'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Friday, 28 February 2014

शिकण्या-शिकवण्यासाठी एक खरीखुरी कार्य-शाळा

“निर्माण प्रक्रियेदरम्यान शिक्षण क्षेत्रात काम करण्याच्या निर्णयापर्यंत मी आले होते. हे काम कसं करायचं, मुलांच्या कलाने शिकवणं म्हणजे काय, हे मला ‘खेळघर’ कार्यशाळेच्या माध्यमातून शिकायला मिळाले.” या कार्यशाळेबद्दल वाचूया स्वतः अमृता ढगेच्या (निर्माण ५) शब्दांत...
“पुण्यातलं ‘खेळघर’ हे मुख्यतः लक्ष्मीनगर झोपडपट्टीतील मुलांसाठी काम करतं. पालकनीती परिवारातर्फे सुरु केला गेलेला हा उपक्रम खेळ, कला आणि संवाद या तीन माध्यमातून मुलांचे शिक्षण करण्याचा प्रयत्न करतो. (खेळघरच्या कामाबद्दल आपण सीमोल्लंघनच्या अंकात वेदवती लेलेकडून जाणून घेतले आहेच.) १२-१६ फेब्रुवारी दरम्यान खेळघरने पुण्यात एक कार्यशाळा आयोजित केली होती. खेळघरसारखा उपक्रम आपापल्या शाळेत राबवू इच्छिणाऱ्यांनी, आपल्या मुलांशी संवाद कसा साधावा हे जाणून घेऊ इच्छिणाऱ्या पालकांनी आणि शिक्षण क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या इतरांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला.
कार्यशाळेदरम्यान एक मजेशीर क्षण
वर्षा सहस्त्रबुद्धे, स्वाती जोशी आणि नीलिमा सहस्त्रबुद्धे यांनी खेळघरमधल्या ताईंच्या सहकार्याने भाषा, गणित, आणि विज्ञान हे विषय खेळ, कला आणि संवाद या माध्यमांतून कसे शिकवता येतील याची प्रात्यक्षिके घेतली. सुजाता लोहकरे यांनी RTE – Right to Education या कायद्यामुळे शिक्षण क्षेत्रात झालेले तसेच पुढे होऊ घातलेले बदल, काही त्रुटी आणि याच्या एकूणच परिणामांवर सर्वांशी संवाद साधला. या सगळ्या ताईंनी आम्हाला प्रत्येक विषयाची इतर अनेक विषयांशी असलेली जोडणी लक्षात आणून दिली आणि ती समोरच्या व्यक्तीपर्यंत कशी पोहोचवायची हेही शिकवलं. शेवटच्या दिवशी आमचे चार गट पाडले गेले. प्रत्येक गटाने (आहार, पाणी, कालमापन, आणि वाचन यापैकी) एक विषय ‘तुमच्या खेळघरमध्ये कसा शिकवाल?’ यावर चर्चा करून मांडणी केली. या प्रक्रियेत शिक्षक म्हणंजे मोठा आणि सर्वज्ञ आणि विद्यार्थी म्हणजे लहान, मातीचा गोळा असा भेदभाव न राहता सगळेच समान असल्यामुळे कार्यशाळेत अगदी मोकळं वातावरण होतं. मी, श्रद्धा चोरगी आणि वेदवती लेले (तिघी निर्माण ५) सोबतच ज्योती घोगरे (निर्माण १) व रेश्मा लिंगायत (निर्माण ३) असा निर्माणींचा एक चमूही या कार्यशाळेच्या निमित्ताने एकत्र आला.
मी ऐकलं, मी विसरलो
मी पाहिलं, माझ्या लक्षात राहिलं
मी केल, मला समजलं
मी अनुभवलं, मला सांगता आलं
हा सुविचार प्रत्यक्ष जगून आणि मुलांसाठी (आणि आमच्यासाठीही) या अनोख्या ज्ञानाचा खजिना घेऊन आम्ही खेळघरच्या या आगळ्यावेगळ्या कार्यशाळेतून बाहेर पडलो.”

(या प्रक्रियेचा भाग बनण्यासाठी खेळघरमध्ये कार्यकर्ता म्हणून कोणीही सहभागी होऊ शकतं. शिवाय एक आठवड्याची फेलोशिप सुद्धा असते. नवीन खेळघर चालू करण्यासाठीच मार्गदर्शन व प्रशिक्षण मिळत. ज्यांना ज्या ज्या प्रकारच आर्थिक साहाय्य करणे शक्य आहे ते जरूर करावं. पालकनीती परिवाराचे मासिक प्रकाशित होते त्याचे सभासदत्व देखील घेता येऊ शकते. खेळघरबद्दल अधिक माहितीसाठी वेबसाईट : www.palakneeti.org

स्रोत: अमृता ढगे, dhage.amruta@gmail.com

No comments:

Post a Comment