'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Monday, 14 January 2019

सामाजिक संस्थांची आर्थिक घडी बसवताना...

सामाजिक संस्था कामाच्या बाबतीत कशाही असल्या तरी आर्थिक व्यवहार आणि नियोजनामध्ये मागे पडतात असा अनुभव आहे. त्यात सर्वात महत्त्वाचे कारण आहे ते म्हणजे ‘आर्थिक निरक्षरता’ (Financial Illiteracy)! वेदवती लेले, गीता लेले आणि सारिका कुरनुरकर या निर्माणी मैत्रिणींनी नुकतेच झगडिया, गुजरात येथील ‘सेवा रुरल’ या संस्थेच्या अकौंटिंगच्या आघाडीवर मदत करण्यास सुरुवात केली. त्यांच्या कामाचा अनुभव कसा राहिला, काय काय अडचणी गेल्या ह्याबद्दल वेदवती सांगत आहे...

“नमस्कार, मी वेदवती लेले (निर्माण ५). शिक्षणाने आणि व्यवसायाने मी Chartered Accountant आहे. गेली अनेक वर्षे खेळघर, कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत, नवनिर्मिती अशा सामजिक प्रश्नावर काम करणाऱ्या संस्थांना त्यांची अकौंटिंग सिस्टीम सुधारण्यासाठी मदत करत आहे. तसेच ‘CAQ?’ सारखा आर्थिक साक्षरता आणि जनजागृतीचा उपक्रमही राबवला आहे.
जून २०१८ मध्ये काही कामानिमित्त गुजरातमध्ये गेले असताना ‘सेवा रूरल’ ह्या संस्थेला भेट दिली. मी, गीता लेले आणि सारिका कुरनुरकर अशा तीन निर्माणी, CA, मुली बघून त्यांना विशेष आनंद झाला. नुकतेच त्यांचे अकौंटिंग सॉफ्टवेअर बदल्यामुळे त्यांना बरेच प्रॉब्लेम येत होते. भरपूर गोष्टी manually करायची सवय असलेल्या टीमला खूपच पातळीवर मदत करावी लागेल ह्याचा अंदाज आला. आत्तापर्यंत एवढ्या मोठ्या संस्थेसोबत कधी काम केले नव्हते म्हणून आम्ही तिघींनी ही संधी आव्हान म्हणून स्वीकारली.
आतापर्यंत आमच्या १० दिवसाच्या २ भेटी झाल्या आहेत. त्यांचे वेगवेगळे प्रश्न समजून घेणे आणि प्राथमिकता ठरवून काम करणे असा आमचा सध्याचा अजेंडा आहे. आम्ही केलेल्या आणि करत असलेल्या काही ठळक गोष्टी:
१. TDS कापणे आणि भरणे ह्या प्रक्रीयेमध्ये हिशोब करणे, चलान बनवणे, टॅक्स भरणे हे सगळं manually केलं जातं. अनेक विभाग असल्यामुळे काही लोकांचे TDS वेळेवर करायचे राहून जातात. हे सगळे प्रश्न सॉफ्टवेअरमुळे सुटू शकतात. आम्ही त्याची घडी नीट बसवून देत आहोत.
२. निधी देणाऱ्या वेगवेगळ्या संस्थांना लागणारे आर्थिक रिपोर्ट्स सध्या manually होत आहेत. ते सिस्टीममधून आणि वेळेच्या आधी होतील ह्यासाठी आम्ही मदत करत आहोत.
३. ऑडीट रिपोर्ट पूर्ण झाल्यावर तो सिस्टीमशी जुळवून देण्यात मदत केली.
४. २०१७-१८ चे ऑडीट पूर्ण झाल्यानंतर आम्ही त्यांच्याच ऑडीट रिपोर्टचे एक ट्रेनिंग ‘सेवा रूरल’चे ट्रस्टीज, विभागप्रमुख आणि सक्रीय संस्थापक सभासद ह्यांच्यासाठी घेतले. व्यवस्थापनाची जबाबदारी आणि ऑडीटर्सची जबादारी, संपत्ती, कर्ज, उत्पन्न, खर्च, कॉर्पस निधी, फिरता निधी, earmark funds, bank reconciliation, कर्जदार अशा अनेक न समजणाऱ्या संज्ञा, कुठल्या गोष्टी असायला हव्यात आणि कुठल्या गोष्टी नसायला हव्यात, सध्या संस्थेला कशाला महत्त्व देण्याची गरज आहे अशा अनेक गोष्टीवर चर्चा झाल्या.
५. Bank reconciliation, stock maintenance, debtor and creditor reconciliation, internal budgeting, reporting अशा सर्व गोष्टी पूर्णपणे सिस्टीममधून व्हाव्यात ह्यासाठी प्रयत्न करत आहोत.

ह्या सगळ्यामध्ये आलेली आव्हाने आणि काही प्रकर्षाने जाणवलेल्या गोष्टी:
१. टीमसोबत काम करताना टीमचा तुमच्यावर विश्वास बसणे खूप जरुरीचे आहे. त्यासाठी सुरवातीला त्यांचे प्रश्न आणि ते काय करू शकतात हे समजून घेणे गरजेचे आहे.
२. अनेक प्रश्नांमधून प्राथमिकता ठरवणे, दैनंदिन कामामध्ये येणारे प्रश्न लवकरात लवकर सोडवणे आणि बाकीच्या कामचा त्यावर परिणाम न होऊ देणे हे खूप महत्वाचे आहे.
३. ऑडीटर, व्यवस्थापन आणि अकौंटिंग टीम ह्यांच्यामध्ये संवाद वाढवणे गरजेचे आहे.
४. समाजिक संस्था बऱ्याचवेळा अडचण आल्यावर किंवा निधी देणाऱ्या संस्थांनी सांगितल्यावर अकौंटिंग सिस्टीम व्यवस्थित करण्याच्या मागे लागतात. त्यामुळे त्यांना अनेक अडचणी तर येतातच पण अनेक आर्थिक भुर्दंडही बसतो. ह्यासाठी अकौंटिंग सिस्टीमचे सतत मूल्यमापन होणे, आलेले प्रश्न प्राथमिकतेने सोडवणे, अकौंटिंग टीमला सतत प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.
‘सेवा रूरल’ गेले ४० वर्ष सार्वजनिक आरोग्यामध्ये ग्रामीण आणि आदिवासी भागात काम करत आहे. शेवटच्या कर्मचाऱ्यापर्यंत पोचलेली संस्थेच्या कामाची आस्था, गांधीवाद आणि गुजराती व्यावसायिक डोकं ह्यांचं धडाकेबाज मिश्रण, पारदर्शकता (त्यांच्या वेबसाईटवर दरवर्षी त्यांची balance sheet अपलोड होते), ज्या लोकांसाठी काम करतात त्यांच्या प्रत्येक अडचणींचा केलेला विचार अशा अनेक गोष्टी आम्हाला खूप भावल्या. आमचे काम आव्हानात्मक आहेच पण अशा गोष्टी आम्हाला खूप बळ देतात.”

वेदवती लेले, निर्माण ५


No comments:

Post a comment