'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Monday, 14 January 2019

‘कुमार निर्माण’ची सांगता

नुकतीच कुमार निर्माणला पाच वर्षे पूर्ण झालीत. शालेय वयीन मुलांच्यात मानवी मूल्ये रुजावीत या उद्देशाने डॉ. अभय बंग (नायना) आणि श्री. विवेक सावंत यांच्या मार्गदर्शनाने हा उपक्रम सुरु झाला होता हे तुम्हा सर्वांना ठाऊक आहेच. मुलांसोबत काम करण्याची आवड असणारे आणि वय वर्ष १८ पूर्ण असलेले निमंत्रक शोधून, त्यांना प्रशिक्षित करून ते त्यांच्या ठिकाणी १० ते १२ शालेयवयीन मुला-मुलींचा एक संघ तयार करत. हा संघ वर्षभर कुमार निर्माण अंतर्गत कार्यरत असे.
कुमार निर्माण अंतर्गत पाचव्या वर्षात महाराष्ट्रभरात १०० निमंत्रक, १०७ संघ आणि त्यात १२८० मुले-मुली काम करत होते. आपल्या परिसरातील समस्या शोधून त्यावर काही उपाययोजना करणे असे या संघांच्या कृतिकार्यक्रमांचे स्वरूप असे. यात मुलांनी पक्ष्यांना पाणी ठेवण्यापासून ते गाव तंबाखूमुक्त करणे असे विविध कृतिकार्यक्रम केले. यातून त्यांच्यात न्याय, अनुकंपा, वैज्ञानिक दृष्टीकोन रुजणे अपेक्षित होते आणि सोबतच मुलांच्या ‘स्व’ चा विकास होणेही अपेक्षित होते.
या पाच वर्षांत कुमार निर्माण वेगवेगळ्या प्रकारे बहरलं आणि दरवर्षी एक-एक घर पुढे जात राहिलं. कुमार निर्माणला पाच वर्षे पूर्ण झालीत तर ठरवलेल्या उद्देशांच्या दिशेचा आपला प्रवास कसा सुरु आहे म्हणजे मुलांच्यात किती बदल घडतोय याचं मूल्यमापन करावं असं यावर्षी ठरलं. त्यानुसार कुमार निर्माणच्या टीमने (अमृत, प्रणाली आणि शैलेश) उपक्रमाचं मूल्यमापन मागील दोन महिन्यात केलं.
या अभ्यासात असं आढळलं की कुमार निर्माणमधील मुलं-मुली आणि कुमार निर्माणमध्ये नसलेले मुलं-मुली यांच्यात कुमार निर्माणच्या उद्दिष्टांच्या अनुषंगाने विशेष फरक पडलेला दिसत नाही आणि जो काही थोडा-थोडका बदल होतोय तो आपण करत असलेल्या प्रयत्नांच्या दृष्टीने पुरेसा नाहीये. अर्थात, या अभ्यासाच्या सर्व मर्यादांचं भान आपण ठेवलंच पाहिजे.
हा अभ्यास नायना, सावंत सर व इतर टीमसमोर मांडल्यानंतर असा निष्कर्ष निघाला की कुमार निर्माण सुरु करताना जे काही गृहीतक मनात ठेवून आपण सुरु केलं होतं ते गृहीतक पाच वर्षांनतर साध्य होताना दिसत नाहीये. म्हणजेच आपल्याला अशी कुठली सामाजिक बदलाची पद्धत गवसली नाहीये की ज्यातून ठरवलेली उद्दिष्ट साध्य होतील. त्यामुळे चर्चेअंती असं ठरवण्यात आलं की पाच वर्षांत आपल्या झालेल्या शिक्षणासोबत या वर्षापासून कुमार निर्माण उपक्रम थांबवावा.
या पाच वर्षांत बऱ्याच निर्माणींची मदत कुमार निर्माणसाठी खुप मोलाची ठरली. कधी निमंत्रकाच्या स्वरुपात, कधी निमंत्रक कार्यशाळा, कधी मुलांची कार्यशाळा तर कधी गटांच्या भेटी अशा बऱ्याच वेळी तुम्ही आमच्या सोबत होतात. वर म्हटल्याप्रमाणे तुमचाही आजपर्यंत कुमार निर्माण उपक्रमाशी येन-केन प्रकारे संबंध आलेला आहेच. त्यामुळे कुमार निर्माण उपक्रम या वर्षापासून थांबवण्यात येत आहे हा निर्णय तुम्हाला कळवावा म्हणून हा खटाटोप!
कुमार निर्माणशी कामासोबतच भावनिक जिव्हाळा असल्याने थोडा काळ हे सर्व जड जाईल परंतु गेल्या तीन वर्षांच्या कामातून प्रचंड शिक्षण झालं आहे आणि ही तीन वर्षं मनापसून काम केल्याचं समाधानही आम्हा सर्वांना नक्कीच आहे.
उपक्रम बंद होत असला तरी कुमार निर्माणच्या निमित्ताने जोडल्या गेलेले आपल्यातले बंध असेच कायम ठेवूया या आशेसह!
तुमचे,
प्रणाली व शैलेश
कुमार निर्माण टीम


No comments:

Post a comment