'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 9 May 2013

निखिल जोशी, वेंकटेश अय्यर यांच्या कोल्हापूर, सिंधुदुर्ग, लातूर येथे अभ्यासभेटी

नुकतेच वेंकटेश अय्यर व मी (निखिल जोशी, निर्माण ४) कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली व लातूर येथील सामाजिक समस्यांवर काम करणाऱ्या संस्था/व्यक्ती व त्या त्या भागातील निर्माणींना भेट दिली.
कोल्हापूर जिल्ह्यातल्या अभयारण्यात सुरू असलेल्या बेकायदेशीर बॉक्साईट खाणींविरुद्ध शास्त्रीय अभ्यास आणि जनजागृतीच्या आधारे कायदेशीर लढाई देऊन त्या खाणी बंद करायला लावणाऱ्या वनस्पतीतज्ञ डॉ. बाचूळकरांनी त्यांच्या लढ्याबद्दल आम्हाला सविस्तर माहिती दिली. बाचूळकर सर व त्यांच्या काही सहकाऱ्यांकडून त्यांच्या निसर्गमित्रया संस्थेचे कार्य समजून घेता आले. निसर्गमित्र कोल्हापूरमधील शाळकरी मुलांचे पर्यावरण शिक्षण व शहरात पर्यावरणपूरक
उपक्रम राबवण्याचे काम करत आहे. आम्ही कोल्हापुरात अपंगांचे वसतीगृह चालवणाऱ्या Helpers of the Handicapped या संस्थेला भेट देऊन त्यांचे कार्य समजून घेतले. अपंग मुलांना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने (रोजच्या कामांत व आर्थिकदृष्ट्या) प्रशिक्षण, त्यांचे आरोग्य व सर्वसामान्य मुलांच्या शाळेतच त्यांचे शिक्षण या पैलूंवर ही संस्था काम करत आहे. (अधिक माहितीसाठी: http://www.hohk.org.in/) कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात लॉरी बेकर यांच्यापासून प्रेरणा घेवून काम करणारे वास्तुविशारद धनंजय वैद्य यांची आम्ही भेट घेतली. गावापासून १० किमी परिसरात मिळणाऱ्या साहित्याचा वापर करून घरे बांधणे व सेंद्रीय शेती यांच्या माध्यमातून आजच्या विकासाला निसर्गगामी पर्याय शोधण्याचा प्रयत्न ते करत आहेत.
त्यानंतर पश्चिम घाट उतरून सिंधुदुर्ग जिल्ह्या-तील झाराप येथे (ता. कुडाळ) ग्रामविकासाचे काम करणाऱ्या डॉ. प्रसाद देवधर यांनी सुरू केलेल्या भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानला आम्ही भेट दिली. बेसलाईन सर्व्हेद्वारे गावातील गरजा समजून घेणे, काही काळ काही प्रमाणात अर्थसहाय्य करून विकासाची कामे करणे व गाव स्वयंपूर्ण झाल्यानंतर ही कामे गावाच्याच हाती सुपूर्द करणे ही त्यांच्या कामाची पद्धत आहे. Biogas च्या प्रसारात त्यांचे मोठे योगदान असून ४० खेड्यांमध्ये ३००० biogas त्यांनी बसवलेले आहेत. (http://www.bhagirathgram.org/) यानंतर आम्ही सुहास शिगम (निर्माण ४) सोबत जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाविरुद्ध लढा देणाऱ्या प्रवीण गवाणकरांना भेटून आंदोलनकर्त्यांची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केला.
लातूरजवळील सेवालयया संस्थेला भेट देण्याची आम्हाला संधी मिळाली. सेवालय HIV बाधित मुलांसाठी वसतीगृह चालवत असून त्यांचे आरोग्य व शिक्षण या पैलूंवर मुख्यतः काम करत आहे. आरोग्याच्या नाजूक स्थितीसोबातच मुलांना सर्वसामान्य मुलांच्या शाळेत शिक्षण देताना गावकऱ्यांकडून अस्वीकार व हेटाळणी अशा गंभीर अडचणी असतानाही ही संस्था खंबीरपणे आपले काम करत आहे. (http://sevalay.weebly.com/) यानंतर दुष्काळ व हवामानबदल या विषयांवर अभ्यास असणारे लातूरचे पत्रकार श्री. अतुल देऊळगावकर यांची आम्ही भेट घेतली. आहे.
या अभ्यासदौऱ्यात कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी व लातूरचे निर्माणी व त्यांच्या स्थानिक गटासोबतही आमची भेट झाली. कोल्हापुरात ओसंडून वाहणाऱ्या टाक्या तर लातूरला सामूहिक बोअरवेल समोर पाण्याची वाट पाहत कळशांची रांग, कोल्हापुरात सर्वत्र सिंचनाच्या सहाय्याने घेतला जाणारा ऊस तर लातूरला दूरवरची ओसाड माळराने असा विरोधाभास यावेळी ठळकपणे दिसून आला.
निखिल जोशी

No comments:

Post a Comment