'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday, 24 December 2013

ज्ञान – सेतू

चीम्पूच्या शाळेत स्ट्रॉ पासून फव्वारा बनवायला शिकवताना कार्यकर्ते
खेळण्याच्या माध्यमातून centrifugal force शिकताना मुले
ज्ञान प्रबोधिनी, पुणे यांच्या Educational Activity and Research Center (EARC) या विभागाने ‘ज्ञान सेतू' हा उपक्रम सुरु केला आहे. सध्या याच विभागात कार्यरत असल्याने मला या उपक्रमाचा भाग बनायची संधी मिळाली. ज्ञान-सेतू या उपक्रमाचा उद्देश त्याच्या नावावरून स्पष्ट व्हायला मदत होते. भारतातील चार विकासाच्या दृष्टीने मागास  (Developmentally challenged) राज्यांशी (जम्मू-काश्मीर, छत्तीसगड, अरुणाचल प्रदेश व आसाम) विज्ञानातील मूलभूत तत्त्वांच्या सहाय्याने पूल विकसित करण्याचा प्रयत्न केला जातो. प्रामुख्याने ५वी ते ९वी वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी  टाकाऊ कचऱ्यापासून विविध खेळणी किंवा मॉडेल्स बनवणे व त्यांच्या सहाय्याने वैज्ञानिक तत्त्वे शिकणे/शिकवणे- असे या उपक्रमाचे स्वरूप असते. यासाठी लागणारे प्रशिक्षण व नियोजन ज्ञान प्रबोधिनीच्या विविध कार्यशाळांमधून होते. त्यामुळे या क्षेत्रात नवीन असलेले माझ्यासारखे तरुण देखील आत्मविश्वासाने सहभागी होतात.
या उपक्रमांतर्गत पंधरा दिवसांसाठी (१६ नोहेंबर ते १ डिसेंबर) आम्ही चार जणांच्या गटात अरुणाचल प्रदेशमध्ये गेलो होतो. तिथे आम्ही इटानगर भागातील एकूण आठ शाळांमध्ये गेलो. पूर्वेकडील हिमालयाच्या उंच उंच पर्वत रांगांच्या कुशीत, हिरव्यागार शालूत बांबूची घरे आणि मानवाने तयार केलेली दुनिया. सूर्य शक्य तितक्या लवकर आपली पहाट करतो व संध्याकाळी इतक्या लवकर जातो की संध्याकाळी ५ वाजताच आपल्याला सात वाजल्या सारखे भासते. तिथे कडाक्याच्या थंडीमध्ये सेतू बंधनाचे काम सुरु होते. बाहेर आणि आत. वर वर हा उपक्रम ज्या प्रमाणे समाजातील दोन घटकांमध्ये bridge बांधण्याचे काम करतो. त्याच प्रमाणे आपल्या आत हृदयात देखील एक सेतू बांधला जातो. या उपक्रमातून मला खूप निखळ आनंद मिळाला, प्रवासात कोलकत्ता, गुवाहाटी, इटानगर भागात पर्यटन झाले पण या पेक्षा जास्त पटींनी मला शिकायला शिकायला मिळाले. काय शिकायला याचे थोडक्यात आढावा घेतो. अर्थात हे मी त्रोटक निरीक्षणावर आधारीत लिहित आहे. यात काही माझे मत देखील आहेत.  
·       विद्यार्थ्यांना खेळण्यातून आणि दैनंदिन जीवनातील वैज्ञानिक तत्व दाखवताना मी माझ्या दैनंदिन व्यवहाराकडे अधिक सजगतेने पाहू लागलो. विज्ञान समजावून घेवू लागलो.
·       विद्यार्थी शाळेमध्ये फक्त स्वत: येत नाहीत तर त्यांच्याबरोबर शाळेबाहेरचा आख्खा समाज शाळेत येत असतो. म्हणून वर्गात विद्यार्थांशी संवाद करताना विविध सामजिक आयामांना देखील विचारात घ्यावे लागते.
o   उदा. अरुणाचल हा जवळपास २६ आदिवासी जमातींचे राज्य आहे. एकूणच आदिवासी वृत्ती ‘आजच्या जीवनासंबंधी आम्ही समाधानी’-- त्यामुळे उद्याची चिंता नाही. आणि म्हणूनच शिक्षण, त्याद्वारे विविध व्यवसाय व त्यातून विकास असे काही समीकरण नाही (जे सामान्यतः आपण ठेवतो). त्या मुळे ९वी-१०वी शिकल्यानंतर पुढे असे काही विशेष नसतेच. म्हणून तेथील तरुणांना शिक्षणाची गरज तीव्रतेने भासत नाही. याविरुद्ध विशेष राज्याचा दर्जा मिळाल्यामुळे भारत सरकारकडून विविध मार्गांनी प्रचंड पैसा येतो. याचा विनियोग करण्यासाठी तरुणांकडे – मोबाईल, चारचाकी व दुचाकी गाड्या, फॅशन व व्यसन – हेच मार्ग उपलब्ध असतात. यासाठी मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन हे TV वरील जाहिरातींकडून मिळत असते. ही सगळी पार्श्वभूमी घेऊन विद्यार्थी वर्गात बसलेला असतो. मग त्याला शाळा जे काही शिकवते हे परके तर वाटतेच, पण आवडत देखील नसते.
