'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Friday, 28 February 2014

पुस्तक परिचय

अर्थाच्या शोधात- डॉ. विक्टर फ्रांकेल

‘अर्थाच्या शोधात’ हा डॉ. Viktor Frankl यांनी लिहलेल्या 'Man's Search for Meaning' या पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे.
डॉ. Viktor Frankl हे एक प्रसिद्ध सायकॉलोजिस्ट होते. दुसरे महायुध्द सुरू झाले तेव्हा केवळ "ज्यू" असण्याच्या "अपराधामुळे" त्यांना नाझी छळछावणीत कैद होणार होती. त्यावेळी त्यांना देश सोडून जाण्यासाठी आवश्यक असलेला परवाना मिळाला होतापण म्हाताऱ्या आईवडिलांची काळजी घेण्यासाठी त्यांनी व्हिएन्नातच राहण्याचा निर्णय घेतला, आणि १९४२ च्या सप्टेंबर महिन्यात त्यांना त्यांच्या कुटुंबियांसह अटक झाली.

त्या छळछावणीतही ते अलिप्तपणे आपली व इतर कैद्यांची मानसिक स्थिती अभ्यासत होते. रोजच त्यांची शक्ती स्वत:ला व इतर मित्रांना जिवंत ठेवण्याच्या प्रयत्नात खर्च होत होती. 
खुद्द Viktor Frankl ना “आपल्या या जगण्याला काही अर्थ आहे का? असा प्रश्न पडला होता; आणि त्यावर विचार करत असताना एकाएकी त्यांना शरीरात चैतन्य घोर निराशेस भेदून पार करत जात असल्याचा भास झाला. त्यांना "होय!"असे उत्तर स्पष्टपणे ऐकू आले! तशाही परिस्थितीत त्यांना त्यांचे आयुष्य अर्थपूर्ण वाटत होते!
डॉ. Viktor Frankl म्हणतात‘हे पुस्तक मी मला कळलेला जीवनाचा अर्थ जगाला सांगण्याच्या तीव्र प्रेरणेने लिहलेमला फक्त एवढेच दाखवून द्यायचे होते, की कॉन्संट्रेशन कॅम्पसारख्या कल्पनातीत परिस्थितीत देखील आयुष्याला अर्थ असतो नि प्रत्येक जीवात अंतःसामर्थ्य असते. ह्या बीजरूप शक्तीचे बल जगाला दाखवण्यासाठी हे पुस्तक लिहावेसे वाटले.’
त्यामुळे कॉन्सनट्रेशन कॅम्प मधून बाहेर पडल्यावर केवळ नऊ दिवसांत झपाटलेल्या अवस्थेत त्यांनी हे पुस्तक लिहून काढले. 

ह्या पुस्तकाच्या पूर्वार्धात डॉ. Frankl नी कॉन्संट्रेशन कॅम्प मधील अनुभव नि त्यांचा माणसाच्या मनावर होणारा परिणाम ह्याचे वर्णन केले आहे. पुस्तकाच्या उत्तरार्धात त्यानी वरील अनुभवांवर आधारित आपल्या सिद्धांतांची ओळख, त्यातून निर्माण केलेली उपचारपद्धती व तिचा उपयोग आणि त्यायोगे मिळणारे, जगण्यास समर्थ करणारे मनोबल ह्यांची मांडणी केली आहे. 

डॉ. Viktor Frankl म्हणतात, की “जर लक्षावधी लोकांचे लक्ष, ‘अर्थाच्या शोधात’ ह्या मथळ्याने वेधले जात असेल तर ते सारे जीवनातील अर्थाच्या शोधात आहेत. हा अर्थ शोधण्याची त्यांना निकड आहे.
अस्तित्वातील पोकळी, जीवनातील अर्थहीनता ही आजच्या समाजाची 'सामुदायिक' विकृती (द कलेकटीव्ह न्युरोसिस) आहे. ह्याचे वर्णन जीवनात काही अर्थ आहे ह्यावर विश्वास नसणे; व्यक्तिगत आयुष्यात नैतिकता, धर्म, ज्ञान ह्या सर्वांना झुगारणे असे करता येईल.ही अवस्था अनेकदा ‘रटाळपणा’च्या स्वरुपात प्रदर्शित होते. सद्य:स्थितीत ही ‘अस्तित्वातील पोकळी’ बऱ्याच मनोविकृतींची जनक असल्यासारखी वाटते. आत्महत्येचे विचार, अतीव नैराश्य, आक्रमक प्रवृत्ती, मादक द्रव्याधीनता, वार्धक्यातील एकटेपण आणि नैराश्य ह्याचे बीजदेखील वरील पोकळीत आढळून येते. 
आयुष्यातील पोकळीने ग्रस्त माणूस ‘काय करावे’ हे न कळल्याने एकतर ‘सगळे करताहेत ते’ करणारा अनुसरणवादी बनतो नाहीतर आंधळेपणाने दुसऱ्यांच्या आज्ञांचे पालन करणारा होतो. कधी कधी माणूस ती पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न सत्तेचा, पैशाचा हव्यास धरून करताना दिसतो, तर कधी त्यासाठी तो सुखाच्या मागे पळताना दिसतो. कधी तो विषयसुखात आयुष्यातील रिकामी जागा भरायचा प्रयत्न करतो. त्यामुळे अनेकदा अशी माणसे विषयलंपट झालेली दिसतात. 

