'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Friday, 28 February 2014

डायग्नोसिस स्वभाव-स्वधर्म-युगधर्माचे

३ ते ११ फेब्रुवारी दरम्यान निर्माण ५ च्या वैद्यकीय बॅचचे तिसरे शिबीर संपन्न झाले. या शिबिराची उद्दिष्टे खालीलप्रमाणे होती:
१.      शिबिरार्थ्यांना आपल्या ‘करीअर’ व पुढील वाटचालीबद्दल अधिक स्पष्टता येणे
२.      सध्याच्या आरोग्यव्यवस्थेबद्दल त्यांच्या मनात प्रश्न निर्माण होणे
३.      वैद्यकीय सेवेखेरीज तितक्याच महत्त्वाच्या आरोग्यव्यवस्थेच्या इतर अंगांची (उदा. औषधे, रक्त, अर्थशास्त्र, समाजशास्त्र इ.) त्यांना ओळख होणे
४.      सध्याच्या राजकारणाबद्दल व मार्केट व्यवस्थेबद्दल स्पष्टता येणे
५.      एक गट म्हणून त्यांच्यातील नाते घट्ट होणे
ध्येयनिश्चितीच्या दृष्टीने शिबिरार्थ्यांना मदत व्हावी यासाठी स्वभाव-स्वधर्म-युगाधार्माचे सत्र यावेळी शिबिराच्या सुरुवातीलाच अधिक विस्तृतपणे घेण्यात आले. याचसोबत याबाबतीत अधिक स्पष्टता येण्यासाठी अमृतने Maslow pyramid ची रचना सर्वांना समजावून सांगितली. शिबिराच्या शेवटच्या भागात प्रत्येकाने आपापले ध्येय नेमक्या शब्दांत लिहिण्याचा प्रयत्न केला व सर्वांसमोर सादरीकरण केले.
‘सर्वांसाठी आरोग्यसेवा’ हे ध्येय ठेवले तर सध्या भारताची काय स्थिती आहे आणि यासाठी कोणती पावले उचलावी लागतील याविषयी नायनांचे सत्र झाले. सध्या ग्रामीण व आदीवासी भागांत सरकारी आरोग्यव्यवस्थेची काय स्थिती आहे, ती सुधारण्यासाठी निर्माणचे युवक/युवती काय करू शकतात याबद्दल महाराष्ट्राच्या आरोग्यसेवा संचालनालयाचे संचालक (Director of Health Services) डॉ. सतीश पवार व त्यांच्या पत्नी डॉ. अर्चना पाटील यांनी शिबिरार्थ्यांशी संवाद साधला. या जोडप्याने डॉक्टर झाल्यानंतर ५ वर्षे नाशिकच्या दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्यसेवा दिली होती. निर्माणचे अनेक डॉक्टर्स सध्या याच टप्प्यावर असल्याने या जोडप्याचे अनुभव सर्वांना भावले. महाराष्ट्रात अनेक डॉक्टर्स दरवर्षी बाहेर पडत असूनही ग्रामीण भागांत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त राहतात. याचे कारण RTI च्या माध्यमातून शोधताना वैद्यकीय व्यवस्थेबद्दल आलेले अनुभव अमृत बंग व विठ्ठल साळवे यांनी मांडले. डॉ. योगेश काळकोंडे यांनी भारतात येऊ घातलेल्या असंसर्गजन्य रोगांच्या मोठ्या संकटाबद्दल विस्तृत मांडणी केली. आनंद बंग याने The lost art of healing या पुस्तकाचा परिचय करून दिला.
‘धरामित्र’चे संचालक श्री. रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ यांनी फार्मा व्यवसाय करणाऱ्या मोठमोठ्या कंपन्या व वैद्यकीय सेवा यांचं साटंलोटं कसे घडवून आणले जाते, त्याचा रुग्णाला कराव्या लागणाऱ्या खर्चावर काय परिणाम होतो आणि यातूनच जेनेरिक मेडिसीनची चळवळ कशी आकार घेत आहे याविषयी मांडणी केली. तसेच गर्भलिंग निदान प्रतिबंध कायदा अस्तित्वात येण्यासाठी रवींद्र काका आणि त्यांच्या गटाने दिलेला लढ्याविषयी सत्र घेतले. ‘मुंबईत एखादा गंभीर रुग्ण उपचारासाठी दवाखान्यात येतो तेंव्हा त्याला तशा परिस्थितीत रक्त मिळवण्यासाठी वणवण फिरायला लागू नये’ ही समस्या श्री. विनय शेट्टी यांनी कशी सोडवली हे विस्तृतपणे सांगितले. 
श्री. विश्वंभर चौधरी यांनी आजच्या पक्षीय व सांसदीय लोकशाहीविषयी, तसेच नागरिक लोकशाहीत कसा सहभाग घेऊ शकतात याविषयी अतिशय मार्मिक मांडणी केली. अतिहव्यासापोटी आलेल्या २००८ च्या आर्थिक मंदीच्या संकटावर भाष्य करणारा ऑस्कर पुरस्कार विजेता लघुपट Inside job या शिबिरात दाखवण्यात आला. हा क्लिष्ट विषय श्री. सुनील चव्हाण यांनी रोल प्लेच्या माध्यमातून सोपा करून सांगितला.
या शिबिराच्या शिक्षणप्रक्रियेत शिबिरार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. सुरुवातीलाच शिबिरार्थ्यांनी गेल्या ६ महिन्यात झालेला बाहेरील व आतील प्रवास सर्वांसमोर सादर केला व गटाच्या सामूहिक शिक्षणात प्रत्येकाने योगदान दिले. या ‘जेनेरिक’ शेअरिंगनंतर ‘प्रेमाच्या कसोट्या, जोडीदार व लग्न’ याविषयी झालेल्या ‘स्पेसिफिक’ शेअरिंग मध्ये सर्वच उत्साहाने सहभागी झाले. या व इतर ज्वलंत प्रश्नांना दिशा देण्यासाठी अम्मा-नायनांसोबत झालेल्या प्रश्नोत्तरीमध्येही मुलांनी अनेक प्रश्न विचारले. ‘भारताचे पंतप्रधान कोण असावे- नरेंद्र मोदी, राहुल गांधी का अरविंद केजरीवाल?’ या धगधगत्या विषयावर वादविवाद-चर्चा झाली. या वादविवादाची तयारी करण्यासाठी शिबिरार्थ्यांनी ‘नाईट-आउट’मध्ये इंटरनेट, वृत्तपत्रे, सामूहिक चर्चा अशा माध्यमांचा आधार घेतला.

अतिशय तीव्र स्पर्धा व ठरलेल्या साचेबंद करीअरचा वेगवान प्रवाह यांचा सामना निर्माणच्या डॉक्टरांना नेहमी करावा लागतो. स्पर्धेकडे पाठ फिरवून जेथे गरज आहे तिथे जाऊन वैद्यकीय सेवा देण्याची शिबिरार्थ्यांनी दाखवलेली तयारी ही या शिबिराची मोठी उपलब्धी होती.

No comments:

Post a Comment