'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Friday, 24 January 2014

पुस्तक परिचय

The Diary of a Young Girl – Anne Frank

१२ जून १९३२ साली जन्म झालेली अॅन. खूप समंजस, विचारी, स्वतःची मते असणारी मुलगी. पण तिच्या मते ती पालकांकडून तसेच तिच्या सहनिवासितांकडून सतत दुर्लक्षित, अवहेलना झालेली एक कुमारवयीन मुलगी.
दुसऱ्या महायुद्धात सहभागी सोव्हिएत युनियन, अमेरिका, जर्मनी, पोलंड, युक्रेन अशा अनेक महत्त्वाच्या देशांपैकी जर्मनी हा तिचा देश. ज्यू वंशात जन्म घेतल्यामुळे तात्कालीन राजकीय परिस्थितीनुसार सामाजिक, आर्थिक, राजकीय, स्वातंत्र्यावर गदा आलेली. पण स्वतःचा जीव, स्वत्व जपून पुढे नक्की चांगले दिवस येतील व आपले आयुष्य पूर्ववत होईल या आशेने अॅन व तिचे कुटुंबीय – व्हॅनडॅन या एका दुसऱ्या ज्यू कुटुंबीयांसोबत एका परिचितांच्या मदतीने १९४२ साली अॅमस्टरडॅम शहरातच पण अज्ञातवासात राहण्यास जातात.
साधारणतः १९३९ साली सुरु झालेल्या दुसऱ्या महायुद्धामुळे जून १९४२ मध्ये भूमिगत झाल्यापासून ऑगस्ट १९४४ साली पकडले जाईपर्यंत तिने आपले कुटुंबीय, त्यांचे स्वभाव, सहनिवासी व त्यांचा मुलगा पीटर, नंतर त्यांच्याबरोबर रहायला आलेला श्री. डसेल या सगळ्यांचे तिच्या अनुभवांनुसार तिने जे वर्णन केले आहे ..... की सौ. व्हॅनडॅन, त्यांचा चिडचिडेपणा, सारखी संशयाची वृत्ती; त्यांचा मुलगा पीटर, काहीसा आत्ममग्न, पण मानाने खूप हळवा, बऱ्याच गोष्टींचे ज्ञान असणारा, पण त्याला त्याचे आई बाबा आवडत नाहीत; श्री. डसेल, त्यांचा माजोरेपणा, अजिबात जुळवून न घेण्याची सवय; श्री व्हॅनडॅन, त्यांची मद्यपानाची सवय; अॅनची बहीण मरगॉट, खूप हुशार, त्यामुळे घरात सगळ्यांची लाडकी; त्याउलट अॅन; तिचे बाबा, खूप अभ्यासू, तिच्या सारख्याच विचारांचे, पण आई समोर काहीच बोलत नाहीत असे अॅनला वाटते.
कोणताही दोष नसताना फक्त ज्यू वंशीय असल्यामुळे अज्ञातवासात राहताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत साधारण २ वर्षांच्या काळात बनलेली मनस्थिती, इतर सहनिवासितांची वागणूक, अॅनच्या स्वतःच्या मनात वयापरत्वे येणाऱ्या तरुण्यासुलभ भावना याचे अतिशय स्पष्ट आणि तिच्या वयाला साजेसे असे वर्णन आहे.
आधीपासूनच तिच्या मनात आईविषयी असणारी भावना, त्याची कारणे याबाबतही तिने मांडलेली मते आणि त्याच अॅनने आपल्या आईसाठी काही कालावधीनंतर आपले विचार कसे चुकीचे होते याचे केलेले प्रामाणिक वर्णन मनाला भिडते.
कोणतीही पूर्वकल्पना नसताना अज्ञातवासात राहण्याची सुरुवात केल्यामुळे दैनंदिन गोष्टींपासून ते महत्त्वाच्या गोष्टींविषयीचे निर्णय घेण्यापर्यंतच्या पद्धतीमध्ये कसे बदल करावे लागले हे सांगताना अॅन म्हणते, ‘मी आत्तापर्यंतच्या आयुष्यात जेवढे  बटाटे खाल्ले नसतील तितके या दोन वर्षात खाल्ले आहेत. तसंच वाटण्याचेही. यावरून तात्कालीन राजकीय धोरण, अन्नवाटप, संचार करण्याची मुभा हयाविषयी कल्पना येऊ शकते. त्यांना बाहेरील जगातील घडामोडी सांगणारे, मदत करणारे, त्यांच्या मूलभूत गरजा पुरवणारे म्हणजेच बेप, मिएप व तिचा नवरा जॅन, श्री. क्लीमन ही सगळी मंडळी. या सगळ्यांच्या सहकार्यानेच त्यांचे अज्ञातवासातील वास्तव्य सुसह्य व सुरक्षित झाले होते.
अॅनने तिच्या वडिलांच्या सांगण्यावरून वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास सुरु ठेवला होता. जेणेकरून परिस्थिती पुन्हा पूर्ववत झाल्यावर इतर समवयस्कांबरोबर तिला परत शाळेत जाता येईल. अतिशय बडबडी, सर्व गोष्टींचा विचार करणारी, आईला घरकामात सतत मदत करणारी अॅन तिच्या वयाला साजेशी पुस्तके वाचते, इंग्लिश भाषेचा अभ्यास करते. वेगवेगळ्या विषयातील महत्त्वाची कात्रणे काढून ठेवते. शाळेचा अभ्यास, त्याचबरोबर फ्रेंच भाषा शिकण्यासाठी तिचे प्रयत्न खूप प्रामाणिक वाटतात. डच भाषा तिला उत्तम येते. अवघे १३ - १४ वर्षे वय असताना अॅनची आकलन क्षमता फार वाखाणण्याजोगी होती. असे म्हणता येईल.
सभोवताली असणारी युद्धजन्य परिस्थिती, त्यात होणारी स्थित्यंतरे, त्याचा ज्यू वंशीय लोकांवर, त्यांच्या आयुष्यावर होणारा परिणाम याचे अगदी मुद्देसूद वर्णन ती करते.
काही कालावधीनंतर पीटरविषयी तिच्या मनात निर्माण झालेल्या भावना, पीटरचे स्वभाववैशिष्ट्य, दोघांमध्ये निर्माण झालेला आपलेपणा, त्याची कारणे, या गोष्टीविषयी असणारी इतर लोकांची मते, याविषयी अॅनचे मत परखड आहे. तिची मोठी बहिण मॉरगॉटचे विचार फार सहजपणे अॅनने मांडले आहेत.
स्वतःचे हक्क, अधिकार यावर फार मोठ्या प्रमाणात निर्बंध आलेले असतानाही प्राप्त परिस्थितीचा स्वीकार करून अॅन अतिशय नेटाने व दूरदर्शीपणे जीवन जगण्याचा निर्णय घेते. या सर्व प्रवासात तिच्या मनाने घेतलेले प्रत्येक हिंदोळे – आपल्याही मनाला कुठेतरी भिडतात. अॅन आपलीशी, आपल्याच कुटुंबातील वाटू लागते.

मला तर काही प्रसंगांत तर ही माझीच डायरी असल्याचा भास झाला. इतक्या लहान वयात अॅनकडे असणारी लिखाणाची ही कला मनोवेधक ठरते, त्यामुळे अॅनचा हेवा वाटू लागतो. कारण मला खरंच असं वाटलं – मी जर अॅनच्या जागी असते तरी मी नसते लिहू शकले असं सगळं विलोभनीय वर्णन...!!!

अद्वैता वर्तक, adwaita289@gmail.com

No comments:

Post a comment