण्याची तारीख निश्चित करण्यात आली. २०१९ मध्ये १५ ते १७ नोव्हेंबर दरम्यान शोधग्राममध्ये पुन्हा भेटायचं ठरलं आहे.

निर्माण ९ ची निवड प्रक्रिया
गेल्या ३-४ महिन्यांपासून निर्माण ९ शिबीरमालिकेसाठी प्रसिद्धी आणि निवडप्रक्रिया सुरु आहे. सामाजिक प्रश्नांची जबाबदारी स्वीकारू इच्छिणाऱ्या नवीन पिढीची निवड प्रक्रिया ही नेहमीच उत्साहपूर्ण, आशादायी आणि विचार करायला लावणारी असते. त्यासोबतच निर्माण परिवारातील मित्रमैत्रिणींना भेटण्याची ती संधीदेखील असते. गेल्या काही महिन्यात निर्माण टीमने भरपूर प्रवास केला आणि अनेकांशी भेट देखील झाली. प्रसिद्धी आणि निवडप्रक्रियेत तुम्हा सर्वांची मदत नेहमीच होत असते. यावर्षी स्वप्नील अंबुरे (निर्माण ८) याने प्रसिद्धीमध्ये विशेष मदत केली. तुम्हा सर्वांचे खूप आभार.
यावर्षी निर्माण ९ साठी जवळपास ८८७ अर्ज आलेले आहेत, आतापर्यंतच्या इतिहासातील हा सगळ्यात मोठा आकडा आहे. महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यांतून अर्ज तर आहेच आहे पण राज्याबाहेरून जवळपास ८० अर्ज आले आहेत. विशेष म्हणजे एम्स दिल्ली, एम्स रायपुर, आयसर पुणे, आयसर भोपाळ, आयआयटी वाराणसी, आयआयटी चेन्नई अशा नामवंत महाविद्यालयातून अर्ज आले आहेत. (गमतीची गोष्ट!) सैराट आणि फॅंड्री चित्रपटात अभिनय केलेल्या कलाकारांनादेखील निर्माणला अर्ज करण्याचा मोह आवरता आला नाही.
निर्माण ९ ची निवडप्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेली आहे. येत्या ३१ ऑक्टोबरला निर्माणच्या वेबसाईटवर निवड झालेल्या मुलामुलींची यादी जाहीर करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment