'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Friday, 24 January 2014

अस्ताकडे.....????

बद्र्रुम्नाला येथे धीरज व सहकारी

“आपण सर्व डॉ. बिनायक सेन हे नाव ऐकून असालच. छत्तीसगडमधील धमतरी नावाच्या नक्षल प्रभावित भागात काम करणारे आणि मधल्या काळात नक्षलवाद्यांना मदत करतात म्हणून त्यांना ‘देशद्रोहाच्या’ आरोपांखाली तुरुंगातदेखील टाकल्या गेल्याचे आपल्याला माहिती आहे. दोन वर्षे तुरुंगात काढल्यानंतर, बऱ्याच लोकांच्या प्रयत्नांनंतर त्यांची जामिनावर सुटका झाली. अजूनही ती case न्य्यायालयात चालू आहे.
मागील महिन्यात जन स्वास्थ्य सहयोग (JSS) मध्ये असताना त्यांना भेटण्याचा योग आला. कमी बोलणारे, धीरगंभीर आणि अत्यंत विचारी असा सुरवातीला आमचा समज झाला. पण जसा जसा सोबत वेळ गेला, तसा तसा एक साधा आणि down to earth माणूस आम्हाला बघायला मिळाला. त्यांच्या सोबत बोलत असतानाच माझा येथील मित्र वत्सल सिंग, पुण्याचा श्रीराम देशपांडे आणि मी असा तिघांचा ते सुरवातीला जिथे काम करत होते तिथे, म्हणजे बद्र्रुम्नाला ला जाण्याचं ठरलं.
पण बद्र्रुम्नाला आता आरोग्याचं कुठलंच काम उरलं नसल्याचं आम्हाला सरांनी जेव्हा सांगितलं, तेव्हा क्षणभर आमचा विचार बदलला. पण मनात पुन्हा प्रश्न उभे राहिले. चालू असणाऱ्या किंवा लोकप्रिय सामाजिक संस्थांना आपण नेहमीच भेटी देत आलोय. येथे असं काय घडलंय की चालू असणारं काम आज बंद होतंय? त्यांना आपलं काम बंद करावं लागल्यानंतर तिथे आज काय परिस्थिती आहे? लोकांना काय वाटतंय? असे आणि बरेच......
बद्र्रुम्नालाला जाण्यासाठी आमच्यासोबत प्रहलाद नावाचे संस्थेच्या शेवटच्या सदस्यांपैकी एक होते. बहुतेक लोक आता सोडून गेले होते. त्यांच्यासोबत बोलताना आम्हाला नैराश्य या theoretical शब्दाचा practical अर्थ समजायला लागला. त्यांच्याशी बोलताना संस्था आता शेवटच्या घटका मोजत आहे हे समजायला लागलं होतं. कुठल्याही विषयावर त्यांना आजच्या परिस्थितीपेक्षा भूतकाळातील परिस्थितीबद्दल आणि त्यावेळेस चाललेल्या कामाबद्दल बोलायला आवडत होतं.
बद्र्रुम्नाला म्हणजे एक सुंदर खेडं! दूर जंगलामध्ये, जागोजागी पाण्याची तळी आणि या सर्वामध्ये उठून दिसणारे CRPF चे “टुमदार” campus. गावामध्ये सुरूवातीलाच, गावच्याच जागेमध्ये बांधलेलं छोटंस hospital. Hospital म्हणजे आठ बाय आठच्या पाच खोल्या, पण सुंदर! गावातीलच लोकांनी, गावातच असलेल्या सामानानी बांधलेलं. चारी बाजूंनी खोल्या आणि मधोमध मोकळी जागा. या पाच खोल्यांमध्येच मग OPD, भरती, प्रयोगशाळा, training ची जागा आणि डॉक्टरांची राहण्याची जागा!!!
गावामध्ये घासिया नावाचे, गावातीलच आणि तिथे काम करणारे गृहस्थ भेटले. Hospital सुरू असताना आजारी व्यक्तींना किती फायदा व्हायचा आणि आता साध्या हागवणीसाठी त्यांना किती दूर जावं लागतं याचा उल्लेख होत होता. TB मुळे किती लोकांचे आयुष्य उध्वस्थ झाले आणि hospital सुरु असताना कसा फायदा व्हायचा, हे पुन्हापुन्हा त्यांच्या सांगण्यात येत होतं. एका बाजूने नक्षलवादी आणि दुसऱ्या बाजूने पोलीस, या दोघांमध्ये भरडल्या जाणाऱ्या सामान्य आदिवासी माणसाचं दुःख त्यांच्याकडून लपूनही राहत नव्हतं.
परत निघाल्यावर आम्ही तिघेपण शांत होतो, आपल्याच विचारात गुंग. काहीच बोलण्याची कोणालाच इच्छा होत नव्हती. एखादं काम सुरू होताना असणाऱ्या उर्मीची आम्ही बऱ्याचदा कल्पना केली होती आणि बघतो पण आहे. पण एखादं संपणारं स्वप्नं पहिल्यांदाच अनुभवत होतो. असं नाही की ते काम कधीच बंद होणार नव्हतं, पण हा डाव अर्ध्यावरच फिस्कटला होता. आज तिथली माणूस नसलेली निर्जीव इमारत चांगलीच मनात रुतत होती.

आम्ही सूर्यास्ताला बद्र्रुम्नालावरून परतीला निघालो. एका ‘अस्ता’कडून तर आम्ही निघालो होतो, पण आता बघायचं आहे की हा अस्त किती जणांना ‘उदयाकडे’ घेऊन जातो...”

धीरज देशमुख, dhirajvd60@gmail.com  

No comments:

Post a comment