Franklच्या मते "अस्तित्वातील पोकळी" ही एक विकृती आहे, वस्तुस्थिती नाही!
प्रत्यक्षात प्रत्येकाच्या अस्तित्वाला अर्थ असतो, प्रयोजन असते. आणि तो अर्थ आपण स्वतः द्यायचा असतो!
आपल्याला आयुष्यातून काय हवंय?, असा विचार करण्यापेक्षा आयुष्याने आपल्यापुढे कोणते आव्हान कोणते प्रसंग वाढून ठेवलेय याकडे लक्ष द्यायला हवे. ‘आयुष्याला काय अर्थ आहे?’ असे विचारण्याऐवजी ‘आयुष्यातील प्रत्येक तासाला, प्रत्येक क्षणाला आपण काय अर्थ देऊ शकतो?’ असे हे आयुष्य आपल्याला विचारत आहे, हे समजून घ्यायला हवे. 
ते म्हणतात, ‘आयुष्यात काय प्रसंग येतील ह्यावर तुमचे नियंत्रण नसते; पण त्याबद्दल तुम्हाला काय वाटते,आणि त्यांना तुम्ही कसा प्रतिसाद देता, ह्यावर तुम्ही नेहमी नियंत्रण ठेवू शकता. आणि जोवर प्रसंगाला तोंड कसे द्यायचे हे ठरवण्याचे स्वातंत्र्य आपल्याजवळ आहे, तोवर आपण कधीच रिते होऊ शकणार नाही.’

ते म्हणतात‘आयुष्यात जर काही क्षणभंगुर असेल तर ती संभाव्यता! (potential/possibilities). या possibilities ना जेंव्हा आपण प्रत्यक्षात आणतो, उतरवतो, तेंव्हा त्यांना मूर्त रूप मिळते. मग त्या भूतकाळात अनुभव बनून save होतात आणि चिरंतन बनतात.
म्हणूनच नाशवंत आयुष्य म्हणजे अर्थहीन आयुष्य हे समीकरण होत नाही. क्षणभंगुरता ही जबाबदारपणात परिवर्तीत होते.’ 
‘कोणत्या संधी वाऱ्यावर सोडून विलीन होऊ द्यायच्या, नि कोणत्या संधींना प्रत्यक्षात आणून मूर्त स्वरूप द्यायचे ही निवड माणूस प्रत्येक क्षणाला करत असतो!’

ते पुढे म्हणतात,की ‘जीवनातला अर्थ’ वेगवेगळ्या मार्गांनी अनुभवता येतो. उदा. :
·   कृतीशील जीवन जगताना
·   आपल्यापलीकडील कुठल्यातरी उदात्त भावनांचा अनुभव घेताना (हा अनुभव निसर्गसानिध्यात, सुविचारांच्या अभिव्यक्तीत (expression मध्ये) किंवा साहित्याच्या कलास्वादात मिळू शकतो.)
·   दुसऱ्या व्यक्तीचा सहवास अनुभवताना.
·   आणि न टाळता येणाऱ्या दुखाकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन बदलताना
तर आपणही अशा प्रकारे आयुष्यातला अर्थ शोधूया किंवा आयुष्याला अर्थ देऊया!

एका ठिकाणी Frankl म्हणतात की, ‘व्यक्ती संकटास धैर्याने, निःस्वार्थपणे, स्वाभिमानाने सामोरी जाऊ शकते किंवा स्वतःस वाचविण्याच्या अवघड प्रयत्नात माणुसकीचा धर्म विसरून जनावरांसारखे वागू शकते. नाझींच्या ताब्यातील युद्धकैद्यांतील काही थोडेच युद्धकैदी पहिल्या प्रकारात मोडले, हे खरे आहे; परंतु त्यातील एक उदाहरणदेखील माणसाचे अंतःसामर्थ्य त्याला त्याच्या नशिबाहून उंच स्तरावर नेऊ शकते हे दाखवण्यासाठी पुरेसे आहे!

हे पुस्तक वाचून ‘मी यातून कोणते विचार घेतले?’ याची निवड मी अशी केली आहे; तुम्ही जर हे पुस्तक वाचलं तर तुम्ही घेतलेले विचार नक्कीच काहीसे वेगळे असतील! म्हणून तुम्हीही हे पुस्तक जरूर वाचा :)

पल्लवी मालशे, pallavi.malshe@gmail.com

4 comments:

 1. It is an excellent book and this is an excellent review! Very nice. I was able to brush up my memory of reading this book.

  ReplyDelete
 2. Really very well written!! फक्त review वाचला तरी प्रेरणा मिळाली... धन्यवाद पल्लवी !

  ReplyDelete
 3. Very nice review. Well understood and very well written! :)
  Pustak Nakki vachen!

  ReplyDelete