'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Monday, 14 January 2019

Vowels of the People Association

प्रफुल्ल शशिकांत (निर्माण ५), आकाश भोर (निर्माण ५), ऋतुजा जेवे (निर्माण ७) हे आपले निर्माणी मित्रमैत्रिणी वंचित समाजातील संस्था व तरुण यांच्यासोबत काम करण्यासाठी ‘व्होव्हेल्स ऑफ द पिपल असोसिअशन’ या संस्थेची सुरुवात केली. त्यांच्या संस्थेबद्दल आणि कामाबद्दल सांगतोय आकाश...

“प्रिय मित्रमैत्रिणींनो,
काही महिन्यापूर्वी आम्ही आम्हाला पुढे काय काम करायचे आहे, हे ठरवत होतो. आतापर्यंत केलेल्या कामाचा अनुभव, आमची मूल्ये, क्षमता, स्वप्ने, आणि मित्र व मार्गदर्शक व्यक्तींसोबत केलेल्या चर्चेतून आम्हाला हे ठरवण्यात मदत झाली. आम्ही “Vowels of the People Association” या नावाने सेक्शन ८ अंतर्गत ना-नफा तत्वावर चालणाऱ्या कंपनीची नोंदणी केली आहे.

पार्श्वभूमी
महाराष्ट्रातील सामाजिक व राजकीयदृष्ट्या शोषित व वंचित समाजासाठी ग्रामीण व निमशहरी भागात अनेक संस्था, संघटना आणि कार्यकर्ते स्वयंप्रेरणेने काम करत आहेत. त्यांना अधिक परिणामकारक सामाजिक बदलासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्ये, आर्थिक निधी व इतर संसाधनांची कमतरता जाणवते. या प्रकारची संसाधने विशेषतः शहरी भागात किंवा काही विशिष्ट सामाजिक वर्गाकडे एकवटलेली दिसतात. किमान महत्वाच्या विविध बाबी त्यांच्यापर्यंत नेण्याची गरज आहे. त्याच बरोबर या भागातील सामान्य तरुणांचे विविध प्रश्न व त्यांचे भावविश्व याबाबत त्यांच्याशी संवाद करण्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असावे असे वाटते. थोडक्यात, विकासाची प्रक्रिया अधिक विकेंद्रित, मूल्याधिष्ठित आणि लोकशाही पद्धतीने होण्याकरिता मागास भागातील आणि वर्गातील तरुण व संस्थांना अधिक सजग व सक्षम करणे याला आम्ही मिशन म्हणून पाहतो आहोत.
कामाचे स्वरूप
आमचे उद्दिष्ट्य साध्य करण्यासाठी आम्ही तीन प्रकारे काम करत आहोत.
१.     संस्थात्मक क्षमता विकास
संस्था/ संघटनांचे प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि संस्थात्मक व्यवस्थापनात मदत करणे
२.     युवक-युवती विकास
युवकांसाठी प्रशिक्षण शिबिरे आणि सत्रांद्वारे त्यांची स्व-ओळख, स्वप्ने, ध्येय याबाबत संवाद करणे आणि त्यासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्ये देणे.
३.     शिक्षकांचे प्रशिक्षण
शिकणे-शिकविणे हे आनंददायी होण्यासाठी शिक्षकांचा कौशल्य विकास
आमचे काम सुरु झाले आहे!
मागील सहा महिन्यात आम्ही खालील संस्थांसाठी काम करू शकलो/ कसे काम करता येईल याबाबत चर्चा करत आहोत-

१.     सोनदरा गुरुकुलम, बीड
२.     स्नेहालय, अहमदनगर
३.     ज्ञानसंपदा, अहमदनगर
४.     एम.एल.ढवळे मेमोरिअल ट्रस्ट, भोपोली
५.     स्नेहदीप जनकल्याण फाउंडेशन, पुणे
६.     पानी फाउंडेशन
७.     स्वच्छ, पुणे
८.     वर्धिष्णू, जळगाव
९.     योगेश्वरी शिक्षण संस्था, बीड

या काळात आम्ही एकूण २१ प्रशिक्षण कार्यशाळा घेऊन ह्या संस्थांना मदत केली.
आमच्या कामाबद्दल तुम्ही अधिक येथे वाचू शकता: http://vopa.in/work-reports/
सध्या या कामात पूर्णवेळ आम्ही तिघे असलो तरी, निर्माणचे अनेक मित्रमैत्रिणी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे या कामाशी जोडले गेले आहेत. राही, सायली, सनत, सुनिलकाका, केदार, वेदवती, सारिका, निखिल, रविकांत ही त्यातील मुख्य नावे. यांच्या मदतीशिवाय हे धाडसाचे पाउल उचलणे खरच कठीण होते.
सध्या संस्थेचे कार्यालय कोथरूड, पुणे येथे आहे. आम्हाला भेट द्यायला नक्की या. जरी कार्यालय पुण्यात असले तरी कामानिमित्त आम्ही सध्या अहमदनगर, बीड येथेच खुपदा असतो. पुढील वाटचाल हळूहळू स्पष्ट होईल.
या कामाचे आर्थिक गणित कसे असेल याविषयी पूर्ण स्पष्टता अजून आलेली नाही. आर्थिक मदतीच्या शोधात आहोतच. मात्र सुरवातीचे एक-दोन वर्ष आपल्या मित्र परिवाराकडून मिळणाऱ्या देणग्यांवर व संस्थांकडून मिळणारे काही सेवामुल्य यांवरच अवलंबून असू असे दिसते. या काळात आम्ही केलेल्या प्रत्यक्ष कामातूनच संस्थेची ओळख निर्माण होईल व त्याबळावर पुढील आर्थिक घडी बसेल असा विश्वास वाटतो.

मदतीसाठी आवाहन
कोणतेही काम सुरवातीच्या काळात उभे राहण्यासाठी खूप मदतीची गरज असते. तुम्ही वेळ, पैसा, वस्तू, संसाधने, संपर्क इ. अनेक प्रकारे सहकार्य करून या कामात हातभार लावू शकता.
या कामात पुढील एक वर्षासाठी रु. ५०० प्रती महिना किंवा अधिक रकमेची देणगी देऊन आपणही हातभार लावावा, अशी विनंती.

स्त्रोत: आकाश भोर, निर्माण ५
                                                                                                                    akashdbhor@gmail.com

No comments:

Post a comment