'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 13 June 2013

संतोष व जयश्री यांच्या ग्रामविकासाच्या कामांना वेग

मन्याळी येथे घरपोच धान्य योजना पुन्हा सुरु


मन्याळी येथे गेल्या आठ महिन्यांपासून बंद पडलेली घरपोच धान्य योजना पुन्हा सुरू करण्यात संतोष गवळे व जयश्री कलंत्री (गवळे) यांना यश आले आहे. गेल्या अडीच वर्षांपासून घरपोच धान्य योजना मन्याळी येथे सुरु केली होती. पण मध्यंतरी संतोषने यशदा पुणे येथे नौकरी पत्करल्याने दरम्यानच्या काळात स्वस्त धान्य दुकानदाराचा स्वार्थ व हेकेखोरपणामुळे ही योजना बंद पडली व पुन्हा एकदा धान्याचा काळाबाजार सुरु झाल्याने नागरिकांची गैरसोय होऊ लागली. संतोषने यशदातील नोकरी सोडून गावी परतल्यानंतर घरपोच धान्य योजना सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. गावकऱ्यांनी तीन महिन्याचे रूपये जमा केले. हे स्वस्त धान्य दुकानदारास कळल्यावर त्याने मुद्दाम रजेचा अर्ज केला. स्वस्त धान्य दुकानदार संघटना दुकानदाराकडून उभी राहिली. इतर कुठल्याच स्वस्त धान्य दुकानदारास मन्याळी मध्ये धान्य आणू द्यायचे नाही असे ठरवले. यासारख्या अनेक अडचणींवर मात करून दोन महिन्याच्या प्रयत्नानंतर सदर योजना सुरू करण्यात संतोषला यश आले. यासाठी सचिन शेजाळ (तहसीलदार, उमरखेड) यांचे विशेष सहकार्य लाभले. सदर योजने अंतर्गत गावात एकाच वेळी १८७ क्विंटल गहू व तांदूळ मन्याळीत आणले गेले. तहसीलदार शेजाळ यांच्या हस्ते या धान्याचे वाटप करण्यात आले.  

पशुसंवर्धन विषयक तीन दिवसीय कार्य़शाळा संपन्न
मन्याळी येथे पशुधन विकास अधिकारी कार्यालय यांचेकडून शेतीपूरक व्यवसायासाठी शेती कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन दि. २८ ते ३० मे रोजी करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन गट विकास अधिकारी ढोले यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी नाविन्यपूर्ण शेती करणारे शेतकरी व पशुधन विकास अधिकारी व तज्ञांचे मार्गदर्शन लाभले. तर या कार्यशाळेचा समारोप उमरखेडचे तहसीलदार शेजाळ यांच्या हस्ते करण्यात आला.

अखेर पिंपळगावाची तहान भागली...

            गेल्या चार महिन्यापासून जयश्री कलंत्री गवळे ही पिंपळगाव येथे ग्रामविकासाची कामे करते आहे. या गावात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई. ग्रामपंचायतने टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी पंचायत समितीकडे केली. गलथान कारभारामुळे टँकर गावात आले नाही. पाणी प्रश्न कायमचा सोडवण्याच्या दृष्टीने नदीवरून पाणी लिफ्ट करून आणण्यासाठी येथे जयश्रीचे प्रयत्न चालू आहेत. त्यासाठी लोकवर्गणीतून ५० हजार लोकांनी जमा केले. परंतु ही योजना दीर्घकालीन असल्याने याच वर्षी लोकांना पाणी मिळेल याची शक्यता कमी दिसत होती. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून शाळेत असलेल्या बोअरवेलचे पाणी घेण्याचे मीटिंगमध्ये ठरविण्यात आले. परंतु गेल्या वर्षी गावकऱ्यांनी उन्हाळ्यात याच बोअरवेलचे पाणी वापरल्याने वीजबिल २० हजार रुपये आले होते. ग्रामपंचायतकडे पैसे नसल्याने बिल थकित राहिले व त्यामुळे वीज कनेक्शन तोडण्यात आले होते. यावर उपाय म्हणून लोकवर्गणी काढण्यात आली व या गावाला अखेर पाणी मिळण्यास सुरवात झाली. यासाठी ठाणेदार देवकते यांचे सहकार्य लाभले.

1 comment: