'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 11 July 2013

सहाव्या La Via Campesina आंतरराष्ट्रीय परिषदेत तन्मय जोशीचे दक्षिण आशियाकडून प्रतिनिधित्व

९-१३ जून दरम्यान जकार्ता, इंडोनेशिया इथे झालेल्या ६व्या La Via Campesina आंतरराष्ट्रीय परिषदेत व त्यानिमित्ताने भरणाऱ्या युवा परिषदेत तन्मय जोशीने (निर्माण ३) दक्षिण आशियाचे प्रतिनिधित्व केले. La Via Campesina नक्की आहे तरी काय?
जागतिक व्यापार संघटनेची (World Trade Orga-nization) स्थापना व त्यायोगे शेतमालाची बाजारपेठ खुली होऊ घातली असताना १९९३ मध्ये La Via Campesina (The Peasants’ way) या जागतिक शेतकरी चळवळीला बेल्जिअममध्ये सुरुवात झाली. बाजारपेठ खुली झाल्यामुळे श्रीमंत देशात भरमसाठ अनुदान घेऊन बनलेल्या शेतमालासोबत स्पर्धा करणे कोणत्याही अनुदानाशिवाय उत्पादन घेणाऱ्या अविकसित व विकसनशील देशातील शेतकऱ्यांना कठीण होऊन गेले. याविरुद्ध स्थानिक पातळीवर अनेक ठिकाणी लढा दिला जात असला तरी शक्तिशाली संघटनांशी लढण्यासाठी या विखुरलेल्या लढ्यांचे संघटन होणे आवश्यक होते. याच हेतूने La Via Campesina ची स्थापना झाली.
आज La Via Campesina सोबत ८० देशांतील १५० संघटना जोडल्या गेल्या आहेत. त्यात भारतातील ५ संघटनांचाही समावेश होतो. निर्माणचे मार्गदर्शक श्री. विजय जावंधियाही या चळवळीसोबत जोडलेले आहेत. दर ४ वर्षांनी या साऱ्या सदस्य संघटनांची परिषद भरवली जाते. या संघटनांचे काम जाणून घेणे, नवीन संघटनांना सहभागी करून घेणे तसेच पुढील दिशा ठरवणे हे या परिषदेचे उद्दिष्ट असते. कोणताही प्रश्न सुटा पाहता येत नाही, तो अनेक प्रश्नांसोबत जोडलेला असतो. त्यामुळे या परिषदेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांसोबत शेतमजुरांचे प्रश्न, जनुकीय परिववर्तीत बियाण्यांचा प्रश्न, भूमी अधिग्रहणाचा प्रश्न असा समग्र विचार होतो. तसेच केवळ सकल उत्पन्नाच्या (GDP) पलीकडे शाश्वत विकासाचे पर्यायी मॉडेल कसे असेल यावरही विचार होतो.
La Via Campesina बदल अधिक माहितीसाठी: http://viacampesina.org/en/ 

स्त्रोत- तन्मय जोशी, tanmay_sj@yahoo.com

3 comments:

 1. तन्मय, प्रथम तुझे अभिनंदन!!
  La Via Campesina सारखी शेतकर्‍य़ांसाठी जागतीक पातळीवर चळवळ आहे बघुन आनंद झाला. मला हे विशेष वाटल की एका बाजूला विकसित देशांची पकड असणार्‍या बाजाराच्या स्पर्धे विरूद्ध काम करताना ते शाश्वत शेतीचा देखील विचार करत आहेत.एकूणच प्रश्न खूपच अवघड आणि व्यापक आहे.

  ReplyDelete
 2. अभिनंदन तन्मय! मी एक हावरट पत्रकार (?) असल्यामुळे मला यात एक छान स्टोरी दिसत आहे.यातील तुझ्या सहभागाविषयी अधिक जाणून घ्यायला आवडेल

  ReplyDelete
 3. अभिनंदन तन्मय! ह्या चळवळीबद्दल तुझ्यामुळेच माहिती होते आहे. परिषदेत तू काय पाहिलंस, काय शिकलास, लोकं काय-काय करत आहेत. आणि तुझा एकूण अनुभव कसा होता ह्या बद्दल एखादा लेख लिहिलास सीमोलंघन मध्ये तर खूप छान होईल!

  ReplyDelete