o   बऱ्याच शाळांमध्ये वरच्या वर्गात (८वीच्या पुढे) मुलांची संख्या कमी दिसली. पण वर्गात मुलींची संख्या मुलांच्या दुप्पट असायची. कारण तिथे मुळातच मुलींची संख्या खूप जास्त आहे असे नाही तर मुलांना संयमात ठेवणे हे सर्वात महाकठीण काम आहे असे शिक्षकांना वाटते. बऱ्याचशा शाळांनी वरील वर्ग फक्त मुलींसाठी-- असे ठरवले आहे.
·       तंत्रज्ञान बदलास कारणीभूत ठरु शकते.
o   अरुणाचल मधील संस्कृती जोपासली जावी म्हणून तिथे Inner line permit काढल्याशिवाय प्रवेश करण्यास बंदी आहे. पण एवढी कडक सुरक्षा असताना देखील तिथल्या लोकांच्या राहणीमानावर जाहिरातींचा व पाश्चात्य संस्कृतीचा खूप पगडा आहे. यासाठी इतर कारणे असू शकतीलच पण TV हे मोठे कारण दिसते.
·       अनेक लोक स्वयं-सेवी संस्थांच्या माध्यमाने व व्यक्तिगत पातळीवर देखील काम करत आहेत. जसे रामकृष्ण मिशन, विवेकानंद केंद्र, सेवा भारती संस्था इत्यादी. तिथे एक गृहस्थ भेटले पी. आर. लालकुमार. PWD मध्ये काम करणारे सरकारी कर्मचारी. मूळचे केरळमधील. पण तिथे दुर्गम गावात, सीमारेषेवरील एका गावात शेती व ग्रामविकासाचे काम करत आहेत. त्यांनी तिथे असणारा भष्ट्राचार, Insurgency, लोकांची समज, संस्कृती इत्यादी विषयांसंबंधीत त्यांचे अनुभव शेअर केले.
·       चीन देशाची सीमा लागून असल्याने भारताला त्या भागातील विकासासंबंधी जास्त महत्व देणे क्रमप्राप्त आहे. सध्या तेथील अनेक तरुणांना चीनमधील झगमगाटाचे आकर्षण आहे. विवेक पोंक्षे सर (ज्ञान सेतू उपक्रमाचे व EARC विभागाचे प्रमुख) म्हणतात, “Westernisation झाले  म्हणजे modernisation झाले असे  नाही, हे लक्षात घ्यायला पाहिजे” हे खरे वाटते. राहणीमान बदलत आहे. पण विचाराने, संस्कृतीने पुढे जाणेदेखील गरजेचे आहे. सध्या शेती, उद्योगधंदे, व्यापार इत्यादी एकूणच कुठलाही व्यवसाय करण्यासाठी तिथले वातावरण अनुकूल नाही. लोकांच्या हाताला आणि डोक्याला काम भेटून त्यांची उर्जा विधायक कामासाठी वापरून participatory approach ने त्या भागाचा विकास होणे गरजेचे आहे.
·       या बरोबरच ‘सरहद को स्वरांजली’ हा संस्कार भारती संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होता आले. १९६२ च्या चीन-भारत युद्धाच्या वेळी ‘ए मेरे वतन के लोगो...’ हे गाण लता मंगेशकर यांनी गायलं होतं. याला ५० वर्षे पूर्ण झाली म्हणून हा कार्यक्रम होता. गायन स्पर्धा व पूर्वांचल मधील सात राज्ये व सिक्कीम या आठ राज्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम असे या कार्यक्रमाचे स्वरूप होते. यामध्ये आम्हाला आठ ही राज्यांच्या संस्कृतीची झलक एकाच व्यासपीठावर बघायला मिळाली. 
या सगळ्या अनुभवाने आपण एका व्यापक समाजाचे भाग आहोत याची जाणीव झाली. ही व्यापकता आणि विविधता फक्त राहणीमान, संस्कृती मध्येच नाही तर समस्यांमध्ये देखील आहे.
For more information and participation, please visit: http://gyansetuerc.wordpress.com/


अश्विन भोंडवे, ashwin.bhondave@gmail.com  

No comments:

Post a comment